जोगेश्वरी (मुंबई) येथील ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. आयुष अनिल कदम (वय १४ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. आयुष कदम हा या पिढीतील एक आहे !
कु. आयुष अनिल कदम याची त्याच्या आईच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ |
१. वय ६ मास ते १ वर्ष
१ अ. ‘कु. आयुषला स्वच्छता आवडते. तो वस्तू जागेवर ठेवतो.
२. वय २ ते ५ वर्षे
अ. तो बाहेर गेल्यानंतर त्याचे अन्य मुलांप्रमाणे खाण्या-पिण्याकडे लक्ष नसते.
आ. त्याला सात्त्विक जेवण आवडते. त्याच्या ताटात जे वाढलेले असते, ते तो खातो आणि त्या जेवणाचे कौतुकही करतो.
३. वय ६ ते ८ वर्षे
३ अ. मी घरी राहून सनातन संस्थेच्या संपर्कात येणार्या जिज्ञासूंना भ्रमणभाषवरून संपर्क करत असे. तेव्हा त्या संदर्भातील माहिती आयुष एका वहीत लिहून घेत असे. तो ही सेवा आनंदाने करत असे.
४. वय ९ ते १४ वर्षे
४ अ. आईला सेवेत साहाय्य करणे : मी धर्मशिक्षणवर्ग घेत असतांना तो शांतपणे बसून माझे बोलणे ऐकत असे. तो माझ्या समवेत सेवेसाठी येतो. तो मला सात्त्विक उत्पादनांचे वितरण करणे आणि गुरुपौर्णिमेचा प्रसार करणे, यांत साहाय्य करतो.
४ आ. आयुषच्या चेहर्यावर नेहमी आनंद जाणवतो.
४ इ. आसक्ती नसणे : आयुष नेहमी आवश्यक असेल, तरच वस्तू विकत घेतो. एकदा त्याचे वडील त्याच्यासाठी पादत्राणांचे २ जोड विकत घेत होते; पण त्याने वडिलांना एकच जोड घ्यायला सांगितला.
४ ई. धर्माभिमान : त्याला टिळा लावायला आवडते. ‘देवतांच्या संदर्भात कुणी अयोग्य गोष्ट करत असेल, तर त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे’, असे तो सांगतो.
४ उ. वडिलांच्या मृत्यूनंतर स्थिर असणे : २५.११.२०२३ या दिवशी आयुषच्या वडिलांचे रक्तदाब वाढल्यामुळे निधन झाले. मला आयुषला त्याच्या वडिलांच्या निधनाबद्दल गुरुदेवांच्या कृपेमुळे सांगता आले. मी त्याला सांगितले, ‘‘उद्या आपल्याकडे पुष्कळ लोक येतील. तुला सगळे पहावे लागेल आणि करावे लागेल.’’ तेव्हा तो मला म्हणाला, ‘‘हो आई, मी करीन.’’ आयुषने त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर १२ व्या दिवसापर्यंतचे सर्व विधी केले. त्या वेळी तो स्थिर होता. तो माझी काळजी घेऊ लागला.
४ ऊ. गुरुंप्रती भाव : आयुषमध्ये प.पू. गुरुदेवांप्रती पुष्कळ भाव आहे. तो गुरुदेवांना आजोबा म्हणतो. तो मला नेहमी विचारतो, ‘‘आई, आपण आजोबांना भेटायला गोव्याला कधी जाऊया ? मला त्यांना पहायचे आहे.’’ आयुष १२ वर्षांचा असतांना त्याने काही चित्रे काढली. त्यात जिवंतपणा जाणवतो. त्याने स्वामी समर्थ आणि प.पू. गुरुदेव यांची चित्रे काढली आहेत. त्याने गणपतीची मूर्ती बनवली आहे. त्याने काढलेले प.पू. गुरुदेवांचे चित्र प.पू. गुरुदेवांना दाखवल्यावर त्यांनी ‘चित्र आवडले’, असे कळवले.
५. आयुषचे स्वभावदोष
चिडचिडेपणा आणि अनावश्यक बोलणे.’
– श्रीमती मंजिरी अनिल कदम (कु. आयुषची आई), जोगेश्वरी, मुंबई. (२१.३.२०२४)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |