रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातील पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९१ वर्षे) यांच्याशी झालेली अविस्मरणीय आणि आनंददायी भेट !
१. पू. दातेआजींनी बर्याचदा आठवण काढल्याचा निरोप मिळाल्याने त्याच दिवशी त्यांना भेटायला जाणे आणि त्यांनी आपुलकीने साधकाकडे त्याच्या कुटुंबियांची विचारपूस करणे
‘४.६.२०२४ या दिवशी सनातनच्या संत पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९१ वर्षे) यांच्या ज्येष्ठ स्नुषा सौ. ज्योती नरेंद्र दाते यांनी मला संपर्क करून कळवले, ‘पू. आजींनी कालपासून बर्याच वेळा तुमची आठवण काढली. तुम्ही आज किंवा उद्या पू. आजींना भेटायला याल का ?’’ मी त्याच रात्री पू. आजींना भेटायला आश्रमातील त्यांच्या खोलीत गेलो.
पू. दातेआजी एका आसंदीवर बसल्या होत्या आणि शेजारी त्यांचे कुटुंबीय (सुपुत्र डॉ. नरेंद्र दाते आणि सौ. ज्योती नरेंद्र दाते, तसेच श्री. निरंजन दाते आणि सौ. नेहा निरंजन दाते) बसले होते. त्या वेळी पू. आजींना रुग्णाईत असल्यामुळे पूर्वीसारखे सुस्पष्ट शब्दांत बोलता येत नव्हते, तरीही त्यांनी नेहमीप्रमाणे आपुलकीने माझ्या कुटुंबियांची विचारपूस केली. त्या वेळी सौ. ज्योती दाते मला म्हणाल्या, ‘‘सध्या पू. आजींना नीट बोलता येत नाही; पण आज त्या तुमच्याशी एवढा वेळ (अनुमाने २० मि.) बोलल्या. आज त्या अधिक आनंदी आहेत. पू. आजींना तुमचे नाव आठवत नव्हते. त्या कालपासून आम्हाला सांगत होत्या, ‘‘धोतर-सदरा घालणार्या त्या साधकाला ‘मी बोलावले आहे’, असे सांगा !’’ आज त्यांच्या मुखकमलावरील एवढा आनंद पाहून आम्हा कुटुंबियांनाही पुष्कळ आनंद झाला.’’
२. पू. आजींनी रुग्णाईत असूनही स्वतःहून आसंदीतून उठून उभे राहून साधकाला प्रेमाने एक भेटवस्तू देणे आणि साधकाला पू. आजींच्या सहवासातील निरपेक्ष प्रेम आणि तेथील आनंदी वातावरण यांमुळे ‘तेथून निघावे’असे न वाटणे
पू. दातेआजींचा ‘प्रत्येकावर निरपेक्ष प्रेम करणे’, हा स्थायीभावच आहे. खरेतर पू. आजी माझ्यापेक्षा वय, साधना आदी सर्वच दृष्टींनी ज्येष्ठ असूनही रुग्णाईतही आहेत. तरीही त्या लगेच आसंदीतून उठून उभ्या राहिल्या आणि त्यांनी मला एक भेटवस्तू दिली. त्या वेळी पू. आजींसह त्यांच्या कुटुंबियांच्या मुखकमलांवर अवर्णनीय आनंद दिसत होता. त्या प्रसंगी पू. आजींच्या सहवासातील निरपेक्ष प्रेम आणि तेथील आनंदी वातावरण यांमुळे मला त्या खोलीतून बाहेर पडावेसे वाटतच नव्हते.
३. पू. आजींनी साधकाला ‘‘आईला सांग की, यापुढे मला खाऊ पाठवू नको’’, असे सांगणे आणि एक मासानंतर त्यांच्या सुनेकडून ‘दुसर्याच दिवसापासून पू. आजी अधिक रुग्णाईत झाल्याने आता त्यांना नळीतून द्रवपदार्थ द्यावे लागतात’, असे कळणे
माझे आई-बाबा शक्य होईल, तेव्हा गुरुदेव आणि पू.दातेआजींसह काही संत यांच्यासाठी काहीतरी खाऊ (उदा. खोबर्याच्या वड्या) पाठवतात. त्यावरून पू. आजींनी मला सांगितले, ‘‘यापुढे आईला सांग की, माझ्यासाठी काही खाऊ पाठवू नको.’’ तेव्हा पू. आजी रुग्णावस्थेत असल्याने मी त्यांना विचारले, ‘‘तुमच्यासाठी आळीवाचे लाडू करून पाठवायला आईला सांगू का ?’’ त्या वेळी पू. आजी बोललेले एक वाक्य मला नीट ऐकू आले नाही; पण डॉ. नरेंद्र दाते यांनी ‘‘आई, तू असे काय म्हणतेस ?’’, असे पू. आजींना म्हटले. तेव्हा त्या देहत्यागाविषयी वाक्य बोलल्याचे माझ्या लक्षात आले.
४. गुरुदेव आणि पू. दातेआजी यांच्या कृपेने शिकायला मिळालेले सूत्रे
अ. ‘पू. दातेआजी संत असल्याने त्यांच्यामध्ये ‘सर्वज्ञता’ हा ईश्वरी गुण आहे आणि त्यांना आगामी काळात घडणार्या गोष्टींविषयी पूर्ण कल्पना असते. त्यामुळेच ४.६.२०२४ या दिवशी पू. आजींनी मला यापुढे त्यांच्यासाठी खाऊ न पाठवण्याविषयी निरोप सांगितला.
आ. माझ्यासारख्या सर्वसामान्य साधकावर निरपेक्ष प्रेमाची उधळण करण्यासाठीच त्यांनी काळाला रोखून बर्याचदा माझी आठवण काढली आणि त्यांच्याशी भेट झाल्याच्या दुसर्याच दिवसापासून त्या अधिक रुग्णाईत झाल्या.
इ. ४.६.२०२४ या दिवशी पू. आजींच्या बोलण्यातून चैतन्य मिळून आनंदाची अनुभूती आली. नंतर ११.७.२०२४ या दिवशी पू. आजींना भेटल्यावर त्या अधिक रुग्णाईत असल्याने डोळे उघडून पाहू शकत नव्हत्या किंवा बोलू शकत नव्हत्या, तरीही त्यांच्याकडून प्रक्षेपित होणारे अधिक प्रमाणातील चैतन्य आणि आनंददायी स्पंदने यांमुळे ‘त्यांच्या समोर नामजप करतच बसावे’, असे वाटत होते.’
५. कृतज्ञता
खरेतर सर्वच संतांची प्रीती ही अवर्णनीय असते. निरपेक्ष प्रेमाचे मूर्तीमंत स्वरूप असलेल्या पू. दातेआजी आणि त्यांच्यासारख्या संतांद्वारे माझ्यासारख्या सर्वसामान्य अशा सनातनच्या अनेक साधकांवर निरपेक्ष प्रेमाने गुरुकृपेचा वर्षाव करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’
– श्री. गिरिधर भार्गव वझे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.७.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |