Global Development Modi :  जागतिक विकासात भारताचा सहभाग वाढून झाला तब्‍बल १६ टक्‍के ! – पंतप्रधान

 गेल्‍या १० वर्षांत २५ कोटी भारतीय गरिबीतून आले बाहेर !

नवी देहली – माझा देश कधीही मागे हटू शकत नाही. मी ‘सीआयआय’चे (भारतीय उद्योग महासंघाचे) मनापासून आभार व्‍यक्‍त करतो. मला आठवते की, तुम्‍ही कोरोना महामारीच्‍या काळात पुष्‍कळ काळजी घेतली. प्रत्‍येक चर्चेच्‍या केंद्रस्‍थानी हा विषय होता की ‘भारताची वाढच कशी होईल !’ आज आपण सर्वजण विकसित भारताच्‍या प्रवासावर चर्चा करत आहोत. जागतिक विकासात भारताचा सहभाग वाढून तब्‍बल १६ टक्‍के झाला आहे. तसेच गेल्‍या १० वर्षांत २५ कोटी भारतीय गरिबीतून बाहेर आले आहेत, असे महत्त्वपूर्ण वक्‍तव्‍य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते येथील विज्ञान भवन येथे ‘जर्नी टू विकसित भारत (डेव्‍हलप्‍ड इंडिया) : पोस्‍ट-युनियन बजेट २०२४-२५’ नावाच्‍या परिषदेच्‍या उद़्‍घाटनप्रसंगी बोलत होते. भारतीय उद्योग महासंघाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

पंतप्रधान पुढे म्‍हणाले की,

१. आज भारत जगातील पाचवी सर्वांत मोठी आर्थिक शक्‍ती आहे आणि तो दिवस दूर नाही जेव्‍हा आपण तिसरी सर्वांत मोठी आर्थिक शक्‍ती बनू ! माझ्‍या तिसर्‍या कार्यकाळात देश तिसरी अर्थव्‍यवस्‍था बनणार आहे. सरकारने अर्थव्‍यवस्‍थेचा तपशील घोषित केला आहे.

२. अर्थसंकल्‍प १६ लाख कोटींपासून ४८ लाख कोटी रुपयांवर पोचला आहे.

३. यापूर्वी अर्थसंकल्‍पातील घोषणांची कार्यवाही होऊ शकली नाही. (पूर्वीचे सरकार केवळ) घोषणा करत असल्‍याने बातम्‍यांचे मथळे बनत असत. योजना वेळेत पूर्ण करण्‍यावर पूर्वीच्‍या सरकारांचा भर नव्‍हता. १० वर्षांत आम्‍ही ही परिस्‍थिती पालटली आहे.

४. देशातील नागरिकांच्‍या जीवनमान उंचावण्‍यावर आम्‍ही भर देत आहोत. आम्‍ही कौशल्‍य विकास आणि रोजगार यांवर भर दिला आहे. अर्थसंकल्‍पात जाहीर केलेल्‍या ‘पंतप्रधान पॅकेज’चा ४ कोटी तरुणांना लाभ होणार आहे.

उच्‍च वाढ आणि अल्‍प महागाई असलेला भारत हा एकमेव देश ! – पंतप्रधान

कोरोना महामारीसारख्‍या अनिश्‍चिततेच्‍या काळातही परकीय चलनाच्‍या साठ्यात लक्षणीय वाढ झाली. उच्‍च वाढ आणि अल्‍प महागाई असलेला भारत हा एकमेव देश आहे. एवढी मोठी महामारी असूनही भारताचा आर्थिक विवेक संपूर्ण जगासाठी आदर्श आहे. महामारी, युद्धे आणि नैसर्गिक आपत्ती असतांनाही हे घडले आहे. जर ही संकटे आली नसती, तर भारत आज जिथे आहे, त्‍यापेक्षा वरच्‍या पातळीवर गेला असता.

संपादकीय भूमिका

भारताने घेतलेल्‍या आर्थिक भरारीविषयी विरोधी पक्ष सोडले, तर कुणाचेच दुमत नसावे. गेल्‍या १० वर्षांत भारत पाचवी सर्वांत मोठी अर्थव्‍यवस्‍था बनणे यातच सर्वकाही आले. असे असले, तरी या आर्थिक वाढीला धर्माचा आधार नसल्‍याने ही स्‍थिती केव्‍हाही कोलमडू शकते. त्‍यामुळे पंतप्रधानांनी अध्‍यात्‍माधारित विकासासाठी येणार्‍या ५ वर्षांत करावे, असेच जनतेला अपेक्षित आहे !