साधकांना होणार्या त्रासावर परिणामकारक नामजपादी उपाय सांगणारे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ !
१. विविध प्रकारचे औषधोपचार करूनही उचकीचा त्रास न्यून न होणे
‘२३.१२.२०२३ या दिवसापासून माझ्या बाबांना (श्री. विश्वास रतन बागुल, वय ७१ वर्षे) उचकीचा त्रास चालू झाला. तेव्हा ‘उचकी येणे आपोआप न्यून होईल’, असे मला वाटले. त्यामुळे मी २ दिवस त्याकडे दुर्लक्ष केले. उचकी न थांबल्यामुळे बाबा आयुर्वेदीय वैद्यांकडे गेले. त्यांनी दिलेली औषधे २ दिवस घेऊनही पालट न झाल्यामुळे ते आधुनिक वैद्यांकडे गेले.
२. आधुनिक वैद्यांनी दिलेल्या गोळ्या घेऊनही बरे न वाटणे
त्या काळात बाबांचा उचकीचा त्रास अधिक प्रमाणात वाढला आणि त्या समवेत कोरडा खोकलाही चालू झाला. बाबा झोपतांना त्याची तीव्रता वाढत असे. बाबांना खोकल्यामुळे रात्रभर झोप येत नव्हती. त्यामुळे त्यांना बसून रहावे लागत होते. आधुनिक वैद्यांनी दिलेल्या गोळ्या घेऊनही त्यांना बरे वाटले नाही. त्यामुळे मला काळजी वाटू लागली.
३. बाबांची ‘सोनोग्राफी’ केल्यावर सर्व अहवाल सामान्य येणे
काही वेळा उचकी लागल्यावर घशामध्ये पुष्कळ त्रास होऊन बाबांना वेदना व्हायच्या. नंतर दुसर्या आधुनिक वैद्यांकडे गेल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘आतड्यांना जर पीळ पडला असेल, तर अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो. त्यासाठी ‘सोनोग्राफी’ (टीप) करूया.’’ बाबांची ‘सोनोग्राफी’ केल्यावर सर्व अहवाल सामान्य आले.
टीप – सोनोग्राफी : विशिष्ट ध्वनीलहरींच्या साहाय्याने पोटातील अवयवांची चित्रे घेण्याची चाचणी.
४. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेल्या नामजपाने उचकी पूर्णपणे थांबणे
‘सोनोग्राफी’ केल्यावर सर्व अहवाल सामान्य आले. तेव्हा ‘हा आध्यात्मिक त्रास असू शकतो’, असे माझ्या लक्षात आले. त्यानंतर सद्गुरु नंदकुमार जाधव यांना सर्व प्रसंग सांगितला. त्यांनी मला सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेला ‘श्री गणेशाय नमः। श्री गणेशाय नमः । ॐ नमो भगवते वासुदेवाय । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप प्रतिदिन एक घंटा करण्यास सांगितला. या नामजपाने उचकी येण्याची तीव्रता न्यून होऊ लागली. साधारण १.१.२०२४ या दिवशी उचकीचा त्रास न्यून होऊ लागला आणि २.१.२०२४ या रात्री १२ वाजल्यापासून उचकी येणे पूर्णपणे थांबले. यावरून ‘सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांनी दिलेला नामजप किती परिणामकारक आहे’, हे माझ्या लक्षात आले.’
– श्री. सतीश बागुल, नंदुरबार (४.६.२०२४)
|