अमरावती येथील सौ. मंजुश्री प्रदीप गर्गे यांनी गंभीर आजारपणात अनुभवलेली गुरुदेवांची कृपा !
१. साधिकेने कुलदेवता आणि गुरुदेव दत्त यांचे नामस्मरण केल्याने तिचा ‘टॉन्सिल्स’चा त्रास दूर होणे
‘वर्ष १९९७ मध्ये मी सनातन संस्थेच्या संपर्कात आले. मला ‘टॉन्सिल्स’चा (घशातील गाठीचा) तीव्र त्रास होता. मला घशात मोठे फोड येत असत. आधुनिक वैद्यांनी मला प्रत्येक मासात ‘पेनेसिलिन’चे इंजेक्शन घेण्यास किंवा शस्त्रकर्म करून घेण्यास सुचवले होते. मला साधकांनी कुलदेवता आणि गुरुदेव दत्त यांचा नामजप करायला सांगितला. मी नामजप चालू केल्यावर एका मासात माझा ‘टॉन्सिल्स’चा त्रास दूर झाला.
२. साधिकेने तिच्या एक वर्षाच्या मुलाच्या संदर्भात अनुभवलेली गुरुकृपा
२ अ. गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी साधिकेच्या मुलाला श्वास घ्यायला त्रास होणे, आधुनिक वैद्यांनी ‘मुलाचे शस्त्रकर्म करावे लागेल’, असे सांगणे : वर्ष १९९७ मध्ये अमरावती येथे गुरुपौर्णिमा होती. त्या वेळी माझा मुलगा एक वर्षाचा होता. गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी मुलाचे नाक बंद होऊन त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता. तेव्हा आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘मुलाच्या नाकाचे हाड वाढले आहे. त्याचे शस्त्रकर्म करावे लागेल.’’
२ आ. साधिकेने मुलासाठी नामजप करणे आणि गुरुपौर्णिमा उत्सवासाठी सभागृहात गेल्यावर मुलाला सहजतेने श्वास घेता येणे अन् त्याचे शस्त्रकर्म टळणे : आम्ही गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) प्रार्थना केली आणि गुरुपौर्णिमेनंतर मुलावर उपचार करायचे ठरवले. मी मुलाला मांडीवर घेऊन आणि गुरुदेवांचे छायाचित्र समोर ठेवून रात्रभर नामजप केला. मी गुरुपौर्णिमा उत्सवासाठी मुलाला समवेत घेऊन गेले. आम्ही सभागृहात गेल्यावर मुलाचे नाक मोकळे झाले आणि त्याला सहजतेने श्वास घेता आला. काही वेळातच मुलगा सभागृहात खेळू लागला. नंतर मुलाला श्वास घेतांना त्रास झाला नाही आणि त्याचे शस्त्रकर्म करण्याचे रहित झाले.
३. साधिकेला झालेल्या तीव्र पोटदुखीच्या त्रासात तिने अनुभवलेली गुरुकृपा
३ अ. साधिकेला तीव्र पोटदुखीचा त्रास होणे, तिच्या अनेक वैद्यकीय चाचण्या होणे आणि तिने तज्ञ आधुनिक वैद्यांकडून औषधोपचार घेणे : वर्ष १९९९ मध्ये मला तीव्र पोटदुखीचा त्रास चालू झाला. मी सतत गुरुमाऊलींना प्रार्थना करून नामजपादी उपाय करत होते. मी अमरावती येथील ५ – ६ शल्यविशारद यांच्याकडून उपचार घेतले. याविषयीची माहिती प्रतिदिन गुरुमाऊली दूरभाषवरून जाणून घेत असत.
३ आ. स्वप्नात वाईट शक्तींनी त्रास देणे आणि ‘परम पूज्य समवेत आहेत’, असे जाणवणे : मी रुग्णालयात भरती झाले. पहिल्या रात्री माझ्या स्वप्नात ४ सुवासिनी महिला आल्या. त्या मला म्हणाल्या, ‘तू जिवंत रहाणार नाहीस. तू ऊठ आणि आमच्या समवेत चल.’ तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘माझ्या समवेत परम पूज्य आहेत. ते जोपर्यंत सांगत नाहीत, तोपर्यंत मी उठणार नाही.’ त्यानंतर त्या नाहीशा झाल्या. तिसर्या दिवशी प.पू. गुरुदेवांनी दूरभाषवरून माझी विचारपूस केली. तेव्हा मी त्यांना या प्रसंगांविषयी सांगितले. त्या वेळी ते मला म्हणाले, ‘‘छान क्षात्रधर्म केलात. असेच पुढे लढायचे आहे.’’
३ इ. गुरुदेवांच्या कृपेने पोटदुखीचा त्रास दूर होणे : त्यानंतर ४ – ५ मास असेच त्रासात गेले. आमची आर्थिक स्थिती बेताची असतांनाही गुरुदेवांच्या कृपेने आम्हाला कसलीही अडचण आली नाही. आधुनिक वैद्यांकडून उपचार घेऊनही मला बरे वाटले नाही. तेव्हा गुरुदेव मला म्हणाले, ‘‘आपण सर्व उपाय केले. वैद्यकीय चाचण्या केल्या. वैद्यकीय चाचण्यांत कर्करोगासारखे काहीच आढळले नाही. आता पोट दुखणार नाही.’’ तेव्हापासून माझे पोट दुखण्याचे थांबले.
४. गर्भाशयाचे शस्त्रकर्म होणे आणि शल्यविशारदांनी पोटातून ५ किलो वजनाचा गोळा बाहेर काढणे अन् त्यांनी ‘केवळ गुरुदेवांच्या कृपेमुळेच तू जिवंत आहेस’, असे सांगणे
वर्ष २०११ मध्ये माझी पोटाची सोनोग्राफी (टीप) झाली. (टीप – सोनोग्राफी : विशिष्ट ध्वनीलहरींच्या साहाय्याने पोटातील अवयवांची चित्रे घेण्याची चाचणी) त्यात माझ्या गर्भाशयाची पिशवी फाटली असल्याचे निदान झाले. आधुनिक वैद्यांनी सांगितल्यानुसार माझ्या पोटाचे शस्त्रकर्म तातडीने करण्याचे ठरले. मी प्रार्थना करून रुग्णालयात भरती झाले. मला गुंगी येण्याची इंजेक्शने देण्यात आली; पण त्यांचा अल्प परिणाम झाला. मी शुद्धीवर असल्याने शस्त्रकर्म होत असतांना मला त्रास होत होता. मी परम पूज्यांकडे शक्ती मागत होते. मी परम पूज्यांना ‘तुम्हीच मला स्थिर ठेवा आणि शस्त्रकर्म करून घ्या’, अशी प्रार्थना करत होते. माझे शस्त्रकर्म ६ घंटे चालले. माझ्या पोटातून ५ किलो वजनाचा गोळा बाहेर काढण्यात आला. मला रक्त चढवण्यात आले. तेव्हा माझ्या शरिरावर लाल रंगाचे फोड आले. त्यामुळे मला आणखीन रक्त दिले नाही. तेव्हा शल्यविशारदही घाबरल्या. त्या त्यांच्या गुरुदेवांना प्रार्थना करत होत्या. त्या माझ्या डोक्यावरून हात फिरवत होत्या. तेव्हा ‘त्यांच्या हातांचा स्पर्श, म्हणजे गुरुदेवांच्या हातांचा स्पर्श आहे’, असे मला जाणवले. मला त्या रात्री उशिरा झोप लागली आणि सकाळी उशिरा जाग आली. शल्यविशारद मला म्हणाल्या, ‘‘केवळ गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेमुळेच तू जिवंत आहेस.’’ मला एक मासापूर्वी स्वप्नात या शस्त्रकर्माचा प्रसंग दिसला होता.
‘मी केवळ गुरुदेवांच्या अपार कृपेनेच जिवंत आहे’, त्याबद्दल त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरीही ती अल्पच आहे.’
– सौ. मंजुश्री प्रदीप गर्गे, अमरावती (१.१.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |