मुसलमान आणि ख्रिस्ती समाजासाठी आरक्षित असलेल्या जागेसाठी महापालिकेच्या तिजोरीतून पैसे वर्ग करू नयेत !
सांगली येथील भाजपच्या नेत्या अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे यांची आयुक्तांना निवेदनाद्वारे मागणी !
सांगली, ३० जुलै (वार्ता.) – शामरावनगर येथील मुसलमान आणि ख्रिस्ती समाजासाठी आरक्षित असलेल्या जागेसाठी महापालिकेच्या तिजोरीतून पैसे वर्ग करू नयेत, अशा मागणीचे निवेदन भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री आणि अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे यांनी ख्रिस्ती आणि मुसलमान समाज यांच्या नागरिकांसमवेत महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांना ३० जुलै या दिवशी दिले. या वेळी अल्बर्ट सावर्डेकर, जॉर्ज पिंटो, सागर काळे, आशिष साळुंखे आदी उपस्थित होते.
या वेळी बोलतांना अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे म्हणाल्या की, या दोन्ही समाजाची जागा भूसंपादन करण्यासाठी सांगली जिल्हा प्रशासनाने नुकतीच अधिसूचना काढलेली आहे. तरी या भूसंपादनाचा मोबदला म्हणून महापालिकेने महापालिकेच्या तिजोरीतून पैसे वर्ग करू नयेत; कारण मुसलमान आणि ख्रिस्ती दफनभूमीसाठी आरक्षित असलेली जागा मूळ जागामालकांनी प्लॉट पाडून गुंठेवारीने विक्री केलेली आहे. ही संपूर्ण जागा पूरपट्ट्यातील आहे.
या जागेत भराव घालण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा व्यय आहे. बाजारभावाप्रमाणे या जागेची किंमत १ कोटी रुपये एकर असतांना काही हितसंबंधी मंडळींनी मूळ मालकांकडून वटमुखत्यार पत्रे घेऊन भूसंपादनाचा प्रस्ताव पुढे आणला आहे. ४० प्लॉटधारकांनी गुंठेवारी नियमितीकरण करण्यासाठी महापालिकेकडे प्रस्ताव दिलेला आहे. अनधिकृतरित्या गुंठेवारीचे प्लॉट पाडून विक्री केल्याची चौकशी झाली पाहिजे. जागेचा १.२५ कोटी रुपये एकरी बाजारभाव असतांना महापालिका मात्र एकरी ४ कोटी रुपये प्रमाणे शुल्क देत आहे, असे त्यांनी सांगितले.