कन्नड (छत्रपती संभाजीनगर) येथील कालीमठाचे विश्वस्त मंडळ धर्मादाय सहआयुक्ताकडून विसर्जित !
अध्यक्ष शिवाजी सोनवणे यांना सहआयुक्ताची चपराक !
छत्रपती संभाजीनगर – कन्नड तालुक्यातील श्री क्षेत्र कालीमठ येथे शिवाजी सोनवणे यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे कन्नड तालुक्यातील कालीमठ विश्वस्त मंडळाचे विश्वस्त आणि पदाधिकारी यांच्या नियुक्त्या केल्या होत्या. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर धर्मादाय सहआयुक्त यांनी श्री क्षेत्र कालीमठाचे विश्वस्त मंडळ विसर्जित केले. यातून अध्यक्ष शिवाजी सोनवणे यांना मोठी चपराक बसली आहे. धर्मादाय सहआयुक्तांच्या या निर्णयाचे उपळा नागरिकांनी स्वागत करत जल्लोष साजरा केला.
शिवाजी सोनवणे यांनी बनावट कागदपत्रे बनवून ती धर्मादाय आयुक्तांकडे प्रविष्ट केली; मात्र पॉलिसी निर्णय घेण्यास मनाई हुकूम असतांनाही त्यांनी काही विश्वस्त आणि पदाधिकारी यांच्या नियुक्त्या केल्या होत्या. त्या सर्व विसर्जित करून शिवाजी सोनवणे यांनी बनवलेली खासगी संस्था रहित केली. स्वामी प्रणवानंद सरस्वती महाराज यांनी वर्ष १९८८ मध्ये ‘ट्रस्ट डीड’ लागू करून घेतले होते.
या निर्णयाआधारे शिवाजी सोनवणे यांनी सिद्ध केलेले अनधिकृत विश्वस्त मंडळ निलंबित करण्यात आले. या प्रकरणी राज चैतन्य महाराज यांनी याचिका प्रविष्ट केली होती. यावर अधिवक्ता बी.जी. उपाडे, अधिवक्ता विलास धुर्डे पाटील आणि अधिवक्ता रणजित डमाळे पाटील यांनी काम पाहिले. विश्वस्त मंडळाचे उपाध्यक्ष बलभीम घवले (लातूर), सचिव सुचिता सोनवणे यांच्यासह कैलास सोनवणे, चित्रा बिराजदार, गुरुप्रसाद तोतला, धनंजय नागरे आणि माधव बंडोपंत कुलकर्णी आदी विश्वस्तांची हकालपट्टी करण्यात आली आहे.