सिंधुदुर्गातून एस्.टी.च्या लांब पल्ल्यासाठी धावणार्या शयनयान बसची सेवा बंद
कुडाळ – राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागातून लांब पल्ल्याच्या मार्गावर चालू करण्यात आलेल्या शयनयान बससेवा बंद करण्यात आली आहे. ही सेवा पुन्हा चालू न केल्यास एस्.टी. कामगार सेना या प्रकारातील भ्रष्टाचार आपल्या पद्धतीने उघड करील, अशी चेतावणी एस्.टी. कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख अनुप दयानंद नाईक यांनी दिली आहे.
याविषयी नाईक म्हणाले, ‘‘आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार लांब पल्ल्यासाठी चालू करण्यात आलेल्या शयनयान बसेस मुंबईतील एस्.टी. महामंडळाच्या कार्यालयाच्या पत्रानुसार कोल्हापूर विभागाकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. हे करण्यामागील मुख्य सूत्रधार कोण आहे हे समजले पाहिजे. एखादे दायित्व टाळायचे असेल, तर ‘वरिष्ठांच्या आदेशानुसार कार्यवाही केली’, हे साचेबद्ध उत्तर दिले जाते. भारमान (पुरेशी प्रवासी संख्या) नाही, हे कारण सांगून शयनयान गाड्या बंद केल्या असल्या, तरी या मागील मोठ्या घोटाळ्याचा पंचनामा आम्ही करणार आहोत. खासगी आराम बस व्यावसायिकांच्या लाभासाठी हा प्रकार केला जात नाही ना ? भारमान अल्प दाखवण्यासाठी वापरण्यात येणार्या क्लृप्त्या कोण वापरत आहे आणि ते कुणाच्या लाभासाठी आहे ? याचाही लवकरच उलगडा करणार आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून, तसेच गोवा राज्यातून ७० ते ८० खासगी गाड्या चालवल्या जात असतील आणि एक संपूर्ण महामंडळ राज्य सरकारच्या साथीने संपूर्ण जिल्ह्यातून ४ लांब पल्ल्याच्या गाड्या चालवू शकत नसेल, तर एस्.टी.च्या उद्देशावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.’’