कुख्यात गुंड अरुण गवळी याला पॅरोलवर सुटी देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
मुंबई – कुख्यात गुंड अरुण गवळी याला पॅरोलवर (पॅरोल म्हणजे संचित रजा) सुटी देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. काही दिवसांपूर्वी अरुण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाच्या आदेशानुसार मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश देण्यात आले होते; पण त्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत वरील निर्णय देण्यात आला. त्यामुळे अरुण गवळी याला कारागृहातच रहावे लागणार आहे.
नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येच्या प्रकरणात अरुण गवळी याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. याच गुन्ह्यात अरुण गवळी नागपूर कारागृहात शिक्षा भोगत आहे. यामध्ये त्याने १४ वर्षे शिक्षा भोगली असून ‘आता ६५ पेक्षा जास्त वय असल्यामुळे शिक्षेतून सुटका करण्यात यावी’, अशी मागणी केली होती; पण सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या याचिकेवरील पुढची सुनावणी नोव्हेंबरमध्ये होणार आहे.