सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर पू. (श्रीमती) राधा प्रभु यांना होणारा अन्ननलिकेचा त्रास न्यून होणे
१. अन्ननलिकेत आतल्या बाजूला जखम झाल्याने अन्न गिळतांना त्रास होणे, तिथे फोड येऊन जखम झाल्याचे आधुनिक वैद्यांनी सांगणे
‘अनुमान १ मासापासून मला अन्न गिळतांना त्रास होत होता. भात किंवा भाजी चांगली शिजलेली असूनही गिळतांना उचकी किंवा खोकला येत असे. लगेच उलटीसुद्धा होत असे. आश्रमात महाप्रसाद घेत असतांना २ – ३ वेळा असेच झाले; म्हणून ‘आश्रमातील वैद्य साधकांनी एकदा आधुनिक वैद्यांना दाखवून घ्या’, असे मला सांगितले. शल्यविशारदांनी माझ्या अन्ननलिकेचे परीक्षण करून अन्ननलिकेत आतल्या बाजूला किंचित् जखम झाली आहे’, असे सांगून तिचे परीक्षण करण्यासाठी एक दिवस रुग्णालयात सकाळी ९ वाजता उपाशी पोटी केवळ शहाळ्याचे पाणी पिऊन येण्यास सांगितले. त्यांनी परीक्षण करून काही औषधे लिहून दिली. १५ दिवसांनंतर सकाळी ९ वाजता अशाच रितीने येण्यास सांगितले.
२. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले उपाय आणि प्रार्थना केल्यावर आलेली अनुभूती
२ अ. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी त्रासनिवारणार्थ सांगितलेला जप करून प्रार्थना करणे : एक दिवस मी स्नान करून देवाची आरती केली. शहाळ्याचे पाणी देवापुढे ठेवून मी सद्गुरु मुकुल गाडगीळकाकांनी मला हा त्रास निवारण्यासाठी दिलेला जप एक घंटा केला. त्यानंतर मी श्रीकृष्णाचे चित्र आणि सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव यांचे छायाचित्र यांना पुढील प्रार्थना करत थोडे थोडे शहाळ्याचे पाणी प्यायले. ‘हे श्रीकृष्णा, हे गुरुदेव, तुमच्या दिव्य चरणांचे हे पवित्र गंगाजल आहे’, असा भाव ठेवून मी हे जल पीत आहे. हे तीर्थ माझ्या अन्ननलिकेतून आत जातांना अन्ननलिकेच्या आतल्या भागात मला झालेली जखम नष्ट करतच ते खाली उतरू दे. आज आधुनिक वैद्य परीक्षण करतांना जखम स्वच्छ झालेली असू दे.’
२ आ. ‘तुमचा त्रास ५० टक्क्यांपेक्षा अधिक न्यून झाला असून काळजी करण्यासारखे काहीही नाही’, असे आधुनिक वैद्यांनी सांगणे : सकाळी ९ वाजता परीक्षण करतांना आधुनिक वैद्य (शल्यविशारद) आश्चर्याने आणि आनंदाने मला म्हणाले, ‘‘अम्मा, तुमचे आरोग्य ५० टक्क्यांपेक्षा अधिक चांगले आहे. (तुमचा त्रास ५० टक्क्यांपेक्षा अधिक न्यून झाला आहे.) काळजी करण्यासारखे काहीही नाही. पहिल्यांदा परीक्षण करतांना थोडे रक्त दिसले होते. ‘ते काय आहे ?’ हे पहाण्यासाठी मी पुन्हा परीक्षण केले. तुम्हाला कोणताही मोठा आजार (व्याधी) नाही. घाबरू नका.’’
हे गुरुदेव, हे श्रीकृष्णा, ‘तुमच्या कृपाशीर्वादाने माझे भय दूर झाले आहे. त्यासाठी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! मी आता पुष्कळ आनंदात आहे. ‘असेच शेवटपर्यंत मला आनंदात ठेवा’, हीच आपल्या चरणी प्रार्थना !’
-(पू.) श्रीमती राधा प्रभु (सनातनच्या ४४ व्या (समष्टी) संत, वय ८७ वर्षे), मंगळुरू (२५.४.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |