Jamaat E Islami Ban : बांगलादेशात ‘जमात-ए-इस्लामी’ संघटनेवर बंदी
आरक्षणावरून केला होता हिंसाचार !
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील सत्ताधारी अवामी लीग सरकारने कट्टरतावादी संघटना ‘जमात-ए-इस्लामी’वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. जमातसोबतच त्याची विद्यार्थी संघटना ‘छात्र शिबीर’वरही बंदी घालण्यात येणार आहे. जमात-ए-इस्लामी आणि छात्र शिबीर यांच्यावर बांगलादेशमधील अलीकडील आरक्षणाच्या प्रकरणावरून हिंसाचार पसरवल्याचा आरोप आहे. या हिंसाचारामध्ये २०० हून अधिक लोक मारले गेले.
सत्ताधारी अवामी लीगचे सरचिटणीस ओबेदुल कादर यांनी सांगितले, ‘जमातने आतंकवादी आक्रमणे करून सामान्य लोकांची हत्या केली. त्यामुळे या संघटनेवर बंदी घालण्याचे सरकारने मान्य केले. विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनल पार्टी आणि जमात देशात अराजकता निर्माण करण्याचा कट रचत आहेत. १४ पक्षांच्या आमच्या आघाडी सरकारने राष्ट्रहितासाठी देशविरोधी शक्तींचा नायनाट करण्यासाठी जमात आणि छात्र शिबीर यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे.’
जमात-ए-इस्लामीचा देशविरोधी इतिहास
यापूर्वी जमात-ए-इस्लामी संघटनेला बांगलादेशाच्या निवडणुकीत भाग घेण्यास बंदी घालण्यात आली होती. बांगलादेशाच्या स्वातंत्र्य चळवळीला जमात-ए-इस्लामीच्या नेतृत्वाने विरोध केला होता. संघटनेने वर्ष १९७१ मध्ये पाकिस्तानी सैन्याला पाठिंबा दिला होता. ऑक्टोबर २०१८ मध्ये उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बांगलादेशाच्या निवडणूक आयोगाने जमात-ए-इस्लामीची नोंदणी रहित केली होती.
संपादकीय भूमिकाबांगलादेशात जिहादी संघटनांवर तात्काळ बंदी घातली जाते; मात्र भारतात यासाठी जनतेला अनेक वर्षे मागणी करावी लागते ! |