तमिळनाडूमधील शेतकर्यांनी नागपूर येथे अर्धा घंटा एक्सप्रेस अडवली !
नागपूर – जम्मुतावी-चेन्नई एक्सप्रेसमध्ये भोजन आणि पाणी न मिळाल्याच्या निषेधार्थ तमिळनाडूमधील काही शेतकरी कार्यकर्त्यांनी २९ जुलै या दिवशी सकाळी नागपूर रेल्वे स्थानकावर ही गाडी अर्धा घंटा रोखून धरली.
‘नॅशनल साऊथ इंडियन इंटरलिंकिंग असोसिएशन’चे अध्यक्ष अय्या कन्नु यांच्यासह ५० ते ६० कार्यकर्ते रविवारी जीटी एक्सप्रेसने देहलीतील शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी चेन्नईवरून निघाले होते; मात्र मध्यप्रदेश पोलिसांनी भोपाळजवळ नर्मदापूर येथे त्यांना खाली उतरवले आणि चेन्नई एक्सप्रेसला वेगळा कोच जोडून त्या गाडीने त्यांना चेन्नईकडे परत पाठवले. आम्हाला मध्येच उतरवून परत पाठवले, तर आमच्या भोजन आणि पाण्याची व्यवस्था रेल्वे प्रशासनानेच करायला हवी असे या कार्यकर्त्यांचे म्हणणे होते.
गाडी रोखून धरून काही जण गाडीच्या इंजिनवर चढले, त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली; मात्र हे सर्वच जण तमिळमध्ये बोलत होते. त्यामुळे त्यांची मागणी काय आहे हे कुणाला कळत नव्हते.