श्री जुन्नेश्वर महादेव मंदिराचा २.४० कोटी रुपयांतून जीर्णोद्धार !

  • नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिराची प्रतिकृती !

  • पहिल्या श्रावणी सोमवारी नंदी स्थापन !

छत्रपती संभाजीनगर – शहरापासून ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या वरूड काझी या ठिकाणी श्री जुन्नेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार ७ वर्षांपासून चालू आहे. लोकसहभागातून २ कोटी ४० लाख रुपयांच्या निधीतून मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आहे. श्रावणातील पहिल्या सोमवारी महादेव पिंडीसमोर नंदीची स्थापना केली जाणार आहे.

श्री जुन्नेश्वर संस्थान डोंगराच्या पायथ्याशी असलेले निसर्गरम्य ठिकाण आहे. येथे सत्ययुगामध्ये भगवान श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण वनवासाला आले होते. तेव्हा या ठिकाणी ५ दिवस थांबले होते. साडेचार एकर जागेवर वर्ष २०१९ पासून हेमाडपंथी मंदिराचे बांधकाम चालू आहे. विशेष म्हणजे देगलूरहून काळा पाषाण मागवण्यात आला. या मंदिराच्या बांधकामासाठी २० राजस्थानी कारागिर काम करत होते.

मंदिराचा गाभारा ५ फूट खोल भूमीत आहे. त्यावर २० x २० फुटाचा गाभारा उभारला आहे. मंदिराचा घुमट ७१ फूट उंच असून गाभार्‍याच्या लगत २५ x २० फुटांचा सभामंडप सिद्ध केला आहे. पाषाणातील नंदी मंदिरात ५ पिंडी असून देगलूरच्या काळ्या पाषाणातून ५ लाख रुपये खर्चातून ४ x ३ फूट उंचीचा नंदी सिद्ध करण्यात आला आहे. या नंदीची स्थापना श्रावणात पहिल्या सोमवारी केली जाणार आहे.