Nihang Sikhs Killed Hindu : पंजाबमध्ये निहंगांनी केली हिंदु दुकानदाराची घराबाहेर हत्या !

  • मुलगा आणि भाऊ यांच्यावरही केले प्राणघातक आक्रमण

  • पैशांच्या वादातून हत्या झाल्याचा दावा

(निळ्या रंगाचे कपडे परिधान करून शस्त्र बाळगणार्‍या योद्धा शिखांना निहंग शीख म्हणतात.)

तरणतारण (पंजाब) – तरणतारण जिल्ह्यात ६ निहंग शिखांनी शम्मी पुरी नावाच्या हिंदु दुकानदाराची तलवारीने वार करून भरदिवसा हत्या केली. या वेळी निहंगांनी शम्मी पुरी यांचा भाऊ आणि मुलगा यांच्यावरही प्राणघातक आक्रमण केले. यात दोघेही गंभीररित्या घायाळ झाले. ही घटना ३० जुलैला सायंकाळी घडली. घटना पैशांच्या वादातून झाल्याचे म्हटले जात आहे. शम्मी यांचा १ कोटी ७५ लाख रुपयांवरून कुणाशी तरी वाद होता आणि निहंग शम्मी यांच्याकडे या पैशांची मागणी करत होते. याविषयी शम्मी यांना अनेकदा दूरभाषवरून धमक्याही आल्या होत्या.

१. येथे ६ निहंग शीख एका इनोव्हा चारचाकी गाडीमध्ये आले आणि त्यांनी शम्मी पुरी यांना घराबाहेर बोलावले. पुरी बाहेर आल्यावर या निहंगांनी त्यांना मारहाण करण्यास चालू केले. त्यानंतर तलवारीने वार केले. त्यांना वाचवण्यासाठी आलेला मुलगा करण आणि भाऊ यांच्यावरही आक्रमण केले. शम्मी यांच्यावर झालेल्या आक्रमणाची माहिती मिळताच शेजारी बाहेर आले. त्यानंतर निहंग पळू लागले. शेजार्‍यांनी त्यांचा पाठलागही केला. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.

२. या घटनेनंतर शम्मी यांच्या कुटुंबियांनी आंदोलन केले. त्यांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली. हत्या करणार्‍या निहंगांना जोपर्यंत पकडले जात नाही, तोपर्यंत शम्मी यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नसल्याचे त्यांनी घोषित केले आहे.

३. वरिष्ठ पोलीस अधीक्षक विजय कपूर यांनी सांगितले की, आरोपींची ओळख पटली असून लवकरच त्यांना पकडले जाईल.

संपादकीय भूमिका

निहंगांकडून सातत्याने गुन्हेगारी कृत्य होत असल्याने आता त्यांना शस्त्रे बाळगण्याचा अधिकार कायम ठेवायचा का ? याच्यावर चर्चा झाली पाहिजे !