परिपूर्ण सेवा करण्याचा ध्यास असणारे हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीराम लुकतुके यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !
नवी देहली – हिंदु जनजागृती समितीचे उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश राज्यांचे समन्वयक श्री. श्रीराम लुकतुके (वय ४३ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु चारुदत्त पिंगळे यांनी घोषित केले. समितीच्या साधकांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात श्री. लुकतुके यांनी समितीच्या कार्याविषयी अनुभव सांगितले. त्यानंतर सद्गुरु पिंगळेकाका यांनी ही आनंदवार्ता सर्वांना सांगितली. या कार्यक्रमाला श्री. लुकतुके यांचे वडील श्री. रमेश लुकतुके (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), आई सौ. रोहिणी लुकतुके आणि पत्नी सौ. अवनी हे ‘ऑनलाईन’ जोडले होते. या कार्यक्रमाला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ याही ‘ऑनलाईन’ उपस्थित होत्या.
मागील काही कालावधीत श्रीरामदादांनी साधना परिपूर्ण होण्यासाठी चांगले प्रयत्न केले ! – श्रीसत्शक्ति(सौ.) बिंदा सिंगबाळ
पूर्वी श्रीरामदादा मनमोकळेपणाने बोलत नव्हते; पण मागील १-२ वर्षांपासून त्यांनी यासाठी प्रयत्न वाढवले आहेत. मनमोकळेपणाने बोलून दिशा घेणे, हा भाग त्यांनी केला. दादांनी साधना परिपूर्ण होण्यासाठी चांगले प्रयत्न केले आहेत. यामुळेच भगवंताने त्यांना त्याच्या जन्मभूमीत (मथुरा ही श्रीकृष्णजन्मभूमी आहे. तेथे श्रीरामदादा सेवा करतात.) जीवनमुक्त केले आहे.
समाजातील विचारवंतांशी जवळीक करणारे आणि तळमळीने सेवा करणारे श्रीराम लुकतुके ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे
श्रीरामदादा आधी मुंबई येथे सेवेला होते आणि तेथून ते देहलीला सेवेसाठी आले. इथे आल्यावर त्यांनी समाजातील विचारवंत (intellectuals) लोकांशी संपर्क करून चांगली जवळीक निर्माण केली. यासमवेतच विदेशात कार्य करणार्या हिंदुत्वनिष्ठांनाही संपर्क चालू केले. इंडोनेशिया येथेही ते आमच्यासमवेत (सद्गुरु डॉ. पिंगळेकाका आणि सद्गुरु नीलेश सिंगबाळ) आले होते. तिथेही त्यांनी पुष्कळ तळमळीने सेवा केली. रात्री उशिरापर्यंत जागून प्रतिदिन सेवांचे आढावे पाठवले. हरिद्वार येथील कुंभ मेळ्याच्या वेळीही त्यांच्याकडे सेवेच्या आयोजनातील एक भाग होता. प्रत्येक सेवा ते भाव ठेवून करतात.
श्री. श्रीराम लुकतुके यांनी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची अनुभवलेली कृपा !
आध्यात्मिक पातळी घोषित केल्यावर आपले मनोगत व्यक्त करतांना श्री. श्रीराम लुकतुके म्हणाले, ‘‘माझे प्रयत्न खारीप्रमाणेही नाहीत; पण गुरुदेवांची कृपा गोवर्धन पर्वताप्रमाणे आहे. त्यांनीच मला गोवर्धन पर्वताखाली घेतले आहे. त्यामुळेच हे (आध्यात्मिक उन्नती) झाले आहे. सर्व सद्गुरु आणि संत यांची कृपा तर आहेच; पण श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकूंची विशेष कृपा जाणवते.
‘श्रीचित्शक्ति गाडगीळकाकू सूक्ष्मातून सोबत आहेत आणि त्यांचे प्रेम अन् आशीर्वाद मिळत आहेत’, असे अनुभवता येते. तसेच कोणतीही अडचण आली, तर मनात पहिले श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंचे नाव येते आणि मनातील सर्व विचार नष्ट होऊन जातात. समस्यांचा कितीही मोठा डोंगर कोसळला, तरी एक क्षण डोळे मिटून त्यांचे स्मरण केले की, कोणतीच अडचण आणि संकट टिकत नाही. काही वर्षांपूर्वी मनात नकारात्मक विचार येत होते आणि ‘मायेत परत जाईन का ?’, असे वाटत होते; पण त्यांनीच पकडून ठेवले आहे, असे जाणवले. केरळ राज्यात सेवा करतांना तेथील साधकांनी पुष्कळ सांभाळून घेतले आणि प्रेम दिले. माझा हा साधनेतील प्रवास गुरुदेवांनी निवडला होता. हा प्रवास चालू असून पुढे गुरुदेव आणखी काय आनंद देणार, याची उत्सुकता मनात अधिक निर्माण झाली आहे.’’
श्री. श्रीराम लुकतुके यांची कु. प्रणिता सुखटणकर यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
श्री. श्रीराम लुकतुके हे पूर्वी केरळ राज्यात प्रसारसेवेसाठी आले होते. तेव्हापासून आमचा संपर्क आहे. त्यांची मला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात झालेले पालट येथे दिले आहेत.
१. श्री. श्रीराम यांच्यामध्ये सहजता वाढली असून ते साधकांत सहजतेने मिसळत आहेत.
२. त्यांच्यातील प्रेमभाव वाढला असून इतरांना साहाय्य करण्याचा त्यांचा विचार असतो.
३. सध्या त्यांच्यात स्थिरता वाढली आहे, उदा. इतरांचे म्हणणे ऐकणे, इतरांना समजून घेणे.
४. ‘ते आता अधिक काळ भावस्थितीमध्ये असतात’, असे मला जाणवले.’
– कु. प्रणिता सुखटणकर, केरळ (१३.७.२०२४)