New Parliament Water Leakage :  विरोधी पक्षांकडून खोचक टीका आणि स्‍थगिती प्रस्‍ताव !

संसदेच्‍या नव्‍या इमारतीतील पाणीगळतीवरून विरोधकांचा गदारोळ !

नवी देहली – काँग्रेसचे तमिळनाडूमधील खासदार मनिकम टागोर यांनी ‘एक्‍स’द्वारे नवीन संसदेत एका ठिकाणी होत असलेल्‍या पाणीगळतीचा व्‍हिडिओ प्रसारित केला आहे. व्‍हिडिओमध्‍ये खाली बादली ठेवून ते पाणी जमा केले जात असल्‍याचे दृश्‍य दिसत आहे. यासंदर्भात विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप घेतला असून त्‍यासाठी संसदेत स्‍थगिती प्रस्‍ताव मांडला आहे. विरोधी पक्षाच्‍या अनेक खासदारांनी पाणीगळतीचा हा व्‍हिडिओ प्रसारित करत केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

१. टागोर यांनी खोचक शब्‍दांत लिहिले आहे की, बाहेर परीक्षेचे पेपर ‘लीक’ होत आहेत. संसदेत पाणी ‘लीक’ होत आहे. नव्‍या संसद भवनाचे काम होऊन केवळ १ वर्ष झाले आहे. त्‍यातही राष्‍ट्रपती स्‍वत: संसदेतील ज्‍या मार्गाचा वापर करतात, तिथेच होणारी पाण्‍याची गळती म्‍हणजे नव्‍या इमारतीतील समस्‍यांचे द्योतकच होय ! यासाठी आम्‍ही आज लोकसभेत स्‍थगन प्रस्‍ताव आणणार आहोत.

२. टागोर यांनी नव्‍या संसद भवनातील गळतीवर उपाय शोधण्‍यासाठी समितीची स्‍थापना करण्‍याची मागणी केली. ही समिती या पाणीगळतीच्‍या कारणांचा शोध घेईल, नव्‍या इमारतीच्‍या ढाच्‍याचा आणि त्‍यासाठी वापरलेल्‍या बांधकाम साहित्‍याचा आढावा घेईल अन् आवश्‍यक त्‍या उपाययोजना सुचवेल. त्‍याचसमवेत ही समिती नव्‍या इमारतीच्‍या देखभालीसंदर्भात निश्‍चित अशी नियमावली निश्‍चित करेल, असे टागोर म्‍हणाले.

३. काँग्रेस पक्षाच्‍या अधिकृत एक्‍स खात्‍यावरून हा व्‍हिडिओ प्रसारित करून त्‍यात ‘नई संसद’ असे दोन शब्‍दच लिहिले आहेत.

४. समाजवादी पक्षाचे अध्‍यक्ष अखिलेश यादव यांनी या सूत्रावरून पोस्‍ट प्रसारित करत म्‍हटले आहे की, नव्‍या संसदेपेक्षा तर जुनी संसद चांगली होती. तिथे जुने खासदारही येऊन भेटू शकत होते. पुन्‍हा जुन्‍या संसदेतच जाऊया का ? किमान जोपर्यंत नव्‍या संसदेत हा पाणीगळतीचा कार्यक्रम चालू आहे, तोपर्यंत तरी ? जनता विचारत आहे की, भाजप सरकारच्‍या काळात बांधलेले प्रत्‍येक नवीन छत गळते, हा त्‍यांनी विचारपूर्वक तयार केलेल्‍या ढाच्‍याचा भाग आहे का ?

संपादकीय भूमिका

नव्‍या संसदेच्‍या बांधकामात त्रुटी समोर येणे, ही अत्‍यंत गंभीर गोष्‍ट आहे. त्‍यावरून संबंधित अधिकार्‍यांच्‍या विरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे; पण प्रत्‍येक सूत्राचे राजकारण करून भारताची मान खाली करायला लावणार्‍या विरोधी पक्षांसाठी हे अधिक लांच्‍छनास्‍पदच होय !