‘आदर्श नागरिक’ म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील (आय.ए.एस्.) अधिकार्‍यांची कर्तव्ये आणि उत्तरदायित्व !

भारतीय प्रशासकीय सेवेतील (आय.ए.एस्.) कनिष्ठ सनदी अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांनी केलेल्या मागण्या अन् त्यांचे वर्तन यांमुळे सध्या वाद निर्माण झाला आहे. या वादामुळे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकार्‍यांविषयी ‘आदर्श नागरिक’ म्हणून नेमकी काय भूमिका असावी ? आणि त्यांचे उत्तरदायित्व’, यांविषयी सध्या चर्चा चालू आहे.

कनिष्ठ सनदी अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर

१. पूजा खेडकर यांच्या प्रकरणाचा आढावा

पूजा खेडकर या वर्ष २०२३ च्या बॅचच्या (तुकडीच्या) असून त्यांनी ‘ज्युनिअर भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी’ म्हणून पुण्यात साहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांचे वर्तन आणि मागण्या यांमुळे मोठा वाद उद्भवला आहे. सूत्रांनुसार खेडकर यांनी कार्यभार स्वीकारण्यापूर्वी वेगळे कार्यालय, घर, अंबर दिव्याची गाडी आणि कर्मचारी मागितले होते, जे त्यांच्या वरिष्ठांना अनपेक्षित वाटले. पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याशी ‘व्हॉट्सॲप चॅट’मध्ये (संदेशामध्ये) त्यांनी ‘विशेष वागणूक मिळावी’, अशी सातत्याने विनंती केली.

पंतप्रधान कार्यालयाने या प्रकरणाविषयी पुणे जिल्हाधिकार्‍यांकडून अहवाल मागवल्यानंतर खेडकर यांचे वाशिम जिल्ह्यात स्थानांतर करण्यात आले. आदेश देण्यात आला होता. खेडकर यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी अजय मोरे यांच्या कार्यालयाच्या बाहेरील नावाची पट्टी काढली आणि त्यांनी तेथे स्वतःचे कार्यालय करण्याचा प्रयत्न केला. भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अपंगत्व आणि इतर मागासवर्गीय यांविषयीची खोटी प्रमाणपत्रे सादर केली.

श्री. नारायण नाडकर्णी

एवढेच नव्हे, तर प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांनी ‘यू.पी.एस्.सी.’चे (केंद्रीय लोकसेवा आयोगाचे) सर्व प्रयत्न संपल्यानंतरही नावामध्ये पालट करून परीक्षा दिल्याची माहिती समोर येत आहे. ‘पूजा खेडकर यांनी ११ वेळा परीक्षा दिली आहे’, असे वृत्त ‘साम टीव्ही’ने दिले आहे. सर्वसामान्यपणे पूजा यांना ओबीसी (इतर मागासवर्ग) प्रवर्गातून ९ वेळा परीक्षा देता येत होती. त्यांनी नावामध्ये पालट करून २ वेळा अशी एकूण ११ वेळा परीक्षा दिली आहे. या एकूणच अपप्रकारामुळे प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबियांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, प्राप्तीकर विभाग, समाजकल्याण, अतिक्रमण या राज्य अन् केंद्र शासनाच्या विविध विभागांकडून चौकशी चालू करण्यात आली आहे.

खेडकर यांच्याविषयीच्या तक्रारींचे स्वरूप पहाता खेडकर यांचे प्रशिक्षण थांबवण्याचा आदेश महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आला. ‘लालबहादूर शास्त्री प्रशासकीय अकादमी’ यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यशासनाने ही कारवाई केली. यासह पूजा खेडकर यांना २३ जुलैपूर्वी ‘मसुरी’ (उत्तराखंड) येथील प्रशिक्षण केंद्रामध्ये उपस्थित रहाण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. यासह पुणे पोलिसांनी पूजा यांना चौकशीसाठी उपस्थित रहाण्यासाठी ३ वेळा नोटीस बजावली आह; पण त्या सध्या कुठे आहेत ? याचा कुणाला थांगपत्ता नाही.

एकूणच या प्रकरणातून हे लक्षात येते की, तरुण अधिकार्‍याच्या वर्तनामुळे कनिष्ठ अधिकार्‍यांच्या वर्तनाविषयी आणि कर्तव्याच्या ठिकाणी कार्यकाळ चालू करण्यापूर्वी उमेदवारांची कडक छाननी करण्याची आवश्यकता यातून दिसते.

२. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकार्‍यांची भूमिका

भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकार्‍यांचे कर्तव्य प्रशासनिक उत्तरदायित्वांच्या पलीकडे जाते. त्यांच्याकडून जनतेला सार्वजनिक हिताला वैयक्तिक किंवा राजकीय हितसंबंधांपेक्षा महत्त्व देत ‘आदर्श नागरिक’ म्हणून वागण्याची अपेक्षा असते. त्यांचे नैतिक कर्तव्य, म्हणजे नागरिकांच्या कल्याणाला प्राधान्य देणे, नागरी कर्तव्याची भावना आणि राष्ट्रीय अभिमान निर्माण करणे अन् सरकारी संस्थांवरील सार्वजनिक विश्वासाला प्रेरणा देणे, असे असते. अधिकार्‍यांच्या या कर्तव्यांची जाणीव नागरिकांना आहे. त्यामुळे या प्रकरणी पुण्यातील नागरिकांनी काही प्रश्न उपस्थित केले. त्यातील एक प्रश्न असा, ‘सर्वांत कनिष्ठ स्तरावरील अधिकार्‍यांच्या अशा प्रकारच्या मागण्या असतील, तर खेडकर या वरिष्ठ अधिकारी झाल्यावर काय परिणाम होतील ?’ यामुळे नागरी सेवेत प्रवेश करण्यापूर्वी उमेदवारांची पात्रता आणि वर्तन यांचे अन्वेषण करण्याची आवश्यकता अधोरेखित होते. ‘भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आदर्श नागरिक आहेत’, हे सुनिश्चित करणे, हे सरकारी कामकाजाच्या प्रभावितेसाठी अत्यंत आवश्यक आहे.

३. भारतीय प्रशासकीय सेवेतील उमेदवाराची निवड करतांना नवीन दृष्टीकोन ठेवावा ! – अरुण भाटीया, माजी सनदी अधिकारी

अरुण भाटीया हे भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी असून त्यांनी भारतीय नोकरशाहीमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा दिला होता. त्यांनी त्यांच्या पूर्ण कारकीर्दीमध्ये नोकरशाहीतील अकार्यक्षमता आणि भ्रष्टाचार यांच्यावर टीका करून ‘त्या पदाविषयी स्वतःचे उत्तरदायित्व असावे’, या गोष्टीला प्राधान्य दिले. अलीकडेच वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आय.ए.एस्. अधिकारी पूजा खेडेकर यांच्याविषयीच्या ‘दूरदर्शन’वरील एका मुलाखतीमध्ये त्यांनी ‘आय.ए.एस्.’ उमदेवाराची निवड करतांना कोणता दृष्टीकोन असावा ?’ याविषयी त्यांचे विचार मांडले.

श्री. अरुण भाटीया, माजी सनदी अधिकारी

ते म्हणाले, ‘‘आय.ए.एस्. उमेदवार निवडतांना या परीक्षेसाठी काही वर्षे सिद्धता करणारे तीक्ष्ण बुद्धीमत्ता असलेले उमदेवार नको, तर आपल्याला भक्कम तारतम्य ज्ञान, कामाशी पुष्कळ एकात्मता, चारित्र्याचे बळ आणि सामाजिक कार्य करणे यांविषयी पार्श्वभूमी असलेले उमदेवार पाहिजेत. जर उमेदवार निवडतांना हा निकष ठेवला, तर पुढील आय.ए.एस्. तुकडी आवश्यक मानकापर्यंत येईल.’’ भाटीया यांनी दिलेल्या दृष्टीकोनानुसार चांगले चारित्र्य अन् सामाजिक बांधिलकी असणारे परिणामकारक नोकरशहा मिळतील, जे खर्‍या अर्थाने एकात्मतेची मूल्ये जपून शासनात उत्तरदायित्व घेऊन काम करतील.

– श्री. नारायण नाडकर्णी, फोंडा, गोवा.