साधेपणा !

नेदरलँड्सचे पंतप्रधान राहिलेले मार्क रूटे यांनी पदाचे त्यागपत्र दिल्यानंतर सायकलवर बसून घरी जातांना.

युरोपमधील नेदरलँड्सचे १४ वर्षे पंतप्रधान राहिलेले मार्क रूटे यांनी नुकतेच त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले. यानंतर ते सायकलवर बसून घरी निघून गेले. अनेक देशांमध्ये अशा प्रकारच्या घटनांच्या वेळी मोठे कार्यक्रम केले जातात; मात्र रूटे यांनी साधेपणाने हस्तांतरण केले. या घटनेचा ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यावर अनेकांनी रूटे यांच्या साधेपणाचे कौतुक केले आहे. राष्ट्रीय स्तरावरील एवढे मोठे पद भूषवणारी व्यक्ती सायकलवरून प्रवास करते, ही घटनाच आश्चर्यचकित करणारी आहे; किंबहुना भारतात सध्या तरी ते अशक्यच आहे ! व्यक्तीचा स्वभाव हा तिच्या आचार-विचारांतून उलगडतो. कित्येकदा विचार उच्च दर्जाचे असले, तरी आचरण मात्र त्यानुसार नसल्याचे पहायला मिळते; परंतु देशाचे पंतप्रधानपद भूषवल्यानंतर कोणताही गाजावाजा न करता भावी पंतप्रधानांना शुभेच्छा देऊन नम्रपणे निघून जाणारे मार्क रूटे म्हणूनच कौतुकास पात्र आहेत ! राजकारणातून निवृत्ती घेतल्यावरही तेथील व्यक्तींना सर्वसामान्यांप्रमाणे नियम लागू असतात, तसेच संबंधित व्यक्ती चाकरीही करू शकते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे याचे आताच्या काळातील असेच एक उदाहरण आहे. इतकेच काय, तर राजकारणात महत्त्वाच्या पदावर असतांना वाहतूक इत्यादी संदर्भातील नियम न पाळल्यास त्यांनाही शिक्षा झाल्याची उदाहरणे विदेशात पहायला मिळतात. ‘नियम हे सर्वांसाठी सारखेच असायला हवेत’, या तत्त्वाचे पालन विदेशात पुष्कळ चांगल्या प्रकारे केले जाते.

भारताचा विचार केल्यास ग्रामपंचायत निवडणुकीला उभे राहिलेल्या उमेदवाराचाही थाट एवढा असतो की, जणू मोठे युद्धच जिंकून आला आहे. मग नगरसेवक, आमदार, खासदार यांची जीवनशैली कशी असेल, याचा तर विचारच करायला नको. संबंधित व्यक्तीचे नातेवाईकही अगदी ऐषोआरामात जगत असतात. त्यामुळे सर्वसामान्यांपासून स्वत: श्रेष्ठ समजण्याची भावना आपोआप निर्माण होते अन् पुढे ती वाढत जाऊन अहंकार वाढत जातो. मस्तवाल जीवनशैली, वर्चस्ववादी वृत्ती, कुणाचा धाक नसल्याने वाढलेला उद्दामपणा अन् पैशांची उधळपट्टी यांमुळे समाजहित किंवा राष्ट्रहित यांपेक्षा त्यास बाधक ठरणार्‍याच कृती त्यांच्याकडून अधिक प्रमाणात घडतात. भारतात राजकीय व्यक्तींना एवढ्या प्रचंड सोयीसुविधा आहेत की, त्यांना आयुष्यभरच काय, तर त्यांच्या पुढील काही पिढ्याही ऐषोआरामात जगतात. आमदार, खासदार यांसारखी राजकारणातील मंडळी पांढर्‍या कपड्यांमध्ये पहायला मिळतात; परंतु तेवढा साधेपणा पुरेसा नसून स्वत:चे आचरण सुधारणे अन् स्वत:पेक्षा समाज, राष्ट्र, जनता यांचा विचार अधिक होऊन त्यांच्याकडून कार्य होणे आवश्यक आहे ! तूर्तास तरी पाश्चात्त्यांचे अनुकरण करण्यात पुढे असलेल्या भारतियांनी रूटे यांच्या साधेपणातून शिकावे एवढेच !

– श्री. संदेश नाणोसकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.