‘शिधापत्रिका संगणक प्रणाली’तील त्रुटी दूर करून ऑगस्ट महिन्यात योग्य धान्य वाटप करा ! – ठाकरे गटाचे निवेदन
कोल्हापूर, ३१ जुलै (वार्ता.) – जुलै महिन्यात ‘शिधापत्रिका संगणक प्रणाली’तील तांत्रिक अडचणींमुळे शिधापत्रिका धारकांना धान्य मिळाले नाही. जुलै महिन्यात प्रचंड पाऊस आणि पुराचे पाणी आल्याने नागरिकांचे अगोदरच हाल होत आहेत. त्यामुळे शिधापत्रिका संगणक प्रणालीतील त्रुटी दूर करून ऑगस्ट महिन्यात जुलै महिन्यासह योग्य प्रकारे धान्य वाटप करा, या मागणीचे निवेदन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांना देण्यात आले. पुरवठा अधिकारी चव्हाण यांनी, ‘एकही शिधापत्रिकाधारक धान्य मिळण्यापासून वंचित रहाणार नाही. हे धान्य मिळाल्याची सूची दुकानदारांकडून घेऊ’, असे आश्वासन दिले.
या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, सर्वश्री पोपट दांगट, विनोद खोत, विराज पाटील, हर्षल पाटील, राजू सांगावकर, दीपक रेडेकर, शरद माळी, राहुल गिरुले यांसह अन्य उपस्थित होते.