लोकमान्य टिळक आणि क्रांतीकारक यांचे संबंध
आज असलेल्या लोकमान्य टिळक यांच्या १०४ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन !
लोकमान्य टिळक यांच्या मन-मस्तिषकावर १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याचा आणि आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या सशस्त्र कार्याचा संस्कार झाला होता. या २ घटना ब्रिटीश सरकारला अस्वस्थ करत होत्या. ब्रिटीश सत्तेच्या विरुद्ध अशा प्रकारचा सशस्त्र लढा भविष्यात पुनश्च उभा राहू नये; म्हणून ब्रिटीश सरकारने राष्ट्रीय सभेची, म्हणजेच काँग्रेसची स्थापना केली. ‘हिंदुस्थानच्या जनतेने काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आवेदन पत्राद्वारे त्यांच्या मागण्या लेखी स्वरूपात सरकारकडे विनंतीच्या स्वरूपात कराव्यात, म्हणजे सरकार त्यांच्या मागण्यांची पूर्तता करील’, असे आश्वासन ब्रिटीश सरकारकडून देण्यात आले. ब्रिटीश सरकारने अशा प्रकारे सशस्त्र लढ्याला आळा घालण्याचा प्रयत्न केला.
लोकमान्य टिळक यांना मनापासून या गोष्टी मान्य नव्हत्या; म्हणून त्यांनी त्यांची जहाल मते मांडण्यास आरंभ केला. काँग्रेसमध्ये २ गट पडले, त्यापैकी एक गट मवाळवादी, तर दुसरा जहालवादी ! लोकमान्य टिळक यांनी वर्ष १९०३ मध्ये त्यांची भूमिका दैनिक ‘केसरी’मधून व्यक्त करतांना लिहिले, ‘देश कार्य सिद्धीस जाण्यासाठी साधनांची अनेकता उपयुक्त असून देशभक्ताच्या पिंडरचनेप्रमाणे ज्याने त्याने आपापले मार्ग पसंत करणे योग्य आहे. देशाला स्वराज्य मिळवण्यासाठी शत्रूस वेळप्रसंगी नमस्कार घालण्यापासून राज्य क्रांतीकारक कोणताही शेवटचा बंडखोरीचा अंतिम जालीम उपाय ज्यास सुचेल तो अवलंबण्यास मी सिद्ध आहे.’ लोकमान्य टिळक यांनी दैनिक ‘केसरी’तून व्यक्त केलेल्या विचारांना कधी सोडचिठ्ठी दिली नाही.
१. लोकमान्य टिळक यांनी दामोदरपंत चापेकर यांच्या लष्करी शिक्षण घेण्याच्या इच्छेसाठी साहाय्य करणे
दामोदरपंत चापेकर यांना लष्करी शिक्षण घेण्याची उत्कट इच्छा होती. तसा त्यांनी प्रयत्न केला; पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही; म्हणून दामोदरपंत चापेकर लोकमान्य टिळक यांना भेटण्यासाठी गेले. त्यांनी त्या भेटीत लष्करात जाण्याचे त्यांची इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली. चापेकरांची कळकळ त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी चापेकरांना साहाय्य करण्याचे ठरवले. लोकमान्य टिळक यांनी श्यामजी कृष्ण वर्मा यांच्याशी पत्राद्वारे संपर्क साधून त्यांना कळवले, ‘येथील एक ब्राह्मण सद्गृहस्थ कारकूनी करण्यापेक्षा सैनिक होण्याची इच्छा बाळगून आहे. एखाद्या संस्थानिकाचा व्यक्तीगत सेवक किंवा अंगरक्षक व्हावे, असे त्याला वाटते. तेही समजा जमले नाही, तर सैन्यात जाण्याची त्याची सिद्धता आहे. उदयपूर संस्थानात त्याला अशी एखादी संधी मिळण्याची शक्यता आहे का ? तुम्ही येथे आला, तर या तरुणाविषयी मी प्रत्यक्ष भेटीतच तुमच्याशी बोलेन.’ टिळकांच्या या प्रयत्नाला यश आले नाही. त्यामुळे दामोदरपंत चापेकर यांची सैन्यात जाण्याची इच्छा अखेरपर्यंत पूर्ण झाली नाही.
२. चापेकर यांनी टिळक यांच्या बोलण्यातून रँडच्या विरोधात प्रतिशोध घेण्याचे ठरवून कृती करणे
भारतमातेला परकीय सत्तेच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी दामोदरपंत चापेकर यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारला. पुण्यात प्लेगची साथ पसरली असतांना रँडने जो अत्याचार केला, त्याचा संताप चापेकर यांना आवरता आला नाही. रँडने या काळात आपल्या देशातील माता-भगिनींवर अत्याचार केले. त्यामुळे पुण्यातील जनता हैराण झाली होती. रँडच्या या दुष्कर्माचा प्रतिशोध घेणे नितांत आवश्यक होते. १२ जून १८९७ या दिवशी पुण्याच्या लकडी पुलाजवळच्या विठ्ठल मंदिरात लोकमान्य टिळक यांचे छत्रपती शिवाजी महाराजांवर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या प्रसंगी दामोदरपंत चापेकर यांनी स्वरचित एक कवन सादर केले.
‘नाही होत स्वतंत्रता शिवकथा, घोटून भाटापरी ।
घ्यावे लागतसे शिवाजी बाजी परी हे, मस्तक स्वहस्तावरी ।
हे जाणूनी तुम्ही आता सुजन हो, घ्या खड्ग ढाल हाती ।
मारा थाप भुजावरी अरी शिरे, तोडू असंख्यात ती ।।’
या कवितेतून दामोदरपंत चापेकर आपल्या बांधवांना सांगतात, ‘छत्रपती शिवरायांनी त्यांच्या काळातील शत्रू मारला. त्याप्रमाणे आपल्याला आपल्या काळातील शत्रू मारला पाहिजे, तरच शिवरायांचा जयंतीचा उत्सव साजरा करण्यात काही अर्थ आहे.’ ते पुढे म्हणाले,
‘गोरा लोक सुटे निरर्थ सबबी, सांगोनिया हा कसा ? ।
न्यायाच्या अजि मंदिरी दिसतसे, अन्याय हा फारसा ।।
होती काय बिशाद वक्र नयने, पाही परस्त्री कुणी ।
म्यानातून सहस्र तीक्ष्ण असिका, बाहेर ये त्या क्षणी ।।
आता अग्निरथांत संधी बघुनि, हस्ते स्त्रिया ओढती ।
षंढांनो, करितां कसे सहन हे ? लावूनी घ्या दाद ती ।।
व्याख्यान झाल्यानंतर टिळक यांनी चापेकर यांना स्वतःच्या समीप बोलावून घेतले आणि त्यांना म्हणाले, ‘आज ज्यांची ज्यांची भाषणे येथे झाली, त्यांना तुम्ही षंढ म्हणाला; पण श्लोक म्हणणार्यात जर काही पौरुषत्व असते, तर रँड आतापर्यंत जिवंत राहिला नसता.’ लोकमान्य टिळक यांचे हे उद्गार दामोदरपंत चापेकर यांना पुढची कृती करण्यासाठी प्रेरणा देणारे म्हणजे रँडचा वध करण्याची जणू आज्ञाच दिली होती. लोकमान्य टिळक यांच्या त्या दिवसाच्या व्याख्यानानंतर पुढचे १० दिवस पुण्यातील वातावरण दिवसेंदिवस तापत गेले.
दामोदरपंत चापेकर यांनी २२ जून १८९७ इंग्लंडच्या राणीचा हिरकमहोत्सवाचा दिवस रँडचा वध करण्यासाठी निश्चित केला.
३. लोकमान्य टिळक यांनी पोलीस अधिकार्याला रँड वधाच्या अन्वेषणात सहकार्य न करण्याविषयी सांगणे
रँडचा वध झाल्यानंतर पुण्याचा जिल्हाधिकारी लॅम्ब एक सभा आयोजित केली होती. त्या सभेत रँडच्या वधाला लोकमान्य टिळक यांचा पाठिंबा असल्याचे सूचित करतांना लॅम्ब म्हणाला, ‘ज्यांचे लेख राजद्रोहाने ओथंबलेले असतात आणि ज्यांच्या कृतीत खुनावाचून दुसरे काही मिळवायचे नाही, अशा राजकीय चळवळ करणार्या रखरखलेल्या निखार्यांना कायमचे विझवण्याची तुमच्या अंगात शक्ती आहे.’
जिल्हाधिकार्यांच्या या उद्गारामुळे रँड वधाचा छडा लावण्याचे काम करणारा पोलीस अधिकारी ब्रुइन सरळ लोकमान्य टिळक यांच्या घरी गेला. त्यांना भेटून तो म्हणाला, ‘रँडचा खुनी कोण आहे ? त्याचा शोध आम्ही घेत आहोत. या शोधकामात आपण जर आम्हाला साहाय्य केले, तर आमच्यावर उपकार होतील.’ लोकमान्य टिळक ब्रुइनला म्हणाले, ‘तुम्हाला याविषयी कोणत्याही प्रकारचे सहकार्य मला करता येईल, असे वाटत नाही. एक तर याविषयीची कोणतीही माहिती माझ्याकडे नाही आणि समजा जर मला काही माहिती मिळालीच, तर ती मी तुम्हाला सांगणार नाही; कारण अपराध्याला शिक्षा होणे, हे न्याय असले, तरीसुद्धा मी गुप्तहेरचे काम करून कुणाचाही विश्वासघात करणार नाही. दुसरे महत्त्वाचे असे की, ब्रिटीश पोलिसांचा संपूर्ण जगात दबदबा आहे. मी जर तुम्हाला सर्व प्रकारची माहिती दिली, तर मी दिलेल्या माहितीच्या बळावर तुम्ही अपराध्यापर्यंत पोचलात, यात तुमचे कर्तृत्व काय ? यामुळे तुमची जी प्रतिष्ठा आहे, ती धुळीला मिळेल. तसे करण्याची माझी इच्छा नाही. तसेच तुम्ही जे तपासकार्य करत आहात, त्यात मी लुडबूड करणार नाही. जिल्हाधिकारी म्हणतात त्याप्रमाणे या खुनामुळे पुण्याला लांछन लागले आहे, असे मला अजिबात वाटत नाही.’
४. लोकमान्य टिळक यांनी दामोदरपंत चापेकर यांची अखेरची इच्छा पूर्ण करणे
अखेरीस रँडचा वध करणार्या देशभक्तांना पकडून फाशीची शिक्षा देण्यात आली. दामोदरपंत चापेकर यांना भेटण्यासाठी लोकमान्य टिळक कारागृहात गेले. त्या वेळी दामोदरपंतांनी लोकमान्य टिळक यांना विनंती केली, ‘माझ्या मृतदेहाला भलत्या सलत्या कुणाचाही स्पर्श होऊ नये, याची आपण काळजी घ्यावी.’ लोकमान्य टिळक यांनी दामोदरपंत चापेकर यांची अखेरची इच्छा पूर्ण करण्यासाठी धोंडोपंत विध्वंस या त्यांच्या भाच्याला सांगून दामोदरपंतांचा पार्थिव देह मिळवला. दामोदरपंतांच्या इच्छेनुसार त्यांच्या पार्थिव देहावर वैदिक धर्मानुसार अंत्यसंस्कार करवले.
५. अनेक क्रांतीकारकांना लोकमान्य टिळक यांनी दिशा देणे
देशातील विविध भागातील क्रांतीकारकांशी लोकमान्य टिळक यांचा संबंध होता. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी कुणीही सशस्त्र आणि नि:शस्त्र कोणत्याही मार्गाचा अवलंब केला, तरी लोकमान्य टिळक यांचा त्याला विरोध नव्हता. लोकमान्य टिळक यांनी सशस्त्र क्रांतीकारकांवर कधीही कोणत्याही प्रकारची टीका केली नाही किंवा त्यांच्या कार्याचा अथवा त्यांनी स्वीकारलेल्या मार्गाचा निषेधही केला नाही. श्यामजी कृष्ण वर्मा, लाला हरदयाळ, विष्णुपंत पिंगळे, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा एक ना अनेक क्रांतीकारकांना लोकमान्य टिळक यांचा आशीर्वाद लाभला होता.
१४ फेब्रुवारी १९०८ या दिवशी लोकमान्य टिळक यांनी श्यामजी कृष्ण वर्मा यांना एक पत्र दिले. त्यात लाला हरदयाळ यांच्याविषयी लोकमान्य टिळक लिहितात, ‘मी हरदयाळ यांची भेट घेतली आणि पंजाबमध्ये करावयाच्या कार्याविषयीची माझी मते त्यांना सांगितली. माझी बहुतेक सर्व मते त्यांना पटली असून शक्य तितक्या लवकर ते पंजाबमध्ये कार्यारंभ करतील. हे तरुण गृहस्थ पंजाबचे राष्ट्रीय नेते म्हणून लवकरच पुढे येतील आणि राष्ट्रीय पक्षाचे एक आधारस्तंभ बनतील, असे मला वाटते.’ (साभार : ‘लोकमान्य टिळक दर्शन’ या पुस्तकातून)
६. लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना क्रांतीकार्यात केलेले साहाय्य
वर्ष १९०५ मध्ये कर्झन वायलीने बंगालची फाळणी केली. त्याच्या विरोधात लोकमान्य टिळक यांनी संपूर्ण देश पेटवला होता. स्वातंत्र्यवीर सावरकर त्या वेळी फर्ग्युसन महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. त्यांनी विदेशी कपड्याची होळी करण्याचे ठरवले. त्या कार्यक्रमाला लोकमान्य टिळक उपस्थित राहिले. त्या प्रसंगाला त्यांनी अनुरूप असे भाषणही केले. सावरकर यांनी विदेशी कपड्याची होळी केली; म्हणून फर्ग्युसन महाविद्यालयाचे त्या वेळचे प्राचार्य रँग्लर परांजपे यांनी सावरकर यांना वसतीगृहातून बाहेर काढले. ही वार्ता कळताच लोकमान्य टिळक यांनी ‘हे आमचे गुरु नव्हेत !’, असे शीर्षक असलेला लेख लिहून सावरकर यांचा पक्ष घेतला.
पुढे सावरकर यांना अंदमानच्या कारागृहात अतोनात छळ सहन करावा लागला. त्यांची त्या कारावासातून मुक्तता व्हावी; म्हणून टिळक यांनी प्रयत्न केले; पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.
७. लोकमान्य टिळक आणि क्रांतीकारक यांच्या संबंधाविषयी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी काढलेले गौरवोद्गार !
अशा प्रकारे क्रांतीकारकांच्या पाठीशी आधारस्तंभ म्हणून उभे रहाणारे लोकमान्य टिळक आणि क्रांतीकारक यांचा परस्पर संबंध कसा होता, हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मोजक्या शब्दांत स्पष्ट केले आहे. सावरकर म्हणतात, ‘लोकमान्य टिळक जे मनात बोलत तेच आम्ही गर्जलो. ते जेथे थांबत तेथून आम्ही पुढे जात होतो. ते नेते राष्ट्राच्या एक पाऊल पुढे होते; पण त्यांना त्यांची पुढील पावले निर्वेधपणे टाकता यावीत; म्हणून आम्ही त्यांच्याही पुढे १०० पावले जाऊन झुंजून आमच्या राष्ट्राच्या सशस्त्र दळभाराचा मार्ग निष्कंटक करण्याचे प्रयत्न केले. जिथे त्यांची साधने बोथट होत होती, तिथे अचानक त्याच साधनांच्या लोखंडाला वितळवून आम्ही साधनांचे शस्त्र बनवले. बोथटपणाला धार पाजली. म्हणूनच आम्ही त्यांचे खरे निष्ठावंत अनुयायी; कारण त्यांच्यापुढे धावून त्यांचे मनोगत आणि उद्दिष्ट सिद्धीला नेण्यास झटलो. ते खड्गाची मूठ होते. आम्ही क्रांतीकारक त्याचे पाते होतो. खड्गाची मूठ ही जरी पाते होऊ शकत नाही, तरी पाते हे मुठीच्याच आधारावर रणकंदनी लवलवते. पाते मुठीच्याच मनोगताचे पारणे फेडत असते.’
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी व्यक्त केलेल्या या भावनेतून लोकमान्य टिळक आणि क्रांतीकारकांचे संबंध कसे होते, यावर अधिक भाष्य करण्याची आवश्यकता नाही.
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (२७.७.२०२४)