सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या दिवशी वाराणसी आश्रमातील साधकांना आलेल्या अनुभूती
११.५.२०२३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव साजरा करण्यात आला. त्या वेळी वाराणसी आश्रमातील साधकांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. श्री. प्रशांत वैती
१ अ. जन्मोत्सवासाठी वाराणसी आश्रमात गेल्यावर मनावरील ताण न्यून होणे : ‘जन्मोत्सवासाठी आश्रमात येण्यापूर्वी घरातील अडचणींमुळे माझे मन अस्वस्थ होते. जवळजवळ एक मासापासून सेवा करतांना माझ्या मनाला आनंद मिळत नव्हता. ‘घरच्या अडचणींमुळे पुढे काय होणार ?’, असा विचार माझ्या मनात अधिक प्रमाणात रहात होता. मन सतत भयग्रस्त होते. ९.५.२०२३ च्या रात्री ११.४५ वाजता मी जन्मोत्सवासाठी वाराणसी आश्रमात आलो. त्यानंतर माझ्या मनाच्या स्थितीमध्ये पुष्कळ परिवर्तन झाले. माझे मन शांत आणि स्थिर झाले. घरची परिस्थिती पालटली. सेवा करतांना मला आनंद अनुभवता येऊ लागला होता.
१ आ. प्रत्यक्ष जन्मोत्सवाच्या दिवशी सेवेतून आनंद मिळणे आणि मोगर्याच्या सुगंधाची अनुभूती येणे : जन्मोत्सवाच्या वेळी मला तांत्रिक सेवा करण्याची संधी मिळाली होती. ती सेवा अगदी सहजतेने होऊन मला आनंद मिळत होता. कार्यक्रम पहातांना मला मोगर्याचा तीव्र सुगंध येत होता. काही वेळानंतर जेव्हा दोन्ही सद्गुरूंनी गुरुचरणांवर मोगर्याची फुले अर्पण केली, तेव्हा माझे मन प्रफुल्लित झाले आणि मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात अधिवक्ता कृष्णमूर्ती यांची अनुभूती ऐकून मनात पुष्कळ भाव जागृत झाला होता. एका धर्मप्रेमी अधिवक्त्याची गुरुदेवांप्रती श्रद्धा पाहून माझ्या मनाला जाणीव झाली की, ‘माझी गुरुचरणांप्रती श्रद्धा अल्प प्रमाणात आहे.’
१ इ. जन्मोत्सवानंतर स्वतःच्या साधनेविषयी चिंतन होणे : जन्मोत्सवानंतर असे चिंतन झाले की, ‘माझे गुरुदेव सर्वशक्तीमान आहेत आणि माझीच श्रद्धा अल्प पडत असल्यामुळे माझे मन घरच्या अडचणींविषयी घाबरते. मनात हा विचार दृढ झाला की, गुरुदेव सगळे सांभाळतील. मला सर्वकाही त्यांच्यावर सोपवून केवळ साधनेविषयी विचार करायचा आहे. साधना वाढवण्याकडे लक्ष द्यायचे आहे.’
२. श्री. राजन केसरी
२ अ. पू. संजीव कुमार (सनातनचे ११५ वे संत, वय ७३ वर्षे), पू. प्रदीप खेमका (सनातनचे ७३ वे संत, वय ६४ वर्षे), पू. (सौ.) सुनीता खेमका (सनातनच्या ८४ व्या संत, वय ६३ वर्षे) या संतांनी अनुभव कथन केल्यावर त्यातून चिंतन होऊन साधनेचे ध्येय निश्चित होणे : जेव्हा गुरुदेव रथातून सर्व साधकांना करुणामय दृष्टीने पहात नमस्कार करत होते. तेव्हा माझे मन कृतज्ञतेने भरून आले. ‘रथातून पांढरा दिव्य प्रकाश बाहेर पडत आहे’, असे मी अनुभवले. पू. संजीव कुमार, पू. प्रदीप खेमका, पू. (सौ.) सुनीता खेमका, ‘पितांबरी उद्योगा’चे मालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ६१ वर्षे) आणि अधिवक्ता कृष्णमूर्ती (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ४५ वर्षे) यांनी जे अनुभवकथन केले, त्यातून मला पुष्कळ प्रेरणा मिळाली. ‘ते कशा प्रकारे गुरुदेवांवर अतूट श्रद्धा ठेवून साधनेचे प्रयत्न करत आहेत’, हे मला शिकता आले. मनात एकच विचार आला की, ‘आता प्रत्येक क्षणी मला गुरुदेवांच्या स्मरणातच रहायचे आहे. जसे त्यांनी साधनेविषयी सांगितले आहे, तसेच प्रयत्न मला करायचे आहेत’, असे मनाचे ध्येय निश्चित झाले.’
३. सौ. प्राची जुवेकर
३ अ. वाराणसीला जाण्यासाठी रेल्वेचे तिकीट निश्चित न झाल्याने तळमळीने प्रार्थना होणे : ‘मी कौटुंबिक कामासाठी गावी गेले होते. ‘गुरुदेवांचा जन्मोत्सव ११.५.२०२३ या दिवशी आहे’, हे लक्षात ठेवून मी ९.५.२०२३ या दिवशी वाराणसीला पोचण्याचा विचार करून ४ मासांपूर्वी तिकीट काढले होते; परंतु त्या वेळी मी प्रतीक्षा सूचीत १ क्रमांकावर होते. येतांना प्रतीक्षा सूचीत तिकीट निश्चित न झाल्यामुळे वाराणसीला वेळेवर पोचण्यात मला अडचण आल्यावर माझे मन विचलित झाले. त्या वेळी जिल्ह्यातील पुष्कळ महत्त्वाची सेवा चालू होती. तेव्हा अगदी आतून प्रार्थना झाली की, ‘काहीतरी व्यवस्था व्हावी, ज्यामुळे माझी सेवा होऊ शकेल.’
३ आ. गोव्याला जाण्यासाठी गाडीत एक जागा शिल्लक असूनही गुरुआज्ञापालनाचा विचार येऊन मन सिद्ध न होणे : जळगावचे साधक गोव्याला जन्मोत्सवाच्या कार्यक्रमासाठी जाणार होते. माझ्या मुलाने सहजपणे मला म्हटले, ‘‘जर तुझे तिकीट निश्चित झाले नाही, तर गोव्याला जाणार्या गाडीत एक आसंदी रिकामी आहे. तू गोव्याला जाऊ शकतेस.’’ त्या वेळी माझ्या मनात केवळ हाच विचार होता की, ‘गुर्वाज्ञा सर्वतोपरी आहे. उत्तर भारतातील साधकांसाठी गोव्याला जाण्याची सूचना मिळाली नाही. मी गोव्याला गेले, तर गुरूंचे दर्शन होईल; परंतु गुरुकृपेपासून वंचित होऊन माझी साधना होणार नाही.’
३ इ. भ्रमणसंगणकावर (लॅपटॉप) सेवा करण्यासाठी रेल्वेमध्ये जागा उपलब्ध झाल्याने दिवसभर सेवा करू शकणे आणि दोन्ही हातांवर दैवी कण येणे : गुरुदेवांच्या कृपेने मला रेल्वेचे तिकीट मिळाले. त्या वेळी मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. मी एकच प्रार्थना केली की, ‘मला अन्य कुठलीच सुविधा मिळाली नाही, तरी चालेल. केवळ भ्रमणसंगणकावर (लॅपटॉप) सेवा करण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी.’ मे मासात शयनयानात पुष्कळ गर्दी असते; परंतु ईश्वराच्या कृपेने माझ्या डब्यात काहीच अडचण आली नाही. मी सकाळपासून रात्रीपर्यंत सेवा करू शकले. सेवा करतांना पुष्कळ उत्साह वाटत होता. माझ्या दोन्ही हातांवर दैवी कण आले होते.
३ ई. परात्पर गुरुदेव आणि दोन्ही सद्गुरु सर्व साधकांना वात्सल्याने भावविभोर होऊन पहात असणे : ब्रह्मोत्सवाच्या दिवशी कार्यक्रम पहातांना सनातनच्या साधकांना एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र पाहून पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. जेव्हा रथावर गुरुदेव आणि दोन्ही सद्गुरु विराजमान होऊन सर्व साधकांना वात्सल्याने भावविभोर होऊन पहात होते. ते पाहून असे वाटले, ‘त्यांच्यासाठी साधकच सर्वाधिक महत्त्वाचे आहेत.’ यामुळे माझ्या हे लक्षात आले की, मला जर गुरुदेवांचे मन जिंकायचे असेल, तर त्यांच्या प्राणप्रिय साधकांचे मन जिंकण्यासाठी माझ्यामध्ये प्रेमभाव वाढवला पाहिजे.
३ उ. दृढ श्रद्धेचे महत्त्व मनावर बिंबणे : शेवटी साधक आणि संत यांनी जे मनोगत सांगितले, ते ऐकून जीवनात साधनेला प्रथम स्थानी ठेवून मन लावून सतत प्रयत्न केल्यावर गुरुदेव आमच्या कौटुंबिक आणि व्यावहारिक जीवनाचा भार वहातात. हे ऐकून माझ्या मनावर दृढ श्रद्धेचे महत्त्व बिंबले. जन्मोत्सवाच्या कार्यक्रमानंतर ‘श्री गुरवे नमः ।’ हा नामजप आपोआप होऊ लागला. पुष्कळ दिवसानंतर १२.५.२०२३ या दिवशी माझा सकाळचा नामजप अत्यंत एकाग्रतेने झाला. तेव्हा माझे मन निर्विचार झाले होते.’
४. सौ. संगीता देवी
४ अ. ‘गुरुदेवांचा रथ हवेत उडत आहे’, असे अनुभवणे : ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचा जन्मोत्सव पहातांना जेव्हा मी डोळे बंद करून भगवान श्रीकृष्णाचा नामजप करत होते, तेव्हा ‘गुरुदेवांचा रथ हवेत उडत आहे’, असे मी अनुभवले. त्या वेळी माझा भाव जागृत होत होता. मला वाटत होते की, ‘जणू माझा रोम-रोम रोमांचित होत आहे.’ ‘माझे त्रास बाहेर पडत आहेत’, हे मलाही अनुभवता आले. तिन्ही गुरूंच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
५. श्री. मिथिलेश वर्मा
५ अ. ‘ईश्वराची लीलाच पहात आहे’, असे अनुभवणे : ‘एका अद्भुत, दिव्य आणि अविस्मरणीय घटनेचे साक्षीदार होण्याचा मनाला जो आनंद वाटला अन् जे प्रेम निर्माण झाले, ते माझ्या कल्पनेपलीकडचे होते. माझे मन मोहमायेपासून दूर होऊन एकटक गुरुदेवांना न्याहाळत होते. असे वाटत होते की, ‘जणू मी ईश्वराची लीलाच पहात आहे. प्रत्येक जिवामध्ये ईश्वराचा वास आहे.’ माझे मन भावविभोर झाले होते. तेथे कोणतेही शब्द नव्हते. केवळ ‘काळ थांबावा आणि हे दृश्य तेवढे चालू रहावे’, असे मला वाटत होते.’
(सर्व सूत्रांचा दिनांक १८.५.२०२३)
(क्रमशः)
|
याच्या नंतरचा भाग वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/820407.html