मुंबई-गोवा महामार्ग : शासकीय निधीतून पावसाळ्यात महापुराची स्थिती निर्माण होण्यासाठी केलेली व्यवस्था !

मुंबई-गोवा महामार्ग म्हणजे शासकीय निधीचा महापूर अन् अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) कलेचा भस्मासुर ! मुंबई-गोवा महामार्ग कोट्यवधी रुपये व्यय करून सिद्ध करण्यात आला. यामुळे कोकणवासियांचे एक स्वप्न साकार झाले. ‘मुंबई ते गोवा प्रवास हा सुखकर होईल’, असे जणू ब्रीदवाक्य घेऊन हा महामार्ग उदयास आला. ‘खड्डेमुक्त प्रवास’, ‘वारंवार महामार्गावर पडणार्‍या झाडांपासून मुक्तता’, ‘अतीवृष्टीत महामार्गावर पाणी येऊन होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी त्याची वाढवलेली उंची’, असे या महामार्गाचे अनेक पैलू सांगण्यात आले.

मुंबई- गोवा महामार्गाची दुर्दशा

१. कोट्यवधी रुपये व्यय करूनही सुखकर प्रवास एक स्वप्न !

श्री. राजाराम परब

महामार्गाच्या चौपदरीकरणात पैशाची कुठेच कमतरता ठेवण्यात आली नाही. प्रकल्पग्रस्तांना अगदी ४ पट पैसै वितरित करण्यात आले. अपघात टाळण्यासाठी अनेक ठिकाणी बॉक्सवेल ‘अंडरपास’ (पुलाच्या खालून जाणारा दुसरा मार्ग), पूल, मोठमोठे पथदीप यांसाठीही कोट्यवधी रुपये व्यय करण्यात आले. महामार्गावर शासकीय निधी अशा प्रकारे व्यय करण्यात येत असतांना महामार्गावरील सुखकर प्रवासाचे स्वप्न दृष्टीक्षेपात येत असल्याचे वाहनधारकांना जाणवले; मात्र प्रत्यक्षात हे एक स्वप्नच राहिले.

प्रत्यक्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओरोस, पावशी भागात पाणी भरून महामार्ग ठप्प झालाच ! महामार्गाची उंची अधिक असल्याने पाण्याचा निचरा होऊ शकत नसल्याने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. यापूर्वी क्वचित् प्रसंगी जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होत असे; मात्र महामार्ग झाल्यापासून प्रतिवर्षीच पूरस्थिती निर्माण होऊ लागली आहे. अनेक ठिकाणी डोंगर कापल्याने तेथे अतीवृष्टीत दरड कोसळण्याची भीती निर्माण झाली. महामार्गावर खड्ड्यांचे जाळे पसरले आहे. अनेक ठिकाणी ओबडधोबड काँक्रिटीकरण केल्याने वारंवार अपघात घडतात. आवश्यक त्या ठिकाणी ‘बॉक्सवेल’ नसल्याने वाहनधारकांना जीवघेणा प्रवास आजही चुकलेला नाही. अनेक मोठमोठे पथदीप बंदच असल्याने ते शोभेचेच ठरले आहेत.

२. अभियांत्रिकी कला निष्प्रभ झाल्याचा प्रत्यय

यावर्षी तर अनेक ठिकाणी महामार्गावर पाणी आल्याने हा पाण्याचा महापूर नसून जणू शासकीय निधीचाच महापूर असल्याचे प्रत्ययास आले. अनेक तांत्रिक चुका राहिल्याने प्रत्यक्षात वस्तूस्थितीची पहाणी न करता आराखडा सिद्ध करण्यात आलेल्या शास्त्रशुद्ध अशा अभियांत्रिकी कलाही या ठिकाणी निष्प्रभ ठरल्याने या कलेचा जणू भस्मासुरच झाल्याचा प्रत्यय या कामात येत आहे.

– श्री. राजाराम परब, तेर्सेबांबर्डे, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग.