संपादकीय : इस्रायलने सूड घेतलाच !
७ ऑक्टोबर २०२३ या दिवशी हमास या पॅलेस्टाईनच्या आतंकवादी संघटनेने इस्रायलवर केलेल्या आक्रमणाचा सूड इस्रायलने अंततः घेतला. या संघटनेचा ६२ वर्षीय प्रमुख इस्माईल हानिया याला इराणची राजधानी तेहरानमध्ये घुसून इस्रायलने ठार केले. इतकेच नव्हे, याच वेळी इस्रायलने लेबनॉनची राजधानी बैरूत येथे हिजबुल्ला या आतंकवादी संघटनेचा वरिष्ठ आतंकवादी नेता फुआद शुक्र यालाही ठार केले. क्षेपणास्त्र आणि एअर स्ट्राईक यांद्वारे या दोघांना ठार करण्यात आले. ‘ही दोन्ही शहरे त्या देशांची राजधानी आहेत’, हे लक्षात घ्यायला हवे. आतंकवाद नष्ट करण्यासाठी काय केले पाहिजे ? हे इस्रायलने प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे. ‘घर में घुसकर मारेंगे’, हे कसे असते, त्याचे प्रत्यक्ष दर्शन इस्रायलने पुन्हा एकदा दाखवून दिले. इस्रायल अनेक वर्षांपासून शत्रूच्या विरोधात अशी कारवाई विविध देशांमध्ये जाऊन करत आला आहे. इस्रायल प्रत्यक्ष करून दाखवतो, तर भारत केवळ बोलण्यातच वेळ दवडत असतो, हे लक्षात घ्यायला हवे. ‘भारत पाकची राजधानी इस्लामाबादमध्ये घुसून आतंकवाद्यांना ठार करू शकतो का ?’, हा प्रश्न आहे. ‘इराण आणि लेबनॉन या देशांमध्ये घुसून आतंकवाद्यांना मारल्याने हे दोन्ही देश इस्रायलवर आक्रमण करू शकतात’, अशी भीतीही इस्रायलला वाटलेली नाही’, हे लक्षात घ्यायला हवे.
भारत इस्रायलकडून काहीच शिकला नाही !
इस्रायल केवळ गाझामध्येच नाही, तर इराण, लेबनॉन या देशांमध्येही घुसून आतंकवाद्यांना लक्ष्य करत आहे. दुसरीकडे गेल्या महिन्याभरात पाकिस्तानी आतंकवाद्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये केलेल्या आक्रमणांमध्ये १६ भारतीय सैनिकांना वीरमरण आले. ६०० हून अधिक पाकिस्तानी सैनिक जम्मूमध्ये घुसले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. हे पहाता भारत इस्रायलकडून काहीच शिकलेला नाही, हे लक्षात येते. इस्रायलशी मैत्री ठेवणे, हा एक भाग झाला, तर या मित्राकडून जे भारताच्या हिताचे आहे, ते शिकून त्यानुसार कृती करणेही आवश्यक आहे. छोटासा इस्रायल जे करू शकत आहे, ते अण्वस्त्रधारी आणि ५ वी जागतिक अर्थव्यवस्था असणारा भारत करू शकत नाही, हे भारतासाठी लज्जास्पद आहे. इस्रायलने केवळ हानिया यालाच ठार केले नाही, तर गेल्या १० मासांमध्ये त्याने हानियाची बहीण, भाऊ, पुतणे, मुले, नातवंडे आदी सर्वांना ठार केले आहे. ‘आतंकवाद्यांचा समूळ नाश म्हणजे काय ?’, याचे उदाहरण इस्रायलने समोर ठेवले आहे. भारत जवळपास ३५ वर्षे जिहादी आतंकवादाने ग्रस्त आहे. गेल्या १० वर्षांत भारताने यावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवले असले, तरी या आतंकवाद्यांचा निर्माता असणारा पाकिस्तान याला तो धडा शिकवू शकलेला नाही.
भारताची गांधीगिरी !
उरी आणि पठाणकोट येथील सैन्यावरील आक्रमणांनंतर भारताने पाकमध्ये घुसून कारवाई केली, तरी त्यातून आतंकवाद नष्ट झालेला नाही. आजही आतंकवादी आणि पाकिस्तानी सैनिक भारतात घुसखोरी करू शकत आहेत. जम्मूमध्ये पाकिस्तानी सैनिक घुसल्याने पुन्हा युद्धाची स्थिती निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे. भारताच्या जागेवर इस्रायल असता, तर एव्हाना त्याने पाकिस्तानला जगाच्या नकाशावरून हटवले असते. ‘अशी मानसिकता, नेतृत्व आणि प्रखर राष्ट्रप्रेम आतापर्यंतच्या सर्वपक्षीय भारतीय शासनकर्त्यांमध्ये कधीच दिसले नाही’, हे भारतियांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. तथाकथित आंतरराष्ट्रीय दबावाच्या नावाखाली भारत गांधीगिरी करत राहिल्यानेच काश्मीरमधील आतंकवाद मुळासकट नष्ट होऊ शकलेला नाही. भारताने एकाही आतंकवादी संघटनेच्या प्रमुखाला आतापर्यंत ठार केलेले नाही. मुंबईवरील २६/११ च्या आक्रमणातील सूत्रधार हाफिज सईद आजही पाकिस्तानमध्ये सुखनैव रहात आहे.
कंधार विमान अपहरण प्रकरणात सुटका करण्यात आलेले प्रमुख आतंकवादी आजही भारताच्या विरोधात कारवाया करत आहेत. दाऊद इब्राहिम याच्यावरही भारत कारवाई करू शकला नाही. इस्रायल हमासला नष्ट केल्याविना स्वस्थ बसणार नाही. भारत लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनांना नष्ट करू शकलेला नाही. विशेष म्हणजे तसा प्रयत्नही केलेला नाही. यातून इस्रायलसमोर भारत किती छोटा आहे, हे स्पष्ट होते. गेल्या काही महिन्यांमध्ये पाकिस्तानमध्ये भारतविरोधी आतंकवाद्यांच्या हत्या होत आहेत, यामागे भारत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. भारताने असे केले असेल, तर त्याचा भारतियांना सार्थ अभिमानच असेल. तरीही भारताला काही करायचे असेल, तर अशा गोष्टी करण्यासह मुळावर घाव घालण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
भारताला इस्रायली शासनकर्ते हवेत !
इस्रायलने गेल्या १० महिन्यांमध्ये गाझा पट्टी बेचिराख केली आहे. विशेष म्हणजे इतके होऊनही हमासने ओलीस ठेवलेल्या इस्रायलच्या लोकांना सोडलेले नाही. अनेकांना ठार करण्यात आले आहे. महिला ओलिसांवर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. हमास किती क्रूर आहे, हे यातून लक्षात येते. अशा आतंकवादी संघटनेसमवेत गांधीगिरी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच वागले पाहिजे, हे इस्रायलला ठाऊक आहे आणि तो तसेच करत आहे. अद्याप हमासचा आणखी एक मोठा नेता याह्या सिनवार जिवंत आहे. ‘त्यालाही इस्रायल ठार करणार’, असेच म्हटले जात आहे. जोपर्यंत हमास नष्ट होत नाही आणि ओलिसांची सुटका होत नाही, तोपर्यंत हमास-इस्रायल युद्ध थांबणार नाही. इस्रायलच्या कणखर मनोवृत्तीमुळेच तो त्याच्या शेजारी असणार्या ७ इस्लामी राष्ट्रांशी गेली ७५ वर्षे सामना करून टिकून उभा आहे. भारताने पाकविरोधात कारवाई केली, तर मुसलमानप्रेमी राजकीय पक्ष त्याचा विरोध करतात आणि सैन्याचे, सरकारचे पाय खेचण्याचा प्रयत्न करतात. हा इस्रायल आणि भारत यांच्यातील प्रमुख भेद आहे. यामुळेच भारत जिहादी आतंकवाद्यांच्या आणि पाकिस्तानच्या विरोधात कठोर कारवाई करू धजावला नाही. भारताने वर्ष १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून तो भाग पुन्हा भारताला जोडला नाही. तेथे नवीन बांगलादेश स्थापन केला. उलट इस्रायलने १९६० च्या दशकात गाझा पट्टी कह्यात घेतली होती आणि जवळपास ३० वर्षे स्वतःकडे ठेवली. ती पुन्हा पॅलेस्टाईनकडे दिल्यावर हमास ही आतंकवादी संघटना पुन्हा वाढली. भारत गेल्या ७५ वर्षांत पाकव्याप्त काश्मीर परत घेऊ शकलेला नाही. भारतात इस्रायली शासनकर्ते असते, तर भारत एव्हाना महाशक्ती बनला असता. कदाचित् भारत पुन्हा अखंड भारतही झाला असता, ही अतिशयोक्ती ठरणार नाही.
इस्रायलप्रमाणे भारताने जिहादी आतंकवाद्यांच्या विरोधात कारवाई केली असती, तर एव्हाना भारत आतंकवादमुक्त झाला असता ! |