सातारा येथे पोलीस हवालदारावर सशस्त्र आक्रमण !
सातारा, २९ जुलै (वार्ता.) – येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात २८ जुलैच्या रात्री १० वाजता कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार दत्ता पवार यांच्यावर सशस्त्र आक्रमण झाले. एका दुचाकीवरून आलेल्या ३ युवकांनी हे आक्रमण केले. यामध्ये पवार हे गंभीर घायाळ झाले आहेत.
हवालदार दत्ता पवार हे मध्यवर्ती बसस्थानक परिसरामध्ये कर्तव्यावर होते. छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय परिसरात एका दुचाकीवरून ३ युवक भरधाव वेगाने जात असतांना त्यांना दत्ता पवार यांनी हटकले. याचा राग मनात धरून या युवकांनी आणखी काही जणांच्या साहाय्याने पवार हे मध्यवर्ती बसस्थानक परिसरात उभे असतांना त्यांच्यावर कोयत्याने आक्रमण केले. छातीवर जोरदार वार झाल्यामुळे पवार खाली कोसळले. या वेळी आक्रमण करणारे युवक पळून गेले. पवार यांना ८ टाके पडले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. हवालदार पवार यांची प्रकृती स्थिर आहे.
संपादकीय भूमिका :अशा आक्रमणकर्त्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक ! |