पुणे शहरातील सोसायट्यांमध्ये शिरलेल्या पाण्याचे महापालिकेकडे दायित्व नाही का ?
|
पुणे – भारतीय हवामानशास्त्र विभागाने शहरामध्ये पावसाचा ‘रेड ॲलर्ट’ (अती पावसाची चेतावणी) जारी केल्यामुळे २२ जुलैपासून खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो, अशी चेतावणी जलसंपदा विभागाने दिली होती. त्यानंतरही महापालिका निष्काळजी होती. त्यामुळे सिंहगड रस्त्यावरील एकतानगर भागातील ४ सहस्र जणांचे संसार पाण्यात बुडाले. चेतावणी देऊनही कोणतीही कृती न केल्याने हे संकट ओढावले, असा आरोप पुणेकर करत आहेत. यात ‘पुणेकरांच्या झालेल्या हानीत महापालिका प्रशासनाचे काहीच दायित्व नाही का ?’ असा प्रश्न पुणेकर उपस्थित करत आहेत. (याविषयी महापालिका प्रशासन काय करणार ? हे प्रशासनाने स्पष्ट करणे आवश्यक आहे ! – संपादक)
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या चेतावणीनुसार २३ जुलैपासून खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये मुसळधार पावसाला प्रारंभ झाला. त्यामुळे जलसंपदा विभागाने २४ जुलैच्या सकाळपासून खडकवासला धरणातून विसर्ग चालू केला. मुसळधार पावसामुळे मध्यरात्री धरणातून ११ सहस्रांहून अधिक क्युसेक्स विसर्ग चालू केला. २४ जुलैच्या सकाळी ७ वाजता विसर्ग वाढवून तो ३५ सहस्र क्युसेक्स करण्यात आला. २४ जुलैच्या पहाटे ३ वाजता जिल्हा प्रशासनाची आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा कामाला लागली. त्याच वेळी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी त्याचे दायित्व घेतले. परिस्थितीचे गांभीर्य पाहून जिल्हाधिकार्यांनी संबंधित यंत्रणांना सूचना देऊन सज्ज रहाण्यास सांगितले. नदीकाठच्या परिसरातील सोसायट्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता असून महापालिकेने तात्काळ त्यावर कार्यवाही करावी, असेही जिल्हाधिकार्यांनी महापालिकेला आदेश दिले. तरीही महापालिकेची यंत्रणा घरामध्ये पाणी शिरल्यानंतर कामाला लागल्याचा आरोप पुणेकर करत आहेत.