Ram Lalla Stamp : लाओमध्ये श्रीरामलल्ला यांच्यावरील टपाल तिकिटाचे अनावरण !

परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांच्या हस्ते झाला कार्यक्रम !

श्रीरामलल्ला यांच्यावरील टपाल तिकिट

व्हिएन्टियान (लाओ) – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी ‘लाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक’ (लाओ पीडीआर) या देशाच्या तीन दिवसीय भेटीच्या वेळी अयोध्येतील श्रीरामलल्ला यांच्यावरील पहिल्या टपाल तिकिटाचे अनावरण केले. आसियानशी (दक्षिण पूर्व आशियातील देशांच्या संघटनेशी) संबंधित परराष्ट्रमंत्र्यांच्या कार्यक्रमांना उपस्थित रहाण्यासाठी ते लाओची राजधानी व्हिएन्टियानमध्ये होते.

श्रीरामलल्ला टपाल तिकीट प्रकाशित !

व्हिएन्टियान येथे जयशंकर आणि लाओचे उपपंतप्रधान तथा परराष्ट्रमंत्री सेलुमक्से कोमासिथ यांनी संयुक्तपणे टपाल तिकिटांच्या दोन संचांचे अनावरण केले. ‘लाओ आणि भारत यांचा सामायिक सांस्कृतिक वारसा साजरा करणे’, या संकल्पनेवर हे टपाल तिकीट प्रकाशित करण्यात आले. एका टपाल तिकिटावर अयोध्येतील श्रीरामलल्लाची मूर्ती दाखवण्यात आली आहे, तर दुसरे टपाल तिकीट लुआंग प्रबांगच्या भगवान बुद्धाच्या स्मरणार्थ काढण्यात आले आहे. लुआंग प्रबांग ही लाओची प्राचीन राजधानी आहे.

लाओ आता प्रामुख्याने बौद्ध देश आहे; परंतु त्याची संस्कृती आणि परंपरा यांवर हिंदु धर्माचा प्रभाव आहे. लाओमध्ये रामायण हे ‘रामकियेन’ किंवा ‘फ्रा लक फ्रा’ रामकथा म्हणून ओळखले जाते आणि लाओमधील महत्त्वपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमांच्या वेळी ते  सादर केले जाते.