गोव्यात ६८८ सरकारी प्राथमिक शाळांपैकी २५६ शाळा एकशिक्षकी !
|
पणजी, ३१ जुलै (वार्ता.) – राज्यातील ६८८ सरकारी प्राथमिक शाळांपैकी २५६ शाळांमध्ये एकच शिक्षक कार्यरत आहे. सर्वाधिक एकशिक्षकी शाळा सत्तरी आणि फोंडा तालुक्यांमध्ये आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत लेखी प्रश्नाला दिलेल्या उत्तरातून समोर आली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुढील माहिती दिली.
१. एकशिक्षकी शाळांची तालुकावर सूची पुढीलप्रमाणे आहे. पेडणे ५, काणकोण ६, धारबांदोडा ६, बार्देश ७, मुरगाव ७, डिचोली १०, तिसवाडी १३, सासष्टी १७, केपे १९, सांगे ४२, तर सत्तरी आणि फोंडा येथे प्रत्येकी ६२. चालू वर्षी या शाळा बंद करण्याचा सरकारचा प्रस्ताव नसल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. (सरकारी शाळेत अधिकाधिक विद्यार्थी शिक्षण घेतील अशा सोयीसुविधा आणि शिक्षणाचा दर्जा असणे, हीच या एकशिक्षकी शाळा बंद न पडण्यासाठीची उपाययोजना होऊ शकते ! – संपादक)
२. ‘समग्र शिक्षा अभियाना’साठी प्रत्येक तालुक्याला मिळून एकूण १२ ‘करियर’ (भवितव्य) समुपदेशकांच्या नियुक्तीचा प्रस्ताव आहे. ‘करियर’ समुपदेशकांची नियुक्तीची प्रक्रिया चालू आहे.
३. शाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी लवकरच धोरण सिद्ध केले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विचारलेल्या अन्य एका प्रश्नावरील उत्तरात दिली.
४. कुजिरा (बांबोळी) शिक्षण संकुलात गुन्हेगारी कृत्ये घडत असल्याने या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. संकुलात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंबंधी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.