Wayanad landslide : वायनाड (केरळ) येथील भूस्खलनात आतापर्यंत १६५ जणांचा मृत्यू !
केरळ राज्यातील ८ जिल्ह्यांत अतीवृष्टीची चेतावणी
वायनाड (केरळ) – वायनाडमध्ये अतीवृष्टीनंतर झालेल्या भूस्खलनामुळे मृतांची संख्या आता १६५ वर पोचली आहे. २२० हून अधिक लोक बेपत्ता आहेत. मुंडक्काई, चुरामाला, अट्टामाला आणि नूलपुळा गावात २९ जुलैच्या रात्री उशिरा भूस्खलन झाले होते. त्यात अनेक घरे, पूल, रस्ते आणि वाहने वाहून गेली. या अपघातानंतर राज्यात २ दिवसांचा राजकीय दुखवटा घोषित करण्यात आला आहे. तसेच राज्यातील १२ जिल्ह्यांतील शाळा आणि महाविद्यालये यांना सुटी घोषित करण्यात आली आहे.
१. भारतीय सैन्य, वायूदल, राज्य, तसेच राष्ट्रीय आपत्ती निवारण दल बाधित भागात साहाय्यकार्यात गुंतले आहेत. ३० जुलैला २२५ सैनिकांना कन्नूरहून वायनाडला पाठवण्यात आले.
२. ३१ जुलैला हवामान खात्याने वायनाड, मलप्पुरम्, कोळीकोड, वायनाड, कन्नूर आणि कासारगोड जिल्ह्यांसह ५ जिल्ह्यांमध्ये अतीवृष्टीची चेतावणी दिली आहे, तर एर्नाकुलम्, इडुक्की, त्रिशूर अन् पलक्कड जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ची (मध्यम पावसाची) चेतावणी दिली आहे.