संपादकीय : …अशांवर कठोर कारवाई हवीच !

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आय.ए.एस्. अधिकारी पूजा खेडकर

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी सनदी (आय.ए.एस्.) अधिकारी पूजा खेडकर यांची उमेदवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाने रहित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचसमवेत पूजा खेडकर यांना भविष्यात सर्व परीक्षा देण्यास मनाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र कॅडरच्या प्रशिक्षणार्थी आय.ए.एस्. अधिकारी पूजा खेडकर या गेल्या काही मासांपासून चर्चेत आहेत. चुकीची माहिती आणि प्रमाणपत्राच्या आधारावर केंद्रीय लोकसेवा आयोगाची (‘यू.पी.एस्.सी.’ची) फसवणूक करून त्यांनी परीक्षा उत्तीर्ण केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. या संदर्भात आयोगाने त्यांच्याविरुद्ध गुन्हाही नोंद केला होता. ‘यू.पी.एस्.सी.’ने पूजा खेडकर यांच्या वर्ष २००९ ते २०२३ या काळातील सर्व कागदपत्रे (रेकॉर्ड) पडताळल्यानंतर ही कारवाई केली आहे. खेडकर यांना ‘नागरी सेवा परीक्षा नियम २०२२’नुसार दोषी ठरवण्यात आले आहे. पुणे येथे पूजा खेडकर यांनी केलेल्या अपप्रकारामुळे त्यांचे वाशिम येथे स्थानांतर करण्यात आले होते. त्यानंतर पुणे येथील जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार केली. त्यानंतर पुणे पोलिसांनी गुन्हा नोंद करत पूजा खेडकर यांना ३ वेळा समन्स बजावले होते; मात्र तरी त्या पोलिसांसमोर उपस्थित राहिल्या नाहीत.

आई-वडिलांची अयोग्य वर्तणूक !

खेडकर कुटुंबातील फक्त पूजा खेडकर नाही, तर त्यांची आई मनोरमा खेडकर यांनी पिस्तूल दाखवून शेतकर्‍यांना धमकावले. या प्रकरणी मनोरमा खेडकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. सध्या त्या पोलीस कोठडीत आहेत, तर वडील दिलीप खेडकर यांनी बारामती येथे नाव पालटून भूमी खरेदी केल्याचे प्रकरण समोर आले आहे. आता या प्रकरणी दिलीप खेडकर यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकीकडे पूजा हिने शासनाची फसवणूक तर केलीच आहे; पण तिचे पालकही कायदा हातात घ्यायला मागेपुढे बघत नसल्याचे दिसून आले आहे. चौकशीसाठी घरी आलेल्या पोलिसांना दमदाटी करणे, त्यांच्यावरच कारवाई करून त्यांना आत टाकण्याची भाषा वापरणे, पोलिसांशी उद्धट आणि उर्मटपणे व्यवहार करणे, या सार्‍या प्रकारांमुळे पूजा खेडकर यांच्या आईच्या विकृत वागण्याची चर्चा होत आहे. दिलीप खेडकर प्रदूषण मंडळातील निवृत्त अधिकारी आहेत. त्यांनी त्यांच्या अधिकारीपणाच्या काळात कसे उद्योग केले होते, याचे किस्से ‘लघुउद्योग भारती’चे माधव कुळकर्णी यांनी प्रसारित केले आहेत. प्रदूषणाच्या नावावर ते उद्योजकांना कसे त्रास देत असत, हेही सांगितले आहे. धूर हवेत सोडणार्‍या उंच चिमण्या असलेल्या फाऊंड्रीजना ते वेठीस धरायचे. त्यांना त्रुटी दाखवून ते स्वत:च्याच ‘थर्मोव्हेटरा’ नावाच्या आस्थापनाकडून त्या वस्तू घ्यायला भाग पाडायचे. त्या वेळी २ लाख किमतीची चिमणी खेडकर हे २० ते २२ लाख रुपयांना उद्योजकांच्या माथी मारायचे. अशा प्रकारे वडिलांचाच अपप्रकारांचा कित्ता पूजा खेडकर गिरवत आहे.

सर्वच स्तरांवर चौकशी हवी !

प्रशिक्षणार्थी असूनही ‘आय.ए.एस्.’ अधिकार्‍यांप्रमाणे वागणे, खासगी मोटारीवर लाल दिवा लावणे, दालन बळकावणे, अधिकार्‍यांसमवेत गैरवर्तणूक करणे अशा पूजा खेडकर यांच्या अनेक गोष्टी चर्चेत आल्या. पूजा खेडकर यांच्या प्रतिदिन पुढे येणार्‍या नवनवीन कारनाम्यांमुळे सध्या त्यांचीच चर्चा चालू आहे. अहिल्यानगरच्या शासकीय जिल्हा रुग्णालयाने प्रशिक्षणार्थी आय.ए.एस्. अधिकारी पूजा खेडकर यांना दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाले होते. खरेतर दिव्यांग व्यक्तींना साहाय्य करण्यासाठी, त्यांना पुढे जाण्यासाठी समाजातील सारेच जण प्रोत्साहित करत असतात; मात्र पूजा खेडकर आता सहानुभूतीच्याही पात्रतेच्या राहिलेल्या नाहीत. प्रशिक्षणार्थी असतांनाच पूजा खेडकर यांच्या खोडकर वृत्तीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. अशा प्रकारचे वर्तन विकृतीतूनच घडू शकते. १९ जुलै या दिवशी ‘यू.पी.एस्.सी.’नेही त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस दिली आहे. स्वत:चे नाव, छायाचित्र, आई-वडिलांचे नाव, स्वाक्षरी, इ-मेल पत्ता, भ्रमणभाष क्रमांक आणि पत्ता यांत वेळोवेळी पालट केल्याप्रकरणी पूजा यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हाही नोंद केला आहे.

‘यू.पी.एस्.सी.’ परीक्षेचे सर्व प्रयत्न संपल्यानंतर पूजा खेडकर यांनी वेगवेगळी नावे पालटून पुन्हा परीक्षा दिली आहे. सर्वसामान्यपणे पूजा खेडकर यांना ओबीसी कोट्यातून ९ वेळा परीक्षा देता येत होती; पण त्यांनी त्यांच्या नावात पालट करून चक्क ११ वेळा ‘यू.पी.एस्.सी.’ची परीक्षा दिल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे यू.पी.एस्.सी. परीक्षेविषयी आता अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. परिणामी या परीक्षेची सिद्धता करणार्‍या लाखो मुलांसाठी ही गोष्ट तितकीच धक्कादायक आहे. याप्रमाणे कुणीही नाव पालटून परीक्षा देऊ शकते का ? असा विचार स्पर्धक करू लागले आहेत. पंतप्रधान कार्यालयाने पूजा खेडकर यांच्यावरील आरोपांची आणि त्यांनी केलेल्या कारनाम्यांची नोंद घेतली आहे अन् त्यांची चौकशी अहिल्यानगर जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने केली जात आहे. खरेतर पंतप्रधान कार्यालयाने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी एवढ्यावरच न थांबवता ‘यू.पी.एस्.सी.’चीही चौकशी करायला हवी; कारण पूजा यांनी परीक्षेच्या वेळी केलेले कारनामे, नावनोंदणी यांविषयी ‘यू.पी.एस्.सी.’च्या लक्षात कसे आले आहे ? तिथे पूजा यांचे काही हितसंबंध गुंतले आहेत का ? याची चौकशी करून पाळेमुळे खणून काढली पाहिजेत.

गुन्हेगारी वृत्ती आली कुठून ?

या संपूर्ण प्रकरणात पूजा यांनी मानसिक आजार असल्याचाही दावा केला आहे. त्यांच्या खोटारडेपणात मानसिक आजार हाच एक खरा असू शकतो, असे वाटत आहे. या सार्‍याच घटनाक्रमात ठिकठिकाणी ‘मानसिक विकृती’ दिसत आहे. संपूर्ण देशाचा कारभार आय.ए.एस्. अधिकार्‍यांच्या खांद्यावर आहे. देशाची धोरणे, विकास, सर्वसामान्यांना न्याय, जनकल्याणाच्या हिताचे निर्णय, जनसामान्यांच्या अधिकारांची काळजी, सर्वसामान्यांचे मूलभूत अधिकार हे सर्व निःपक्षपाती बघण्याचे काम आय.ए.एस्. अधिकार्‍यांच्या हाती आहे. असे असतांना असा दर्जा प्राप्त करणार्‍या पूजा खेडकर यांच्यासारख्या अधिकारी या जर चुकीच्या वागत असतील, तर समाजातील सर्वसामान्यांनी कुणाकडे बघावे ? पूजा यांचे एकूण कारनामे बघता त्यांच्यामध्ये हा उद्दामपणा, खोटारडेपणा आणि गुन्हे करण्याची वृत्ती कुठून आली ? अर्थातच याचे उत्तर, म्हणजे घरी दिल्या गेलेल्या संस्कारांमध्ये आणि दुसरे म्हणजे कायद्याचा धाक अजिबातच नसणे यांमध्ये दडलेले आहे. आय.ए.एस्. प्रशिक्षणार्थी असलेल्या एका अधिकार्‍याची अशा प्रकारची वागणूक, म्हणजे एक प्रकारची विकृतीच आहे. शासनाची आणि सर्वसामान्य जनतेची फसवणूक करणार्‍या अशा अधिकार्‍यांवर कठोर कारवाई झाल्यास पुढे अशा प्रकारच्या वागणुकीला आळा बसू शकेल !

प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी व्यवस्थेतील उणिवांचा अपलाभ घेत असतांना प्रशासकीय व्यवस्था झोपा काढत होती का ?