भारतीय संस्कृतीतील वैवाहिक जीवन !
पू. प्रा. सु.ग. शेवडे यांची ‘भारतीय संस्कृती’ विषयीची लेखमालिका !
आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘भारतीय स्त्रीविषयी हिंदुद्वेष्ट्यांकडून चुकीचा प्रचार’, ‘विधात्याने निर्माण केलेली स्त्रीच्या शरिराची रचना’, ‘स्त्री पुरुषापेक्षा बुद्धीमान आणि कर्तव्यदक्ष’, स्त्रीचा कुटुंब, समाज अन् राष्ट्र यांना होणारा लाभ’, तसेच ‘स्त्रियांसमोर असलेल्या आपत्ती’ यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत. (लेखांक २८)
१. स्त्रीचे वैवाहिक जीवन आणि गर्भारपण !
सध्या नोकरी हाच दृष्टीकोन पुढे ठेवून स्त्रीला पुरुषी शिक्षण दिले जाते. नोकरी करणारीच मुलगी हवी; म्हणून तिने शिकून नोकरीला लागावे, पैसे जमवावे, लग्न करावे, तोवर वय केवढे होते ? पंचविशीनंतर लग्न झाले, तर संतती अशक्त होते. The younger the mother, the bigger the child. (आई जितकी लहान तितके मूल मोठे.)
पहिली प्रसूती तरी लवकर व्हायला हवी, म्हणजे तिच्या गर्भाची वाढही चांगली होते आणि प्रसूतीही सुलभ होते. अपत्याला दूधही पुरेसे मिळते. प्रसूतीनंतर स्त्री लवकर पुन्हा आपल्या कामांना लागू शकते. बाळही गुटगुटीत होते. अशा प्रसूतीत सहसा ‘सीझर’चा (शल्यकर्म करून बाळाचा जन्म करावा लागल्यास) प्रसंग येत नाही.
स्त्री-पुरुष वैवाहिक जीवनात त्यांच्या वयाच्या जितक्या लवकर प्रवेश करतात, तितके ते परस्परांवर अधिक अनुरक्त रहातात. विलंबाने होणार्या विवाहात हा स्नेहभाव आधीच आटलेला असण्याचा संभव असतो. आपल्या नवपदार्पित घरातील इतर व्यक्तींशीही स्त्री एकरूप होणे आवश्यक असते. ती एकरूपता विलंबाने झालेल्या लग्नानंतर येऊ शकत नाही.
२. पतीची निवड पुष्कळ काळजीपूर्वक करावी !
विवाहानंतर स्त्री आपल्या पतीच्या घरी जाऊन रहाते. आता तेच तिचे घर असते. त्या घराशी एकरूप होणे, त्या पतीसमवेत आयुष्यभर संसार करणे या दृष्टीने पतीची निवड पुष्कळ काळजीपूर्वक होणे आवश्यक असते, तसेच ज्या कुटुंबात ती जाणार, त्या माणसांचीही चांगली माहिती असायला हवी. मुलीला वेळोवेळी माहेरी येता यावे, अशा दृष्टीने ते घर माहेरपासून पुष्कळ लांब नसावे. या सर्व गोष्टींचा विचार भारतीय स्त्रीजीवनात करण्यात आला आहे. पूर्वी पंचक्रोशीतच लग्न करायची पद्धत होती. आता जग पुष्कळ लहान झाले आहे. संपर्कसाधने विपुल आहेत. हे सारे जरी खरे असले, तरी ती साधने त्या कुटुंबांपर्यंत पोचली आहेत का ?, हे पहाणे महत्त्वाचे आहे.
३. सुवर्णालंकार म्हणजेच स्त्रीधन !
लग्नात वरदक्षिणा देण्याचा प्रघात आहे. पिता आपल्या मुलीलाही काही सुवर्णालंकार देतो. हे सुवर्णालंकार भारतीय परंपरेप्रमाणे स्त्रीधन आहे. त्यावर तिच्या नवर्याचा अधिकार नाही. ते सुवर्णालंकार खरेतर आपल्या मुलीच्या जीवनात काही आपत्तीमुळे अनवस्था प्रसंग उत्पन्न झाला, तर तिला आधार म्हणूनच दिलेले असतात.
४. द्रव्यलालसेपोटी हुंडा मागणे
हुंड्याच्या मागणीसाठी सुनेचा छळ करणे, हे भारतीय संस्कृतीला मान्य नाही. तसे काही प्रकार अलीकडे घडत आहेत. त्याला अर्थातच मनुष्याची प्रचंड वाढलेली द्रव्यलालसा हे कारण आहे. ज्या घरांत असे प्रकार घडतात, त्यांचे शेजारीही ‘आम्हाला काय करायचे ?’, या वृत्तीने स्वस्थ राहून तमाशा बघतात. आपल्याच घरात दुःख करतात. असल्या दुष्ट, स्वार्थी लोभ्यांकडून सुनेचा-पत्नीचा जेथे छळ होत असेल, तेव्हा ‘आपणच तिचे आई-बाप आहोत’, असे मानून सामाजिक कर्तव्य म्हणून छळापासून तिची सुटका केली पाहिजे. साम, दाम, दंड, भेद जमेल त्या नीतीचा त्यासाठी उपयोग केला पाहिजे.
५. सामाजिक कर्तव्ये पार पाडा !
‘दया’, ‘माया’ हे शब्द काही शब्दकोशाला समृद्ध करण्यासाठी उत्पन्न झालेले नाहीत. आपली काही सामाजिक कर्तव्ये आहेत. ती आपण पार पाडलीच पाहिजेत. हेच सुसंस्कृत माणसाला शोभणारे आहे.
६. स्वतः निवड करूनही पाश्चात्त्य देशांत घटस्फोटांचे प्रमाण अधिक, तर भारतात ते न्यून का ?
पाश्चात्त्य देशांत तरुण-तरुणी आपले जोडीदार स्वतःच शोधतात. ज्याच्या समवेत आपल्याला आयुष्य काढायचे आहे, त्या व्यक्तीची नीट विचारपूर्वक आणि परीक्षापूर्वक निवड करावी, ही कल्पना खरोखरच चांगली आहे. आपल्याकडेही आता हाच विचार पुढे येत आहे. मग इतकी तावून सुलाखून निवड केलेली असूनही पाश्चात्त्य पद्धतीत ५० ते ६० टक्के प्रमाणात घटस्फोट का होतात ? आणि भारतात बहुसंख्य विवाह कसे टिकतात ? यांमागील रहस्याचा विचार करायला हवा. यामागचा मुख्य विषय आहे कुणी, कुणाशी लग्न करावे ? आमचे काही वाचक म्हणतील, ‘हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कुणीही कुणाशीही लग्न करावे. त्याला काय हरकत आहे ?’; परंतु हे बोलणे शहाणपणाचे नाही आणि शास्त्रीयही नाही.
– भारताचार्य आणि धर्मभूषण प्रा. सुरेश गजानन शेवडे, चेंबूर, मुंबई.
(साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)