आध्यात्मिक स्तरावर मार्गदर्शन करून तत्त्वनिष्ठतेने साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेणार्‍या फोंडा, गोवा येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. अश्विनी सावंत (वय ४१ वर्षे) !

सौ. अश्विनी सावंत

१. साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेणार्‍या आदर्श आढावासेविका सौ. अश्विनी सावंत !

‘व्यष्टी साधनेच्या आढाव्यात साधक मनमोकळेपणाने बोलून मनातील नकारात्मक आणि निरर्थक विचार यांवर मात करण्यासाठी साहाय्य मिळवू शकतील. साधकांमध्ये आढाव्यामुळे अंतर्मुखता येऊन त्यांना स्वतःतील स्वभावदोषांची जाणीव होईल. त्यांना स्वतःची भूमिका मनमोकळेपणाने मांडता येऊन त्यासाठी कारणीभूत असलेले स्वभावदोष घालवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल’, अशा आदर्श आढाव्याची मी कल्पना केली होती. आम्हा काही साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेणार्‍या आणि नम्र स्वभावाच्या सौ. अश्विनी सावंत अशाच आदर्श आढावासेविका आहेत.

सौ. अश्विनीताई प्रत्येक साधकाचा आढावा इतक्या प्रेमाने आणि कौशल्याने घेते की, त्यातून अन्य साधकांनाही शिकता येते. एखाद्या साधकाने वैयक्तिक किंवा अस्वस्थ करणारे सूत्र सांगितले असल्यास अश्विनीताई तो प्रसंग स्थिर राहून आणि संवेदनशीलतेने हाताळते.

२. सौ. अश्विनी सावंत यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये !

२ अ. मधुर वाणी : अश्विनीताईचे बोलणे नम्र आणि मधुर आहे. तिच्या बोलण्यात भावनाशीलता नसते. तिच्या वाणीतील चैतन्यामुळे आणि शिकायला मिळत असलेल्या सूत्रांमुळे ती घेत असलेला आढावा आनंददायी असतो.

२ आ. प्रेमभाव : एखादा साधक त्याची समस्या नेमकेपणाने न सांगता पाल्हाळिकपणे सांगत असेल, तर अश्विनीताई त्याचे बोलणे प्रेमाने ऐकते. ‘गोंधळलेल्या स्थितीत असलेल्या साधकाला प्रेमाने स्वीकारून त्याला प्रोत्साहित कसे करायचे ?’, हे मला तिच्याकडून शिकायला मिळाले. ती प्रत्येक साधकाचा आढावा शांतपणे ऐकते. पहिल्या साधकाच्या मनातील सर्व शंकांचे निरसन झाल्यावरच ती दुसर्‍या साधकाचा आढावा घेते.

२ इ. इतरांना समजून घेणे : अश्विनीताई इतरांना चांगल्या प्रकारे समजून घेते. ती साधकांना इतक्या चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करते की, साधकांनाही स्वतःला समजून घेणे सोपे होते.

२ ई. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेचा सखोल अभ्यास असणे : तिच्यात ‘एखाद्या साधकाचा कोणता स्वभावदोष किंवा अहंचा पैलू त्याच्या साधनेत अडथळा ठरत आहे’, हे समजून घेण्याची क्षमता आहे. त्यामुळे ती त्याला योग्य दिशेने मार्गदर्शन करू शकते. एखाद्या साधकाची चूक ऐकतांना मला वाटते, ‘ताई यावर काय दृष्टीकोन देणार ?’ ताई त्या समस्येवर योग्य मार्गदर्शन करते.

२ उ. संयम : एखाद्या साधकाने सांगितलेली अडचण अश्विनीताई अत्यंत संयमाने उलगडून सांगते. एखादी समस्या सुलभ करण्याचे कौशल्य अश्विनीताईमध्ये आहे. ती जटील वाटणार्‍या समस्या सोप्या करून सांगते. ती साधकाने सांगितलेल्या प्रसंगाचा पूर्ण अभ्यास करते आणि ‘आरंभीच आपण साधनेतील मूलभूत सूत्रांचा अवलंब केला असता, तर परिस्थिती एवढी कठीण झाली नसती’, याची संबंधित साधकाला जाणीव करून देते.

२ ऊ. निष्कर्ष न काढणे : अश्विनीताई कधीही निष्कर्ष काढत नाही. तिच्या मनात कोणाबद्दल पूर्वग्रह नसतो. तिच्याकडून योग्य दृष्टीकोन मिळण्यासाठी आणि आमच्या समस्येचे समाधान मिळवण्यासाठी आम्ही आमच्या चुका तिला सांगण्यास उत्सुक असतो. ती साधकाला योग्य प्रश्न विचारून त्याच्याकडून संपूर्ण माहिती मिळाल्यानंतरच योग्य दृष्टीकोन देऊन मार्गदर्शन करते.

२ ए. तत्त्वनिष्ठ : अश्विनीताई तत्त्वनिष्ठ आहे. एखादा साधक स्वतःच्या चुकांकडे न पहाता इतरांच्या चुकांकडे पाहून प्रतिक्रियात्मक बोलत असेल, तर ताईला सूक्ष्मातून ‘त्या साधकाचा प्रबळ स्वभावदोष कोणता आहे ?’, ते समजते. ‘आपण कुठे चुकत आहोत’, हे त्या साधकाच्या लक्षात येईपर्यंत ताई त्याला समजावून सांगते.

२ ऐ. आध्यात्मिक स्तरावर मार्गदर्शन करणे : अश्विनीताई नेहमी आध्यात्मिक स्तरावर मार्गदर्शन करते. ती साधनेच्या मूलभूत तत्त्वांना धरून बोलते. ती बौद्धिक स्तरावरील आणि ऐकायला सुखद वाटणारे उत्तर कधीच देत नाही. ती एखाद्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी काही क्षण घेते. त्या वेळी ‘ती देवाच्या अनुसंधानात राहून त्या साधकाला आवश्यक असलेले प्रेरणादायी उत्तर देते’, असे मला जाणवते.

२ ओ. कर्तेपणा गुरुचरणी अर्पण करणे : ‘ताई, तू आढावा चांगला घेतेस’, असे तिला सांगितल्यावर ती लगेच त्याचे श्रेय प.पू. गुरुदेवांना देते आणि ‘तेच माझ्या माध्यमातून आढावा घेत असतात’, असे सांगते.

प.पू. गुरुदेवांच्या कृपेने मला अश्विनीताई घेत असलेल्या आढावा सत्संगाला बसण्याची संधी मिळते. प.पू. गुरुदेवांनी आम्हाला अश्विनीताईसारखी साधकांना घडवणारी साधिका दिल्याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’

– एक साधिका, फोंडा, गोवा. (३०.१.२०२४)