शारीरिक व्याधी असूनही उत्साहाने सेवा करणार्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सौ. अंजली कणगलेकर (वय ६९ वर्षे) आणि श्रीमती अलका वाघमारे (वय ६६ वर्षे) !
‘वर्ष २००९ पासून मी सौ. अंजली कणगलेकरकाकू (वय ६९ वर्षे) आणि श्रीमती अलका वाघमारेकाकू (वय ६६ वर्षे) या दोघींच्या समवेत सेवा करत आहे. या कालावधीत या दोघींकडून मला शिकायला मिळालेली काही सूत्रे येथे दिली आहेत.
१. स्वयंशिस्त
‘सौ. अंजली कणगलेकरकाकू आणि श्रीमती अलका वाघमारेकाकू या वयातही वेळेचे तंतोतंत पालन करतात. कुठल्याही सत्संगाला त्या पाच मिनिटे आधीच उपस्थित असतात. तसेच सेवेसाठी त्या ठरलेल्या वेळेत येतात. सेवेला आरंभ करण्यापूर्वी त्या संगणक आणि पटल स्वच्छता केल्याविना सेवेला आरंभ करत नाहीत.
२. शिकण्याची वृत्ती
२ अ. तरुण साधकांना विचारून सतत शिकण्याचा प्रयत्न करणे : या दोघींचे आयुष्य कष्टात गेले आहे. त्यांना जीवनातील प्रसंगांचा प्रदीर्घ अनुभव आहे. लौकिकदृष्ट्याही त्या आम्हा तरुण साधकांपेक्षा अधिक अनुभवी आहेत, तरीही त्या दोघी आज तरुण साधकांना विचारून त्यांच्याकडून सतत शिकण्याच्या प्रयत्नात असतात.
२ आ. संगणकीय तंत्रज्ञान आत्मसात करणे : त्यांच्या विद्यार्थीदशेत तंत्रज्ञान फारसे विकसित झालेले नव्हते. आता ते विकसित झाले आहे. त्यांनी सेवेसाठी आवश्यक ते सर्व तंत्रज्ञान चिकाटीने आत्मसात केले आहे. या वयात ‘संगणक शिकणे, त्यातील तांत्रिक गोष्टी समजून घेणे, ध्वनीचित्रफिती (व्हिडिओ) संकलनासारखा क्लिष्ट भाग समजून घेऊन तो चिकाटीने पूर्ण करणे’, या सर्व सेवा त्या दोघी करत असतात.
३. चिकाटी
ध्वनीचित्रीकरणाशी संबंधित सेवा अत्यंत चिकाटीने पूर्ण करावी लागते. या सेवेमध्ये अनेक बारकावे असल्याने त्यांना काही साधकांशी विविध टप्प्यांवर समन्वय करावा लागतो. त्या साधकांचा पाठपुरावाही घ्यावा लागतो. त्या दोघी न कंटाळता या सर्व गोष्टी पूर्ण करतात. त्यांच्याकडे असलेली सेवा शेवटपर्यंत पूर्ण करण्याचा त्या प्रयत्न करतात.
४. शारीरिक व्याधी असूनही सतत सेवारत रहाणे
‘दोन्ही काकूंना वयोमानापरत्वे काही शारीरिक व्याधी आहेत. त्याचा त्यांना अधूनमधून त्रास होत असतो. त्या व्याधींचा अधिक विचार न करता त्या सेवारत रहातात. त्यामुळे ‘त्या दोघींच्या सेवेत पुष्कळ कालावधीसाठी कधी खंड पडत नाही. जेव्हा त्रास अधिक होतो, तेव्हाच त्या विश्रांती घेतात. त्यांचे वयोमान लक्षात घेऊन ‘आता थोडा वेळ विश्रांती घेऊन मगच सेवा करा’, असे साधकच त्यांना सांगतात.
‘सौ. अंजली कणगलेकरकाकू आणि श्रीमती अलका वाघमारेकाकू यांचे गुण आमच्यातही येवोत’, अशी गुरुचरणी प्रार्थना !’
– श्री. योगेश जलतारे (‘सनातन प्रभात’चे समूह संपादक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.६.२०२४)