‘शारीरिक वेदना होत असतांना ‘आई’ ऐवजी देवाला हाक मारणे महत्त्वाचे आहे’, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी एका प्रसंगाद्वारे शिकवणे !
‘वर्ष २०२२ मध्ये माझे वडील ([कै.] पू. पद्माकर होनप [सनातन संस्थेचे ७ वे संत]) रुग्णाईत असतांना त्यांना एकदा पुष्कळ शारीरिक वेदना होत होत्या. तेव्हा वेदना सहन न झाल्याने बाबा मोठ्याने ‘आई’, असे म्हणत होते. या प्रसंगी तेथे परात्पर गुरु डॉ. आठवले उपस्थित होते. ते बाबांना म्हणाले, ‘‘आईऐवजी ‘राम’, असे म्हणा !’’ बाबांची स्थिती ठीक नसल्याने ते परत ‘आई’, असे बोलू लागले. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांना परत रामनामाची आठवण करून दिली.
या प्रसंगी माझ्या मनात विचार आले, ‘मूल जन्माला आल्यावर त्याची सर्वप्रथम भेट त्याच्या आईशी होते. तो वयाने मोठा होईपर्यंत त्याचा आधार केवळ आईच असते. त्यामुळे संकटप्रसंगी किंवा शारीरिक वेदनांच्या वेळी प्रत्येक व्यक्तीला आईची आठवण येणे स्वाभाविक असते. असे असले, तरीही व्यक्तीला शारीरिक त्रास सहन करण्याची शक्ती मिळणे, तसेच तिचे आध्यात्मिक कल्याण होणे, हे केवळ भगवंताच्या स्मरणाने, म्हणजेच नामजपाने साध्य होऊ शकते; म्हणून परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्या बाबांना आईऐवजी रामनाम घेण्याची आठवण करून दिली.’
‘बाबांनी परात्पर गुरु डॉक्टरांच्या सांगण्यानुसार ‘आई’ ऐवजी रामनाम घेण्यास आरंभ केला. तेव्हा त्यांच्या वेदनांमध्ये काही पालट जाणवला नाही; परंतु ‘त्यांना वेदना सहन करण्याची शक्ती रामनामाद्वारे मिळत होती’, असे मला जाणवले.’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.५.२०२४)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |