रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील दंतवैद्या (सौ.) संगीता चौधरी यांना व्यष्टी साधनेच्या आढाव्याविषयी शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांच्यामध्ये झालेले पालट
व्यष्टी साधनेच्या आढाव्याविषयी दंतवैद्या (सौ.) संगीता चौधरी यांचे झालेले चिंतन आणि त्यांच्यात झालेले पालट यातील काही भाग आपण ३१ जुलै या दिवशी पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.
याच्या आधीचा भाग वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/819728.html
१. व्यष्टी साधनेचा आढावा देतांना लक्षात आलेल्या चुका आणि शिकायला मिळालेली सूत्रे
१ ऐ. अहं, तीव्र बहिर्मुखता आणि अल्पसंतुष्टता यांमुळे आढाव्यातून शिकण्याचा भाग अन् प्रयत्न अल्प असणे : काही वेळा मला आढावा चालू असतांना ऐकावासुद्धा वाटायचा नाही. ‘किती तात्त्विक भाग सांगतात ! सांगितलेलेच पुनः सांगतात’, असे माझ्या मनात विचार असायचे. त्याच्यामागे ‘मला कळते आणि मला ठाऊक आहे’, असा माझा अहं आणि तीव्र बहिर्मुखता असायची. बर्याचदा मला असे वाटायचे, ‘कधी एकदा आढावा संपेल ?’ मला आढाव्याचे महत्त्व आत्मसात झाले नसल्यामुळे माझे शिकण्यासाठीचे प्रयत्न आणि माझा स्वतःमध्येच पालट करण्याकडे कल अल्प असायचा. ‘आपले चांगले चालू आहे’, या भ्रमामुळे माझे पुढचे प्रयत्न अल्प व्हायचे.
१ ओ. १५ वर्षांपूर्वी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘गोष्टींचे विश्लेषण करू नका’, असे सांगणे; मात्र त्या वेळी त्याकडे गांभीर्याने लक्ष न दिेल्याने साधनेतील बुद्धीचा अडथळा वाढल्याचे जाणवणे : माझ्याकडून स्वतःचे स्वभावदोष आणि अहं स्वीकारले गेले नाहीत; म्हणून मला व्यष्टीचे प्रयत्न कठीण वाटायचे. जे काही अल्प प्रयत्न व्हायचे, तेही बुद्धीच्या स्तरावरच व्हायचे. बरेच संत आणि आढावासेवक यांनी मला स्वतःच्या श्रेष्ठत्वाच्या कोशातून बाहेर पडण्याची जाणीव करून दिली होती. त्यांनी मला माझ्यातील बुद्धीच्या अडथळ्यांविषयी सांगितले होते; पण माझ्याकडून त्यावर गांभीर्याने प्रयत्न झाले नव्हते. त्यामुळे हा अडथळासुद्धा वाढत गेला. साधारण १५ वर्षांपूर्वी एकदा परम पूज्य (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) मला म्हणाले होते, ‘‘गोष्टींचे विश्लेषण करू नका.’’ (Don’t analyse things.) त्या वेळी मी त्याकडे लक्ष देऊन प्रयत्न केले नव्हते. त्यामुळे हा अडथळा वाढतच गेला.
१ औ. स्वतःमध्ये पालट न जाणवूनही त्याविषयी विचारून घेऊन संघर्ष करण्याची मनाची सिद्धता नसणे : माझ्याकडून वरीलप्रमाणे प्रयत्न न झाल्याने मला माझे स्वभावदोष, अहं आणि चुकीच्या विचार प्रक्रियेला योग्य साहाय्य मिळत नव्हते. ‘माझी साधनेची हानी कशामुळे होते ?’, ही जाणीव मला करून देण्यासाठी साहाय्य मिळण्याचे द्वारच मी बंद केले होते. माझा व्यष्टी आढावा वर्षानुवर्षे चालू असायचा; पण मला स्वतःमध्ये पालट जाणवायचा नाही. त्यामुळे मला निराशा यायची. तरीही त्याचे मूळ कारण शोधून किंवा विचारून संघर्ष करण्याची माझ्या मनाची सिद्धता होत नव्हती.
२. व्यष्टी साधनेचा आढावा योग्य प्रकारे दिल्यामुळे स्वतःमध्ये जाणवलेले पालट
२ अ. मी व्यष्टी साधनेचा आढावा देतांना बुद्धीच्या सहभागापेक्षा मनाचा सहभाग वाढवला.
२ आ. मनाची प्रक्रिया मनमोकळेपणाने सांगणे : मी सहसाधकांविषयी मला आलेल्या प्रतिक्रिया आढाव्यात सांगण्यास आरंभ केला. मी माझ्या मनाची अयोग्य विचारप्रक्रिया मनमोकळेपणाने सांगण्यास आरंभ केला. ‘मी जितक्या मोकळेपणाने माझी विचारप्रक्रिया मांडणार, तितकी माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांची तीव्रता आढावा सेवकाला कळणार अन् स्वभावदोष आणि अहं अल्प होण्यासाठी मला आढावा घेणार्या सेवकाचे साहाय्य मिळणार’, याची माझ्या मनाला जाणीव होऊ लागली.
२ इ. ‘गुरुतत्त्वच आढावा घेणार्या सेवकाच्या माध्यमातून कार्यरत आहे’, याची जाणीव होणे आणि स्वतःकडे तत्त्वनिष्ठतेने पाहिले जाऊन वस्तूनिष्ठ आढावा देणे : आढावा घेणार्या सेवकाच्या साहाय्याने मला चुकांमधून माझे मूळ स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू लक्षात येऊ लागले. ‘गुरुतत्त्वच आढावा सेवकाच्या माध्यमातून कार्यरत असून तेच मला या साधनेतील अडथळ्यातून बाहेर काढणार’, याची मला जाणीव होऊ लागली. मी स्वतःकडे तत्त्वनिष्ठतेने पाहू लागले आणि वस्तूनिष्ठ आढावा देऊ लागले.
२ ई. मला आढावा घेणार्या सेवकाकडून योग्य दृष्टीकोन, योग्य विचार प्रक्रिया आणि साधनेची दिशा मिळून त्यांतून शिकतांना पुष्कळ आनंद मिळू लागला.
२ उ. ‘स्वतःचे मन स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेचे एक संशोधन केंद्रच झाले आहे’, असे जाणवून त्याविषयी चिंतन होणे अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यामुळे या प्रक्रियेतून आनंद घेता येणे : माझे मन स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेचे एक संशोधन केंद्रच झाले. ‘मला कोणत्या विषयाचा त्रास होतो ? हा त्रास कोणते स्वभावदोष आणि अहंचे पैलू यांमुळे होतो ? त्यावर मी काय उपाययोजना करायला पाहिजे आणि कोणती स्वयंसूचना द्यायला पाहिजे ?’, असा माझा सतत अभ्यास, लिखाण आणि चिंतन चालू असायचे. यासाठी मी वेगवेगळे प्रयोग करायचे. त्यातून मला मूळ स्वभावदोष आणि अहं शोधण्यात पुष्कळ आनंद मिळायचा. केवळ आणि केवळ परम पूज्यांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेमुळे मला प्रक्रियेतला आनंद घेता येणे जमू लागले.
२ ऊ. निराशा आणि नकारात्मकता न्यून होऊन व्यष्टी आढाव्याचा ताणही न्यून होणे : माझ्या मनाची निर्मळता वाढली. ‘प्रत्येक प्रसंग हा माझ्या साधनेसाठी आणि प्रक्रिया राबवण्यासाठी मैलाचा दगड आहे’, असे मला वाटायचे. मी प्रक्रिया समजून घेणे आणि शिकणे यांतील आनंद अनुभवत असल्याने माझी निराशा अन् नकारात्मकता न्यून होत गेली आणि व्यष्टी आढाव्याचा ताणसुद्धा न्यून झाला.
२ ए. मला मूळ स्वभावदोष आणि अहं कळू लागले अन् त्यावर योग्य स्वयंसूचना दिल्यामुळे स्वभावदोष आणि अहं यांची तीव्रता, त्यांचा कालावधी अन् त्यांची वारंवारता हे सर्व हळूहळू न्यून होऊ लागले.
२ ऐ. नामजपाचे उपाय करतांना बर्याच वर्षांनंतर माझ्या मनाची एकाग्रता वाढली, तसेच माझे भावजागृतीचे प्रयत्न होऊन आध्यात्मिक त्रासांची तीव्रता हळूहळू अल्प होऊ लागली.
२ ओ. ‘व्यष्टी आढावा, म्हणजे भावसत्संग आणि गुरुभेटच आहे’, असे अनुभवता येणे : व्यष्टी आढावा म्हणजे ‘स्वतःला जाणून घेण्यास देवाने निर्माण केलेली मोठी संधी (‘प्लॅटफॉर्म’) आहे. जितके मी माझे प्रयत्न (‘इन्पुट’) वाढवणार, तेवढे देव मला भरभरून देणार’, हे मनाला समजू लागले. माझ्यासाठी व्यष्टी आढावा, म्हणजे भावसत्संग आणि गुरुभेटच आहे. ‘या सत्संगाच्या माध्यमातून देव मला भेटणार आणि अध्यात्मातील रहस्य उलगडून मला साधनेसाठी दिशा, ऊर्जा अन् प्रयत्न यांसाठी बळ देणार’, हेच मी व्यष्टी आढाव्याच्या माध्यमातून अनुभवत आहे. या दैवी सत्संगाबद्दल कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.
२ औ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातून ‘आध्यात्मिक त्रास आणि स्वभावदोष हे वेगवेगळे आहेत’, असे सांगणे : ही सर्व प्रक्रिया करत असतांना काही वेळ मन सवलत घ्यायचे. ‘आपल्याकडून होणार्या चुका आध्यात्मिक त्रासांमुळेसुद्धा होत असणार’, असा विचार माझ्या मनात यायचा. त्या वेळी आतून परम पूज्य सांगायचे, ‘आध्यात्मिक त्रास आणि स्वभावदोष हे दोन वेगवेगळे घटक आहेत. हे दोन्ही एकत्रित करू नयेत. मनात येणारे विचार आढावा घेणार्या सेवकांना त्या त्या वेळी सांगून ते सांगतील, तसे प्रयत्न करायचे आहेत.’ त्याप्रमाणे मी आढावासेवक सांगतात ते ऐकणे, स्वीकारणे आणि त्याप्रमाणे कृती करणे यांची स्वतःला सवय लावली. मला गुरूंचे हे वाक्य ग्रहण करून त्याप्रमाणे कृती करायला जमू लागले, त्याबद्दल श्री गुरूंच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
३. प्रार्थना आणि कृतज्ञता
बर्याच वेळा साधक आणि संत यांच्याकडून असे ऐकले आहे की, ‘निर्मळ मनात गुरूंचा वास असतो.’ ‘परम पूज्य, माझे मन निर्मळ होण्यासाठी या मनात तुमच्या चरणांचा वास असावा. यासाठी पात्र होण्यासाठी या शूद्र जिवाकडून तुम्हाला अपेक्षित असे साधनेचे प्रयत्न तुम्हीच माझ्याकडून तळमळीने, प्रामाणिकपणे आणि सातत्याने करून घ्या. ‘मला निर्मळ मनाची भिक्षा द्या’, हीच तुमच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’
परम पूज्य, केवळ तुमच्या कृपेने हे सर्व सहजपणे लिहिता आले, याबद्दल तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– दंतवैद्या (सौ.) संगीता श्रीकांत चौधरी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.१०.२०२३)
|