सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या दैवी गुणांचे स्मरण करून भावजागृती अनुभवणारे देवद आश्रमातील श्री. कृष्णकुमार जामदार (वय ७४ वर्षे) !
‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या एका भक्तीसत्संगात आपल्या ओघवत्या दैवी वाणीतून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (गुरुमाऊली) यांचा गुणगौरव केला आहे. त्यामुळे मला गुरुमाऊलीच्या ठायी असलेल्या दैवी गुणांची महती ज्ञात झाली. ‘जणू काही गुरुमाऊलीचे जीवनचरित्र माझ्या डोळ्यांसमोर दृश्यमान होत आहे’, असे मला वाटले. गुरुमाऊलीच्या ठायी असलेल्या दैवी गुणांचे नित्य स्तवन केल्यास भावजागृती होण्यास साहाय्य होते’, असे मला अनुभवायला मिळाले. गुरुमाऊलीच्या प्रत्येक दैवी गुणाचे स्मरण केल्यानंतर त्या संदर्भातील माऊलीची कृती डोळ्यांपुढे उभी रहाते. त्यामुळे भावजागृती होऊन आपोआप शरणागतभावाने माऊलीच्या चरणी वंदन होते.
१. सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलीची अनंत रूपे
गुरुमाऊली ज्ञानवंत, भक्तवत्सल, आनंदस्वरूप, पुरुषोत्तम, जगदोद्धारक, अखिल ब्रह्मांडनायक, मुक्तीदाता, अनादी, अनंत आणि सच्चिदानंद परब्रह्म अशी आहे. या प्रत्येक गुणवैशिष्ट्यात गुरुमाऊलीची महती, प्रतिभा, कृती आणि त्यामागील कार्यकारणभाव यांची जाणीव होत असल्याने गुरुमाऊलीचे ईश्वरी स्वरूप लक्षात येते.
१ अ. ज्ञानवंत
गुरुमाऊलीने अध्यात्माचे अनंत ज्ञान आणि त्याची जीवनातील आवश्यकता सोप्या अन् सरळ भाषेतून प्रवचने, अभ्यासवर्ग, सत्संग, अपार ग्रंथसंपदा इत्यादींच्या माध्यमातून समाजापुढे मांडली अन् सर्वांना अध्यात्मात साक्षर केले. ज्ञानाचे भांडार असलेल्या गुरुदेवांच्या जून २०२४ पर्यंत ३६६ ग्रंथांच्या १३ भाषांत ९७ लाख १० सहस्र प्रती छापल्या गेल्या आहेत.
१ आ. भक्तवत्सल
गुरुमाऊलीच्या ‘निर्मळ आणि निरपेक्ष प्रीती’ची तर आपण कल्पनाच करू शकत नाही. साधकांच्या प्रती असलेली माऊलीची उत्कट प्रीती आणि जवळीक यांमुळे साधकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन त्यांना ‘तू काळजी करू नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे’, या संतवचनाची प्रचीती येते. आपण अडचणीत असतांना गुरुमाऊलीला प्रार्थना करताच आपल्याला मार्गदर्शन मिळते. आई-वडिलांनी केले नसेल, इतके किंबहुना त्यापेक्षाही अधिक आणि अनमोल असे प्रेम माऊली आपल्यावर करते, हे आपल्याला पदोपदी जाणवते. त्यांच्या साधकांवरील अपार प्रीतीमुळे साधकवृंद सर्वस्वाचा त्याग करून आणि निश्चिंत होऊन त्यांच्या चरणी साधना करत आहे. माऊलीच्या ब्रह्मोत्सवात रथातून साधकांना नमस्कार करत असतांना माऊलीचे पाणावलेले नेत्र अद्यापही सर्वांच्या स्मरणात आहेत. हाच त्यांचा साधकवृंद आणि समाज यांच्याप्रती असलेला वात्सल्यभाव आहे.
१ इ. आनंदस्वरूप
आपण गुरुमाऊलीचे कुठलेही रूप डोळ्यांपुढे आणले, तर सतत तिच्या मुखाकृतीतून आनंदच प्रक्षेपित होत असतांना दिसतो. त्यामुळे साधक उत्साहाने साधना आणि सेवा करून त्यांतून आनंदप्राप्ती करत असतात. साधक अडचणीत, नैराश्येत किंवा समस्यांना तोंड देत असतांना आनंददायी माऊलीचे मनोभावे स्मरण करताच त्यांच्या समस्या न्यून होतात.
१ ई. पुरुषोत्तम
हा गुण एकमेवाद्वितीय भगवान श्रीविष्णूंशी निगडित आहे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले भगवान श्रीविष्णूंचे अवतार असून आपणा सर्वांसाठी ते ‘पुरुषोत्तमच’ आहेत.
१ उ. जगदोद्धारक
गुरुमाऊली ही केवळ सनातनच्या साधकांच्या उत्कर्षासाठी कार्यरत नसून जगाच्या पाठीवर साधना करणार्या प्रत्येक जिवाचा आध्यात्मिक उत्कर्ष करण्यासाठी कृतीशील आहे. ती त्यांना साधना करण्यास प्रवृत्त करत आहे. ती साधना करणार्या सर्व जिवांमध्ये विश्वबंधुत्वाचा विचार रुजवून त्यांच्या उत्कर्षासाठी सातत्याने मार्गदर्शन करत आहे. ‘आज देश-विदेशातील साधक साधनेत करत असलेली प्रगती’ माऊलीच्या जनकल्याणाच्या कृतीचीच फलश्रुती आहे.
१ ऊ. ब्रह्मांडनायक
‘गुरुमाऊली पृथ्वीवर आरुढ होऊन सर्वांना प्रीतीभावाने प्रणाम करण्याच्या मुद्रेत उभी असून स्वर्गातून सर्व देवीदेवता माऊलीवर पुष्पवृष्टी करत आहेत’, असे एक चित्र आहे. या चित्रावरून गुरुमाऊलीची ओळख तिच्या देहापुरती मर्यादित न रहाता ‘ती सर्व जगाची कल्याणकारक शक्ती आहे’, याची प्रचीती येते. माऊलीचे हे ‘अजानुबाहु’ रूप तिच्या ब्रह्मांडनायक या स्वरूपाची जाणीव करून देते. सर्व ऋषीगण आणि देवगण माऊलीच्या समाजोद्धाराच्या कार्याची नोंद घेत माऊलीला आशीर्वाद प्रदान करत आहेत.
१ ए. मुक्तीदाता
साधकांना साधनेत प्रगतीपथावर नेऊन त्यांना मोक्षाचा मार्ग दाखवणारी आणि जन्म-मृत्यूच्या बंधनातून मुक्त करणारी गुरुमाऊली ‘मुक्तिदाता’ आहे. माऊलीच्या ठायी असलेल्या या गुणवैशिष्ट्यांमुळे तिने सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगा’नुसार साधना करून १५.५.२०२४ पर्यंत १२७ साधक संत झाले, तर १०५८ साधकांची संतत्वाच्या दिशेने वाटचाल चालू आहे आणि अनेक साधक त्या वाटेवर मार्गक्रमण करत आहेत.
१ ऐ. अनादी आणि अनंत असलेली श्रीमन्नारायण स्वरूप गुरुमाऊली !
गुरुमाऊलीचे स्मरण करताक्षणी ‘शेषशय्येवर पहुडलेली गुरुमाऊली आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या त्यांच्या दोन उत्तराधिकारी त्यांच्या समीप उभ्या राहून माऊलीवर पुष्पे अर्पण करत आहेत’, असे दृश्य डोळ्यांपुढे येते. तेव्हा माऊली खरोखर भगवान श्रीविष्णूंचे स्वरूप असल्याची प्रचीती येते.
आम्हा पामर जिवांवर कृपा करून श्रीराम, श्रीकृष्ण आणि भगवान श्रीविष्णु यांचे दर्शन घडवणारी आपली माऊली खरोखर ‘अवतारी विभूती’ असल्याच्या जाणिवेने भावजागृती होते.
२. गुरुमाऊलीच्या गुणवैशिष्ट्यांचे नित्य स्मरण केल्याने भावजागृती होणे
गुरुमाऊलीची ही गुणवैशिष्ट्ये आपणास गुरुमाऊलीचे जीवनदर्शन घडवत आहेत. या गुणवैशिष्ट्यांचे नित्य स्मरण केल्याने भावजागृती होण्यास साहाय्य होते आणि आपण त्यांच्या चरणी कृतज्ञताभावाने नतमस्तक होतो.
‘हे सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली, आपण श्रीमन्नारायण स्वरूप आहात. मला वरील सर्व लिखाण केवळ आपल्याच कृपेने सुचले. असे लिखाण शब्दांकित करण्याची माझी क्षमता नाही. आपल्या कोमल चरणी कृतज्ञताभावाने वंदन करून मी हे सर्व लिखाण आपल्या चरणी समर्पित करत आहे.’
– श्री. कृष्णकुमार जामदार (वय ७४ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१४.६.२०२४)