भक्तीसत्संगात मिळालेल्या मार्गदर्शनानुसार साधिकेने केलेले प्रयत्न !

‘मागील काही भक्तीसत्संगामध्ये श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या अमृतवाणीतून साधनेसाठी दिशादर्शन मिळाले. त्याप्रमाणे गुरुमाऊलींनी माझ्याकडून प्रयत्न करून घेतले. त्याविषयी केलेले लिखाण गुरुचरणी अर्पण करते.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

१. स्वतःकडून झालेल्या चुकांचे गांभीर्याने निरीक्षण करून चुका लिहिणे आणि चुकीच्या मुळापर्यंत गेल्याने स्वभावदोष लक्षात येणे

‘माझ्याकडून झालेल्या चुकांचे निरीक्षण करण्यासाठी आणि त्या चुका लिहिण्यासाठी मी अगदी प्रत्येक क्षणीच मनावर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करू लागले. शरीर किंवा मन यांच्या स्तरावर कुठलीही चूक माझ्या लक्षात आल्यावर ती मी लिहून काढू लागले. माझ्या लक्षात आलेली चूक लगेच लिहिल्यामुळे ती योग्य शब्दात मांडता येऊन त्या चुकीच्या मुळापर्यंत जाता आले. त्यामुळे माझे स्वभावदोष माझ्या लक्षात येऊ लागले.

२. ‘इतरांचे स्वभावदोष पहाण्याऐवजी गुण आठवूया’, असे ठरवल्यावर स्वभावदोषांची व्याप्ती काढून स्वयंसूचना सत्रे चालू केल्यावर ८ दिवसांत ‘इतरांचे स्वभावदोष पहाणे’, हा तीव्र स्वभावदोष न्यून होणे

सौ. सीमंतिनी बोर्डे

मी भ्रमणभाषवर कुणाचे गायन ऐकत असेन, तर माझ्यातील बहिर्मुखतेमुळे मला सर्वप्रथम त्या गायनातील त्रुटीच लक्षात येत असत. तसेच माझ्या जवळच्या नातेवाइकांनी काही अयोग्य वर्तन केले असेल, तर त्या नातेवाईकाचे नाव माझ्या मनात येताच मला त्या नातेवाईकाचे स्वभावदोष दिसत. त्या व्यक्तीविषयी ‘माझ्या मनात अजून पूर्वग्रह आणि राग आहे’, हे  लक्षात आल्यावर मला खंत वाटू लागली. त्यानंतर ‘कोणतीही व्यक्ती डोळ्यांसमोर आली किंवा मनात त्या व्यक्तीचा विचार आला, तर त्या व्यक्तीचे केवळ गुणच आठवायचे’, असे मी ठरवले. मी स्वभावदोषांची व्याप्ती काढून स्वयंसूचना सत्रे चालू केली. गुरुदेवांच्या कृपेने केवळ आठच दिवसांमध्ये ‘इतरांचे स्वभावदोष पहाणे’, हा माझा तीव्र स्वरूपाचा स्वभावदोष पुष्कळ न्यून झाल्याचे माझ्या लक्षात आले.

३. अंतर्मुखता वाढण्यासाठी प्रयत्न होणे आणि ‘प्रत्येक क्षणी साधना झाली पाहिजे’, हा विचार अंतर्मनात दृढ होणे

मनाला अंतर्मुख स्थितीत रहाता येत असल्याने प्रार्थना, कृतज्ञता, नामजप आणि गुरुस्मरण हे सर्व भावपूर्ण होऊ लागले. प्रार्थना आणि कृतज्ञता आता वरवर न होता मनापासून होतात. त्यामुळे सतत भावजागृती होऊन डोळ्यांतून सारखे अश्रू येतात. प्रत्येक क्षण मोलाचा असून ‘प्रत्येक क्षणी साधना झाली पाहिजे’, हा विचार आता अंतर्मनात दृढ होऊ लागला आहे. त्यामुळे ‘इतरांचा विचार करणे आणि प्रत्येकाशी प्रेमभावाने बोलणे’, हे गुण आपोआप वाढले आहेत’, असे माझ्या लक्षात येते.

४. ‘मनोराज्यात रमणे’, हा स्वभावदोष घालवण्यासाठी प्रार्थना करणे

माझ्यामध्ये ‘मनोराज्यात रमणे’, हा स्वभावदोष अधिक प्रमाणात आहे. त्यात पालट व्हावा; म्हणून मी गुरुदेवांना कळकळीने प्रार्थना करते, ‘हे गुरुदेवा, ‘मला तुमचे चरण सोडून एक क्षणही जायचे नाही. उघड्या डोळ्यांनीही मला तुमचे चरण पहाता येऊ देत आणि त्या चरणांवर माझे मस्तक अखंड नतमस्तक राहू दे. गुरुदेवा, मला माझ्या मनात येणारे अनावश्यक विचार घालवता येत नाहीत. त्यावर मात करायला तुम्हीच मला शिकवा.’

५. स्वकौतुकाच्या विचारांवर मात करण्यासाठी प्रयत्न करणे

एखाद्या लहान कृतीबद्दल माझ्या मनात स्वकौतुकाचे विचार येत असत. उदा. ‘मी गायन चांगले शिकवते. माझे सर्व काम नीटनेटके असते’, असे विचार येऊन गेल्यानंतर मला त्यांची जाणीव होऊन खंत वाटत असे. त्यावर मात करण्यासाठी मी शिक्षा घेतली आणि प्रत्येक कृती झाल्यावर गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचे प्रयत्न चालू केले.

५ अ. कर्तेपणाचे विचार नष्ट होण्यासाठी प्रयत्नांच्या समवेत गुरुदेवांना प्रार्थना केल्यावर अहंच्या पैलूमध्ये सुधारणा होणे : हे गुरुदेवा, ‘माझ्यातील ज्या चैतन्याच्या बळावर मी जिवंत आहे, ते चैतन्य तुम्हीच भरले आहे. हे हात, पाय, डोळे आणि मुख सर्व अवयव तुमच्याच कृपेने काम करतात. कर्तेपणाचे हे सर्व घातक विचार तुमच्या कृपेने नष्ट होऊ देत. कर्तेपणाचे विचार नष्ट होण्यासाठी प्रयत्नांच्या समवेत गुरुदेवांना आर्त भावाने प्रार्थना चालू केल्यावर या अहंच्या पैलूमध्ये बरीच सुधारणा झाली.

६. यजमानांनी सांगितलेले काम त्वरित करणे

माझे यजमान श्री. सुधीर बोर्डे हे मला स्वयंपाक घरात माझ्याकडून राहिलेल्या कामांची आठवण करून देतात. तेव्हा मी ‘हो’ म्हणते; पण प्रत्यक्ष कृती करत नाही. याविषयी त्यांना मला अनेक वेळा आठवण करून द्यावी लागत असे. हा स्वभावदोष घालवण्यासाठी मी ‘त्यांनी एखादे काम सांगितले की, ते लगेच करायचे ठरवले’ आणि तसे प्रयत्न गुरुदेवांनी माझ्याकडून करून घेतले. माझ्यामध्ये झालेला हा पालट यजमानांच्याही लक्षात आला आणि त्यांनी मला तसे बोलूनही दाखवले.

‘हे गुरुदेवा, आपल्या अपार कृपेनेच माझी भावस्थिती टिकून रहात असून त्यातून मला अतिशय आनंद मिळत आहे. माझ्यामध्ये अजून कोणते स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू आहेत, ते तुम्हीच मला लक्षात आणून द्या. मला त्या सर्वांवर मात करता येण्यासाठी तुम्हीच मला बळ पुरवा. माझ्याकडून प्रयत्न अजून वेगाने होऊ देत आणि या जिवाला निर्मळ होऊन आपल्या चरणी अर्पण होता येऊ दे’, हीच गुरुचरणी प्रार्थना आहे.’

– सौ. सीमंतिनी बोर्डे, नेवासा, अहिल्यानगर. (१६.३.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक