यात्रांना शिस्त लावण्यासाठी विहिंपची ‘धर्मयात्रा महासभा’ !
राज्यातील यात्रांचे व्यवस्थापन, स्वच्छ, सुंदर आणि शुद्ध असण्यावर भर !
नागपूर – राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे संत, सत्पुरुष, देवस्थानांच्या यात्रा भरतात. या यात्रांना लाखोंच्या संख्येने भाविक येतात. या निमित्ताने मोठी आर्थिक उलाढालही होते. या यात्रांना शिस्त लावण्यासाठी विश्व हिंदु परिषदेची धर्मयात्रा महासभा टप्प्याटप्प्याने राज्यातील यात्रांचे व्यवस्थापन करणार आहे. यात्रा स्वच्छ, सुंदर आणि शुद्ध असण्यावर भर रहाणार आहे, अशी माहिती ‘धर्मयात्रा महासभा आयामा’चे महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांचे नवनियुक्त प्रभारी राजेश्वर निवल यांनी दिली.
राजेश्वर निवल म्हणाले की,…
१. यात्रेत बेशिस्त, कमालीची अस्वच्छता, अव्यवस्थापन, प्रसादासाठी उडालेली झुंबड, दर्शनासाठी होणारी चेंगराचेंगरी या गोष्टी लक्षात येतात; म्हणून सामान्य माणूस यात्रेच्या ठिकाणी जाणे टाळतो. याच गोष्टी टाळून यात्रा हे पुन्हा आर्थिक उलाढाल आणि सामाजिक सलोख्याचे केंद्र व्हावे, यासाठी धर्मयात्रा महासभेने पुढाकार घेतला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पोहरादेवी आणि मुंगसाजी महाराज यात्रेचे नेटके व्यवस्थापन धर्मयात्रा महासभेने यापूर्वी केलेले आहे.
२. यात्रेसाठी नियमावली सिद्ध करणे, स्थानिक संस्थान, संस्थानचे स्वयंसेवी कार्यकर्ते, भक्त यांच्या साहाय्याने यात्रेचे व्यवस्थापन केले जाते. प्रारंभी धर्मयात्रा महासभा साहाय्य करते; पण यात संबंधित संस्थान स्वयंपूर्ण होण्यावर कटाक्ष असतो. क्रमाक्रमाने राज्यातील प्रमुख यात्रास्थळांची सूची करून व्यवस्थापन केले जाणार आहे.
३. यात्रेत स्वच्छता, शिस्त, सुखद दर्शनव्यवस्था, निर्व्यसनी यात्रा असण्यावर भर दिला जातो. यात्रेमध्ये मनोरंजन, खरेदी, विवाहाची जुळवाजुळवी, देवाणघेवाण, नवस फेडणे आदी कारणांमुळे लाखोंची उलाढाल होते. यात्रेचे हे मूळ स्वरूप परत यावे, यासाठी प्रयत्न करणार आहे.