कोल्हापूरच्या पूर नियंत्रणासाठी प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही नाही ! – बाजीराव खाडे, निमंत्रक, पूरग्रस्त समिती
कोल्हापूर, २९ जुलै (वार्ता.) – वर्षानुवर्षे गंभीर होत चाललेल्या पूर परिस्थितीमुळे बागायती क्षेत्रासमवेत निवासी, व्यापारी, व्यावसायिक क्षेत्राची पुष्कळ मोठी हानी होत आहे. मानवनिर्मित चुकीच्या विकासकामांमुळे पुराच्या पाण्याची पातळी वाढत आहे. या संदर्भात पूरग्रस्त गावातील सरपंचांच्या सहभागातून पूरग्रस्त समितीची स्थापना झाली आहे. या समितीने १३० पूरग्रस्त ग्रामपंचायतींचे ठराव जिल्हाधिकारी यांना २४ सप्टेंबर २०२१ या दिवशी दिले होते. समितीने प्रशासनाला विविध मागण्या दिल्या होत्या आणि त्यात विविध विभागांसमवेत एकत्रित बैठक घेण्याच्या सूचना केल्या होत्या; मात्र दुर्दैवाने कोल्हापूरच्या पूर नियंत्रणासाठी प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असा आरोप पूरग्रस्त समितीचे निमंत्रक बाजीराव खाडे यांनी केला. ते २९ जुलैला ‘कोल्हापूर प्रेस क्लब’ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
१. पुराच्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण करणार्या रस्त्यावर मोर्या, वाहिन्या यांची कामे त्वरित चालू करावीत, पूरग्रस्त क्षेत्रातील रस्ते विकासाच्या कामास जलसंपदा विभागाची परिचलन शिफारस घेणे बंधनकारक करावे, यांसह विविध मागण्या आम्ही शासनाकडे केल्या होत्या.
२. वर्ष २०१९ चा महापूर आणि वर्ष २०२४ चा महापूर या ५ वर्षांच्या कालावधीत प्रशासन-शासन स्तरावर पूर नियंत्रणासाठी ठोस कार्यवाही केलेली दिसत नाही. पुराच्या पाण्याच्या नैसर्गिक निचर्यास अडथळे ठरणारे रस्त्याचे भराव, तसेच रेल्वेमार्गाचे भराव हटवून तेथे आवश्यक तेवढ्या लांबीचे पूल, पाणी जाण्यासाठी व्यवस्था करणे, तसेच अनधिकृत बांधकामे यांवर कारवाई करण्यासाठी शासन-लोकप्रतिनिधी यांनी सक्रियता दाखवली, तरच पूरग्रस्तांना दिलासा मिळणार आहे. सध्याच्या महापुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यात केवळ ऊस उत्पादक शेतकर्यांना ६ ते ७ लाख टन धान्याची हानी सोसावी लागणार आहे.
कोल्हापूरपासून आजूबाजूच्या खेड्यांना जोडणार्या गावांच्या रस्त्यांवर अनेक ठिकाणी माेठ्या इमारती उभारल्या आहेत. या इमारती उभारण्यासाठी ग्रामपंचायतींची अनुमती घेण्यात आलेली नाही. नगरविकास विभागाने अनुमती दिल्याने इमारती या जागी उभ्या आहेत, असाही आरोप या प्रसंगी पूरग्रस्त समितीच्या कार्यकर्त्यांनी केला.
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते वसंतराव मेढे म्हणाले, ‘‘आम्ही शाळेत असतांना पंचगंगा नदीचे पाणी थेट पिण्यासाठी वापरत असू, तसेच तेथीलच काठावरील माती घेऊन हात धूत असू. आज पंचगंगा नदीची अवस्था काय आहे ? यात अनेक ठिकाणी नाले, ओढे, तसेच सांडपाणी शुद्धीकरण न करता मिसळले जाते, तरी या संदर्भात महापालिका प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे.’’