गणवेश आणि समाजभान !
शाळा चालू होऊन २ महिने झाले; पण अद्यापही काही शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य, गणवेश यांची पूर्तता झालेली नाही. त्यासाठी पालकांना शाळेत हेलपाटे घालावे लागत आहेत. पनवेल येथील एका सुप्रसिद्ध शाळेत एक पालक मुलीला गणवेश घेण्यासाठी गेले होते. गणवेशाची लांबी गुडघ्यापर्यंत होती; पण शाळेतील काही मुलींना तितक्या लांबीचा गणवेश नकोच होता. त्यांना गुडघ्याच्या वर येईल, अशाच स्वरूपाचा गणवेश हवा होता. त्यासाठी त्या अडून बसल्या होत्या आणि पालकांकडेही तसाच हट्ट करत होत्या. पालकांनाही ‘त्यांना कसे समजवावे आणि त्यांचा हट्ट कसा मोडून काढावा’, ते कळत नव्हते. तेही आपल्या मुलींचे म्हणणे निमूटपणे ऐकून घेत होते. हे आहे एका ठिकाणचे प्रातिनिधिक उदाहरण !
ही अशा स्वरूपाची मानसिकता आज सर्वत्रच आढळून येते. जितके तोकडे कपडे घालता येतील, तितके घालायचे, असे आजच्या मुली आणि तरुणी यांना वाटते. आज अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे; मात्र तोकडे कपडेप्रेमी स्त्रीवर्ग स्वतःच्या अयोग्य कृतीकडे न पहाता पुरुषांच्या वासनांध दृष्टीकडे बोट दाखवतो. पुरुषी मानसिकताही अयोग्य आहेच; पण युवतीच अंगप्रदर्शन करत असतील, तर त्यांना इतरांना दोष देण्याचा अधिकार आहे का ? युवतींची ही मानसिकता आज लहान वयातील मुलींमध्येही वाढत आहे.
‘शाळेत आपण तोकडे कपडे घालायला नव्हे, तर शिक्षण घेण्यासाठी जातो’, हे पालकांनीच मुलींच्या लक्षात आणून देणे आवश्यक आहे; पण आज ‘फॅशन’च्या नावाखाली कुणालाच संस्कृती, प्रथा, परंपरा नको वाटतात. मुलांच्या अयोग्य विचारांचीच ‘री’ पालकांकडून ओढली जाते. तोकडा गणवेश घालून येणार्या मुलींना शाळेने वर्गात प्रवेशच द्यायला नको. तसे केल्यासच विद्यार्थिनी गांभीर्याने विचार करतील. सध्याचे मुलींवरील अत्याचाराचे भयावह प्रमाण पहाता मुलींसाठी त्यांचे संपूर्ण अंग झाकले जाईल, अशा स्वरूपाचाच गणवेश असायला हवा; पण त्या शाळेने तसे बंधन घातलेले असतेच, असे नाही. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना मात्र पूर्ण विजार घालण्याची सक्ती आहे.
वरील गोष्ट खटकल्याने एका सजग पालकांनी याविषयी शाळेतील शिक्षिकेची भेट घेऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला; पण झाले उलटेच ! शिक्षिकेनेच पालकांना उपदेशाचे डोस पाजत सांगितले, ‘‘आता परिस्थिती पालटली आहे. त्यामुळे आपणही त्या दृष्टीनेच बघायला हवे.’’ यावरून शिक्षकांनाच समाजभान राहिलेले नाही, तर विद्यार्थिनींमध्ये त्या ते कसे निर्माण करणार ? शिक्षक आणि पालक या दोघांनीही मुलींवरील अत्याचारांची संवेदनशीलता ठेवून गणवेशाच्या संदर्भातही ती दाखवून द्यायला हवी !
– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.