पुणे येथे एका पॅनकार्डाचा वापर करून ३०० आस्थापनांतील कर्मचार्‍यांनी चुकवला प्राप्तीकर !

प्राप्तीकर विभागाची कोट्यवधी रुपयांची हानी, पॅनकार्डधारक हा भारताबाहेर वास्तव्यास !

प्रतीकात्मक चित्र

पुणे – घरभाडे भत्त्याच्या वार्षिक कर कपातीसाठी ३०० आस्थापनांनी माजी अतिरिक्त मुख्य सचिवांच्या मुलाचा पॅनकार्ड क्रमांक वापरून कर चुकवल्याचे उघड झाले आहे. (याविषयी संबंधित प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांना लक्षात आले नाही का ? – संपादक) याविषयी एका ७४ वर्षीय महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. तक्रारीनुसार पॅनकार्ड क्रमांकाचा उपयोग करणारे विविध आस्थापनांचे कर्मचारी, सनदी लेखपाल, एक ई-मेल वापरकर्ता यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर तक्रारीला प्राप्तीकर विभागाने नोटीस जारी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

तक्रारदारांचा मुलगा नेदरलँड येथे वास्तव्यास आहे. त्याने वर्ष २०११ मध्ये पॅनकार्ड घेतले होते. वर्ष २०१९ मध्ये तक्रारदारांच्या मुलाचे पॅनकार्ड आधारकार्डाशी लिंक (जोडण्यात) करण्यात आले. या पॅनकार्डाचा उपयोग करून वित्तीय वर्ष २०२०-२१ मध्ये ११७ आस्थापने, २०२१-२२ मध्ये १०४ आस्थापने आणि २०२२-२३ मध्ये ८० आस्थापनांनी त्यांच्या कर्मचार्‍यांच्या घरभाडे भत्त्याच्या वार्षिक करांमध्ये वजावट करून प्राप्तीकर विभागाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे त्यांनी तक्रारीमध्ये नमूद केले आहे.