‘ब्ल्यू व्हेल गेम’च्या नादात पुणे येथील दहावीत शिकणार्या मुलाची आत्महत्या !
पिंपरी-चिंचवड (पुणे) – येथील किवळे भागात दहावीत शिकणार्या एका मुलाला ‘ब्ल्यू व्हेल गेम’चे व्यसन जडले होते. या व्यसनाच्या आहारी जाऊन या १५ वर्षीय मुलाने २६ जुलैला रात्री थेट चौदाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. गेल्या ६ महिन्यांपासून हा मुलगा ‘गेम’च्या आहारी गेला होता. त्यानंतर तो स्वतःला शयनकक्षामध्ये ३-३ घंटे कोंडून घेत असे. खोलीत एकटाच बडबड करत असायचा. घरात आजवर वडीलधार्यांना घाबरणारा मुलगा थेट स्वयंपाकगृहामधील चाकूची मागणी करायला लागला होता. हा पालट पाहून आई-वडीलही चिंतेत होते.
आई-वडील दुसर्या मुलाला ताप आल्याने त्या चिंतेत होते. रात्री १ वाजता मुलाची आई जागीच होती. त्याच वेळी सोसायटीच्या ‘व्हॉट्सॲप’वर एक मुलगा घायाळ अवस्थेत खाली पडल्याचा संदेश आला. तेव्हा तो त्यांचाच मुलगा असल्याचे समजले. मुलाला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले; पण तोपर्यंत पुष्कळ उशीर झाला होता. घरात एका कागदावर ‘खेळा’मधील ‘कोडिंग’च्या भाषेत काहीतरी लिहिलेले आढळले; मात्र यातून त्याला काय सांगायचे होते ? याचा शोध आता पिंपरी-चिंचवड पोलीस लावत आहेत; मात्र, ‘ब्ल्यू व्हेल’ सारख्या असंख्य ‘गेम’च्या आहारी गेलेल्या मुलांसाठी आणि त्याकडे कानाडोळा करणार्या पालकांसाठी ही अतिशय चिंतेची गोष्ट आहे.
संपादकीय भूमिकाया घटनेमुळे लहान मुलांमधील भ्रमणभाष आणि त्यावरील खेळाचे व्यसन ही चिंतेची गोष्ट बनली असून यातून मार्ग काढायला हवा, हे लक्षात येते. त्यासाठी मुलांना भ्रमणभाषचे दुष्परिणाम समजून सांगण्यासह मुलांवर सुसंस्कार करणे आवश्यक आहे. |