India Lone Wolf Attack : भारतात एकट्या आतंकवाद्याकडून (‘लोन वूल्‍फ अटॅक’) आक्रमण करण्‍याचे ‘इस्‍लामिक स्‍टेट खुरासान’चे षड्‍यंत्र ! – संयुक्‍त राष्‍ट्रे

न्‍यूयॉर्क (अमेरिका) – संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या नव्‍या अहवालात भारतासंदर्भात एक मोठा दावा करण्‍यात आला आहे. ‘इस्‍लामिक स्‍टेट खुरासान’ ही आतंकवादी संघटना भारतात मोठ्या प्रमाणावर आक्रमण करण्‍यात अयशस्‍वी ठरली आहे. त्‍यामुळे तिला भारतात उपस्‍थित असलेल्‍या तिच्‍या आतंकवाद्यांच्‍या साहाय्‍याने अशा लोकांची भरती करायची आहे, जे भारतात एकट्याने आतंकवादी घटना घडवून आणू शकतात. याला ‘लोन वूल्‍फ अटॅक’ या नावाने संबोधले जाते.

१. संयुक्‍त राष्‍ट्रांचा ‘अल्-कायदा आणि संबंधित व्‍यक्‍ती अन् संस्‍था यांवरील विश्‍लेषणात्‍मक समर्थन आणि स्‍वीकृती देखरेख गटा’चा ३४ वा अहवाल ३० जुलैला प्रसिद्ध करण्‍यात आला. यामध्‍ये अफगाणिस्‍तानातून येणार्‍या आतंकवाद्यांमुळे भारतीय उपखंडात असुरक्षितता निर्माण होईल, अशी चिंता सदस्‍य देशांनी व्‍यक्‍त केली आहे.

२. इस्‍लामिक स्‍टेट ऊर्दूमध्‍ये लिहिलेल्‍या पुस्‍तकाचे प्रकाशन करत असून त्‍यात हिंदु-मुसलमान वैमनस्‍य हे अतिशयोक्‍तीपूर्ण रूपाने करण्‍यात आले आहे आणि भारताच्‍या संदर्भात रणनीती मांडण्‍यात आली आहे, असे त्‍यात सांगण्‍यात आले आहे.

३. संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या अहवालात असेही नमूद करण्‍यात आले आहे की, या प्रदेशातील सर्वांत मोठा धोका इस्‍लामिक स्‍टेट खुरासान आहे. दुसरीकडे अल्-कायदा संयमाची रणनीती अवलंबत आहे आणि तालिबानसमवेतच्‍या संबंधांना प्राधान्‍य देत आहे.

४. तेहरीक-ए-तालिबान पाकिस्‍तान (टीटीपी), तालिबान आणि भारतीय उपखंडातील अल्-कायदा (ए.क्‍यू.आय.एस्.) यांच्‍यात सहकार्य वाढले आहे. ते अफगाणिस्‍तानमध्‍ये मनुष्‍यबळ आणि प्रशिक्षण शिबिरे सामायिक पद्धतीने घेत आहेत अन् ‘तेहरीक-ए-जिहाद पाकिस्‍तान’च्‍या साहाय्‍याने अधिक प्राणघातक आक्रमणे करत आहेत.

(खुरासान म्‍हणजे उत्तर पूर्व इराण, अफगाणिस्‍तान, पाकिस्‍तान, तुर्कमेनिस्‍तान आणि उजबेकिस्‍तान या देशांचा भूप्रदेश !)

या देशांसाठी आहे जिहादचा धोका !

टीटीपी आणि ए.क्‍यू.आय.एस्. यांच्‍या संभाव्‍य विलीनीकरणामुळे पाकिस्‍तान, भारत, म्‍यानमार आणि बांगलादेश यांच्‍याविरुद्ध धोका वाढू शकतो. टीटीपीमध्‍ये ६ सहस्रांहून अधिक आतंकवादी आहेत, असेही या अहवालात नमूद करण्‍यात आले आहे.

संपादकीय भूमिका

जिहादी आतंकवादाचा नायनाट हा केवळ त्‍याच्‍या विचारसरणीवर कठोर प्रहार केला, तरच होऊ शकतो, हे जागतिक समुहाने लक्षात घेतले पाहिजे. भारत सरकारने यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. मानवजातीसाठी भारत सरकारची ही सद्य:स्‍थितीतील सर्वांत हितावह मोहीम होईल, हे आपण केव्‍हा लक्षात घेणार ?