स्वामी विवेकानंद यांचे कर्म करण्याविषयीचे विचार

स्वामी विवेकानंद

१. जेव्हा स्वतःविषयीचा आणि स्वार्थाविषयीचा कोणताही विचार आपल्या मनाला शिवत नाही, तेव्हाच आपल्या हातून सर्वाेत्कृष्ट कर्म घडते. तेव्हाच आपला सर्वांत अधिक प्रभाव पडतो. पूर्णपणे निरपेक्ष व्हा, फलाविषयी पूर्णपणे उदासीन रहा. तेव्हाच तुम्ही यथार्थ कर्म करू शकाल.

२. अशुद्ध विचार वा अशुद्ध कल्पना ही अशुद्ध कर्माएवढीच वाईट आहे. आपल्या इच्छेवर जर आपले प्रभुत्व असेल, तर त्यापासून नेहमी सर्वाेच्च फळाचीच प्राप्ती होईल.

३. आपली चांगली आणि वाईट दोन्ही कर्मे विसरून जा अन् त्यांचा पुन्हा कधीही विचार करू नका. जे झाले, ते झाले. त्याकडे पुन्हा दृष्टी वळवू नका. खुळचट समजुतींचा त्याग करा. साक्षात् मृत्यू जरी समोर उभा ठाकला, तरी दुर्बलतेला स्थान देऊ नका. पश्चात्ताप करत बसू नका. गतकर्मांचा उगीच विचार करत बसू नका. ‘आझाद’ (मुक्त) व्हा !

(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)