साधिकेची घरी असतांना साधनेच्या संदर्भात झालेली विचारप्रक्रिया आणि तिला आलेल्या अनुभूती
१. घरी असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे साधना होत असणे
‘मी घरी असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने माझ्याकडून थोडीफार साधना होत होती. माझी त्यांच्यावर असलेली श्रद्धा मला साधना करायला साहाय्य करत होती. ‘प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार येतात. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या स्तरावर संघर्ष करणे, कष्ट घेणे, असे चालूच असते. संघर्षावर मात करण्यासाठी ‘प्रयत्न कसे करायचे ? कसे जिंकायचे ?’, हे ती परिस्थिती आणि ती व्यक्ती यांवर अवलंबून असते. काही जणांना कृतीच्या स्तरावर, तर काही जणांना मनाच्या स्तरावर प्रयत्न करावे लागतात. त्यात आपण जिंकतो किंवा हरतो; पण जो न्यूनता घेतो, तो खरा भक्त असतो’, हे मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून शिकायला मिळाले.
२. ‘चुका मनापासून स्वीकारून आणि त्यावर प्रायश्चित्त घेऊन साधनामार्गावर पुढे मार्गक्रमण करायला हवे’, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शिकवले असणे
मी पूर्वी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करत होते; पण काही कारणांमुळे मी घरी आले आणि घरीच राहिले. ‘यात माझी चूक असेल किंवा माझे प्रारब्ध असेल. आता त्याला दोष देऊन काही उपयोग नाही. जे झाले, ते मनापासून स्वीकारता यायला हवे. साधकांची खरेच चूक असेल, तर प्रायश्चित घेऊन त्याचे पापक्षालन करायला हवे. चुका मनापासून स्वीकारून प्रयत्न करायला हवेत आणि प्रायश्चित्त घेऊन साधनामार्गावर पुढे मार्गक्रमण करायला हवे’, यालाही तेवढेच महत्त्व आहे’, हे गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) दाखवून दिले आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी या जिवाला पुष्कळ शिकवले आहे. त्यांच्यापासून हा जीव दूर जाऊ शकत नाही.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधिकेच्या संदर्भात काढलेल्या उद्गारांचे साधिकेला स्मरण होऊन तिला साधना करण्यासाठी प्रेरणा मिळणे
माझ्या मनाचा संघर्ष होत असतांना मला परात्पर गुरु डॉक्टरांचे शब्द आठवतात. मी घरी जात असतांना श्री. वीरेंद्र मराठे यांनी मला सांगितले, ‘‘एकदा परात्पर गुरु डॉक्टरांनी तुझा लेख वाचून म्हटले होते, ‘‘हा जीव कुठेही असला, तरीही एकलव्यासारखी साधना करील. या जिवाने साधना करण्यासाठी आश्रमातच रहायला हवे, असे नाही, तर या जिवाची घरी राहूनही साधना होणार आहे.’’ प.पू. डॉक्टरांचे हे बोल मला साधनेसाठी प्रेरणा आणि आशीर्वाद देणारे आहेत. ‘त्यांनी माझ्यासाठी संकल्प केला आहे’, असे मला वाटते.
४. साधिकेला कोरोना महामारीचा काळ साधनेसाठी प्रेरणादायी ठरणे
कोरोना महामारीच्या कालावधीत कुणीच घराबाहेर पडू शकले नाही; मात्र साधकांची साधना चालू राहिली. अन्य सर्व व्यवहार थांबले होते; पण साधकांची साधना खर्या अर्थाने चालूच होती. या काळात अनेक साधकांनी चांगली साधना करून प्रगती करून घेतली आहे. माझ्यासाठी हा काळ प्रेरणादायी ठरला आहे. देव माझ्याकडून घरातील प्रत्येक सेवा करून घेत होता.
५. साधकांच्या संपर्कात नसतांनाही ‘देव साधनेचे प्रयत्न करून घेत आहे’, याबद्दल कृतज्ञता व्यक्त होणे आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ घेत असलेला भक्तीसत्संग ऐकून आनंद होणे
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ घेत असलेल्या भक्तीसत्संगातील चैतन्यामुळे साधकांसाठी आध्यात्मिक लाभ होत होते. ‘परात्पर गुरु डॉक्टरांना माझ्याकडून साधनेचे आणखी कोणते प्रयत्न करणे अपेक्षित आहे ?’, हे जाणून घेण्याच्या दृष्टीने माझ्याकडून भक्तीसत्संग ऐकला जात असे. महत्त्वाचे म्हणजे सत्संगात साधकांना करायला सांगितलेले प्रयत्न देव माझ्याकडून ८ दिवस आधीपासूनच करून घेत होता. मला सत्संग ऐकतांना आनंद होऊन देव आणि गुरु यांच्या प्रती पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. त्या काळात मी साधकांच्या संपर्कात नसतांना देव माझ्याकडून प्रयत्न करून घेत होता.
६. कुटुंबियांच्या अपघाताचे विचार मनात येणे आणि त्या वेळी ‘देव काळजी घेणार आहे’, अशी श्रद्धा असणे आणि प्रत्यक्षातही असाच प्रसंग घडणे
१८.१.२०२१ या दिवशी माझ्या मनात कुटुंबियांचा अपघात होण्याविषयीचे विचार येत होते. माझी मोठी ताई आणि बाबा कामानिमित्त बाहेरगावी जाणार होते. त्या वेळी मी ‘परात्पर गुरु डॉक्टर सूक्ष्मातून त्यांच्या समवेत आहेत. त्यामुळे त्यांना काही होणार नाही’, असा विचार करून सर्व देवावर सोपवून कामाला लागले. ताई आणि बाबा यांनी संध्याकाळी घरी आल्यावर मला सांगितले, ‘‘आमच्या वाहनाला अपघात झाला होता. देवाने आम्हाला वाचवले.’’ तेव्हा ‘माझ्या मनात सकाळी असे विचार का येत होते ?’, हे मला समजले. देवाने मला योग्य विचार सुचवून त्याच्यावरील श्रद्धा ढळू दिली नाही. ‘देवाने ताई आणि बाबा यांची काळजी घेतली’, याबद्दल मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञ आहे.
७. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना त्रास होत आहे’, असे जाणवून त्यांच्यासाठी श्रीकृष्णाला प्रार्थना होणे
१९.१.२०२१ या दिवशी संध्याकाळी १ घंटा मी झोपले होते. त्या वेळी मला झोपेतच मोठा ठसका लागला आणि मला त्रास होऊ लागला. ‘माझा मृत्यू होईल’, अशी मला भीती वाटत होती. मला वाटत होते ‘काहीतरी वाईट होणार होते; पण मी वाचले.’ ‘हा कसला तरी संकेत आहे; पण तो कोणता ?’, हे मला समजले नाही. नंतर मला परात्पर गुरु डॉक्टरांची काळजी वाटू लागली. माझ्या मनात ‘त्यांना काही झाले नाही ना ? त्यांना त्रास होत नसेल ना ?’, असे विचार येत होते. मी श्रीकृष्णाला प्रार्थना केली, ‘प.पू. डॉक्टरांना काही होऊ देऊ नकोस.’ त्यानंतर मला बरे वाटले. ‘मला असे का वाटले ?’, हे मला समजले नाही; पण माझ्या मनात ‘परात्पर गुरु डॉक्टरांना याविषयी निश्चितच ठाऊक असणार’, असा विचार आला.’
– गुरुदेवांची लेक, कु. आरती नारायण सुतार, म्हापसा, गोवा.
|