गीतेनुसार आचरण आणि यश !
भारताची युवा नेमबाज मनु भाकर हिने २८ जुलै या दिवशी पॅरिस ऑलिंपिकमध्ये इतिहास घडवला. १० मीटर एअर पिस्तुल नेमबाजी प्रकारात तिने कांस्य पदकावर स्वतःची मोहर उमटवली आहे. ऑलिंपिकमध्ये पदक पटकावणारी ती देशाची पहिली नेमबाज ठरली असून महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल नेमबाजी प्रकारात मनु भाकर हिने अंतिम फेरीत धडक मारली. पात्रता स्पर्धेत तिने ५८०-२७ गुणांसह तिसरे स्थान पटकावले होते. आज तिच्या कामगिरीत अचूकता आणि दृढनिश्चय यांचे मिश्रण दिसून आले. मनु भाकर हिने तब्बल १२ वर्षांनंतर ऑलिंपिकमध्ये नेमबाजीत भारताला पदक मिळवून दिले आहे. या यशाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिच्याशी भ्रमणभाषद्वारे संपर्क साधून तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे, तसेच तिच्यासह इतर खेळांडूना सर्व सुविधा दिलेल्या आहेत, असेही आवर्जून सांगितले. या वेळी ‘सरकारने मला सर्व सुविधा दिल्या आहेत. त्यात मी आनंदी आहे’, असे मनु भाकर हिने सांगून याविषयी नरेंद्र मोदी यांचे आभारही मानले.
भगवद्गीतेमधील शिकवण आदर्श मानणे !
मनु भाकर ही मूळची हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील गोरिया गावात रहाणारी आहे. या यशाविषयी तिच्या गावात ग्रामस्थांमध्ये आनंदाची लहर आली आहे. सर्व क्षेत्रांतून आणि सामाजिक माध्यमांतून मनु हिचे अभिनंदन करण्यात येत आहे. या यशाविषयी मनू भाकर माध्यमांशी बोलतांना म्हणाली, ‘‘मी प्रतिदिन भगवद्गीतेचे वाचन करते. ‘तुम्ही केवळ कर्म करत रहा, फळाची अपेक्षा करू नका’, अशी भगवान श्रीकृष्णाची शिकवण आहे. भगवद्गीतेमधील शिकवण माझा आदर्श आहे. ही गीता मी पुष्कळ वेळा वाचली आहे. या महान गीतेतून पुष्कळ काही शिकले आहे. यश तुमच्या हातात नाही. मी फळाची अपेक्षा न करता नेमबाजीत माझा सराव कायम ठेवला. अंतिम सामन्याच्या वेळी लक्ष्य ठेवतांना माझ्या मनात गीता धावत होती. गीतेत असे म्हटले आहे की, तुमच्या कृतीवर लक्ष केंद्रित करा, परिणामावर नाही; म्हणून मी ते लक्षात ठेवले आहे. आज मला त्याचे फळ मिळाले. देशवासियांचा पाठिंबा आणि कुटुंबियांचे प्रोत्साहन यांमुळेच मला हे यश मिळाले आहे.’’ मनु भाकर हिने व्यक्त केलेल्या या मनोगतातून अनेक खेळाडूंना शिकायला मिळेल.
इतर खेळाडूंनी ईश्वराची भक्ती करावी !
क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल अशा अनेक खेळांतील खेळाडू स्पर्धेपूर्वी कसून सराव करतात. त्यांना बर्याच जणांकडून प्रोत्साहित केले जाते. तज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन केले जाते; मात्र हे करत असतांना स्पर्धेत विजयी झाल्यानंतर किती भारतीय खेळाडू ईश्वराच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतात किंवा मनु भाकरप्रमाणे देवाची भक्ती करतात ? उलट भारतात बुद्धीप्रामाण्यवादी, धर्मद्रोही आणि नास्तिकवादी यांच्याकडून याला थोतांड ठरवून त्यावर टीकाही केली जाते. क्रिकेटसारख्या स्पर्धेत विजयी झाल्यानंतर भारतीय खेळांडूकडून मैदानात बिअरचे फवारे उडवले जातात. दुसरीकडे पाकिस्तानील क्रिकेटचे खेळाडू विजय मिळाल्यावर मैदानातच नमाज अदा करून अल्लाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतात. खेळाडूंची ईश्वरावर किती श्रद्धा आहे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
भक्ती आणि प्रयत्न असतील, तेथे यश निश्चित !
मनु भाकर हिने स्वतःच्या यशाविषयी सांगितले की, प्रयत्न कधीच वाया जात नाहीत. याविषयी आपण नेहमी प्रामाणिक राहिले पाहिजे. त्यामुळे कधीही हार मानू नये. एखाद्याने प्रयत्न करत रहावे, जेणेकरून कधीही पश्चात्ताप होऊ नये. मनु भाकर हिने कांस्य पदक जिंकण्यामागे तिचे प्रयत्न, तिने जिद्दीने केलेला सराव, तसेच आई, वडील, आजी यांनी केलेले चांगले संस्कार, घरातील धार्मिक वातावरण या सर्व गोष्टी कारणीभूत आहेत. अशा प्रकारे इतर खेळाडूंनी प्रयत्न केल्यास त्यांनाही निश्चितच यश मिळेल. मनु प्रतिदिन ८ घंट्यांहून अधिक सराव करत असे. ती तिच्या पलंगाच्या बाजूला पिस्तुल घेऊनच झोपायची. तिने युवा ऑलिंपिक, वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि एशियाड या स्पर्धांमध्ये मिळून अनुमाने २० पदके जिंकली आहेत. ऑलिंपिकमध्ये पदक मिळवण्यासाठी ४ वर्षांपासून ती कुणाच्याही वाढदिवसाच्या मेजवानीला गेली नाही किंवा कुणाच्या ‘सेलिब्रेशन’मध्ये (कौतुक सोहळ्यात) सहभागी झाली नाही. यावरून मनु हिची खेळाप्रती किती तळमळ होती, ते दिसून येते. असा ध्यास जर देशातील विविध स्पर्धांतील प्रत्येक खेळाडूने ठेवला, तर यश निश्चित मिळेल, यात शंका नाही.
‘भगवद्गीता’ पाठांतराऐवजी ‘गीता कृती स्पर्धा’ ठेवा !
‘भगवद्गीता’ पाठांतर स्पर्धेत सोनई (अहिल्यानगर) येथील रजनी बेल्हेकर यांनी देशात प्रथम क्रमांक पटकावल्याची बातमी नुकतीच वाचनात आली. ३ वर्षांनंतर त्यांनी पूर्ण भगवद्गीता पाठांतर करून ‘ऑनलाईन’ स्पर्धेत ६०० पैकी ६०० गुण प्राप्त केले होते. यामध्ये त्यांना सुवर्णपदक देण्यात आले होते. स्पर्धेचा निकाल घोषित होऊन त्यांना जगद्गुरु शंकराचार्य विदुशेखर भारती यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक आणि २१ सहस्र रुपयांचा धनादेश देण्यात आला. केवळ गीता पाठांतर करून तात्पुरता आनंद मिळेल. संतांच्या हस्ते सत्कार झाल्यावर विजेत्याला काही वेळ आनंद मिळेल; मात्र गीतेत सांगितलेली साधना केली, तर ईश्वरप्राप्ती होऊन मनुष्याला कायमचा आनंद मिळेल. त्यामुळे संतांनी त्यांच्या प्रवचनातून गीता पाठांतराऐवजी गीतेतील आचरण कृतीद्वारे करण्यावर मार्गदर्शन केले पाहिजे. मनु भाकरप्रमाणे गीतेतील तत्त्वज्ञान समजून त्याप्रमाणे जीवनात आचरण, जिद्दीने प्रयत्न आणि साधना केली, तर गीता पाठांतर केल्याचे सार्थक होईल. देशात बर्याच ठिकाणी ‘भगवद्गीता’ पाठांतर स्पर्धा आणि ज्ञानेश्वरीची पारायणे आयोजित केली जातात; मात्र नुसते गीता पाठांतर करून किंवा ज्ञानेश्वरीची पारायणे करून व्यक्तीची आध्यात्मिक प्रगती होणार नाही. त्यामुळे गीता पाठांतरासमवेत त्यातील शिकवणीनुसार कृती म्हणजे साधना केल्यानंतर लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांची आध्यात्मिक प्रगती होईल. यासाठी ‘गीता कृती’ स्पर्धा सर्वत्र आयोजित करायला हवी !
भगवद्गीतेतील शिकवणीनुसार फळाची अपेक्षा न करता निरपेक्षपणे कृती करणारी मनु भाकर सर्वच खेळाडूंसाठी आदर्शवत् ! |