ADR Report : निवडणूक आयोगाच्या लोकसभेच्या मतदानाच्या आकडेवारीत तफावत असल्याचा ‘ए.डी.आर्.’चा दावा !

दैनिक ‘सनातन प्रभात’ने महिन्याभरापूर्वी प्रसिद्ध केले होते अशा स्वरूपाचे वृत्त !

(‘ए.डी.आर्.’ म्हणजे ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ नावाची बिगर राजकीय संस्था)

मुंबई, २ ऑगस्ट (वार्ता.) – निवडणुकीचे नि तिच्या आकडेवारीचे दायित्व असलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या  संकेतस्थळावर गौडबंगाल असल्याचे दैनिक ‘सनातन प्रभात’ने २३ जून २०२४ या दिवशी सर्वप्रथम उघड केले होते. यांतर्गत संकेतस्थळावर एका ठिकाणी एक आकडेवारी आणि दुसर्‍या ठिकाणी संबंधित आकडेवारीची राज्यनिहाय बेरीज केल्यानंतर त्यात तफावत असल्याचे आढळून आले होते. ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ या बिगर राजकीय संस्थेचे संस्थापक जगदीश छोकर यांसह काही नामांकित पत्रकार यांनीही आता अशा आशयाच्या त्रुटी झाल्यावरून आवाज उठवला आहे. लोकसभेच्या निवडणुकीतील ‘ईव्हीएम्’ यंत्रांमधील मते आणि प्रत्यक्ष केलेल्या मतदानाची आकडेवारी यांत तफावत असल्याचा दावा जगदीश छोकर यांनी केला आहे.

१. ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ ही बिगर राजकीय संस्था मागील २५ वर्षांपासून निवडणुका आणि राजकारण यांतील सुधारणांसाठी कार्यरत आहे. याविषयी पत्रकार परिषद घेऊन जगदीश छोकर यांनी ही सूत्रे उपस्थित केली आहेत.

२. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, देशातील ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी ३६२ मतदारसंघांमध्ये जेवढे मतदान झाले, त्यापेक्षा प्रत्यक्ष मतमोजणीत ५ लाख ५४ सहस्र ५९८ मते अल्प आढळली आहेत, तर १७६ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणीत ५ लाख ८९ सहस्र ६५१ मते अधिक आढळली आहेत.

३. अशा प्रकारे ५३८ लोकसभा मतदारसंघांच्या मतदानाच्या आकडेवारीत तफावत दिसून येत आहे. ‘ही तफावत कशी ?’, याविषयी निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे.

दैनिक ‘सनातन प्रभात’ने महिन्याभरापूर्वी उघड केलेली मतांमधील तफावत !

दैनिक सनातन प्रभातच्या २३ जून २०२४ या दिवशीच्या अंकात प्रसिद्ध केलेले वृत्त

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘लोकसभा निवडणुकीत ‘नोटा’ वापरण्याच्या आकडेवारीत ४ लाख १६ सहस्र मतांचा फरक’ हे वृत्त ठळकपणे प्रसिद्ध केले होते. या वृत्तामध्ये देशात एकूण ६३ लाख ७२ सहस्र २२० मतदारांनी नोटाचा वापर केल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर मुख्य पानावर देण्यात आली होती. प्रत्यक्षात त्यांच्या संकेतस्थळावर देशातील ३६ राज्यांमधील आकडेवारीची बेरजेची दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी पडताळणी केली असता ती ६७ लाख ८८ सहस्र ४९२ इतकी आढळली होती. याचा अर्थ देशात नोटाला प्राप्त झालेल्या मतदानामध्ये तब्बल ४ लाख १६ सहस्र २७७ मतांचा फरक आढळून आला. महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांतही अशाच प्रकारे २ सहस्र ७६५ मतांचा फरक आढळून आला. याविषयीची माहिती दैनिक ‘सनातन प्रभात’कडून राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयात देण्यात आली होती.

निवडणूक आयोगाने संकेतस्थळावरील आकडेवारी हटवली ! 

सद्य:स्थितीत विधानसभेच्या निवडणुकीची आकडेवारी तशीच ठेवून केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक २०२४ च्या मतदानाची आकडेवारी स्वत:च्या संकेतस्थळावरून हटवली आहे. निवडणूक आयोगाने याविषयी कोणतेही स्पष्टीकरण न देता मतदानाची आकडेवारी हटवल्यामुळे याविषयी अधिक संभ्रम निर्माण झाला आहे.

जगदीप छोकर यांची मुलाखत पहा पुढील लिंकवर !

(सौजन्य : TV9 Bharatvarsh)


सविस्तर वृत्त वाचा –

♦ SANATAN PRABHAT EXCLUSIVE : लोकसभा निवडणुकीत ‘नोटा’ वापरण्याच्या आकडेवारीत ४ लाख १६ सहस्र मतांचा फरक !
https://sanatanprabhat.org/marathi/807087.html

संपादकीय भूमिका

यातून निवडणुकीच्या आकडेवारीत गौडबंगाल आहे, असे म्हणायला वाव रहातो. यावरून ज्या मतदारसंघांत अत्यल्प मतांनी कुणी विजयी झाले, त्या निकालात फरक असू शकतो. या संभाव्य चुकीचे दायित्व निवडणूक आयोगाचेच असून त्याने यासंदर्भात त्याची भूमिका स्पष्ट केली पाहिजे आणि आवश्यकता असल्यास काही मतदारसंघांची पुनर्मतमोजणी केली पाहिजे. केंद्र सरकार, तसेच सर्वोच्च न्यायालय यांनी यामध्ये लक्ष घालणे अत्यावश्यक आहे !