भारतीय संस्कृतीतील स्त्री-जीवन !
पू. प्रा. सु.ग. शेवडे यांची ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !
२९ जुलैला प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘भारतीय स्त्रीविषयी हिंदुद्वेष्ट्यांकडून चुकीचा प्रचार’, ‘विधात्याने निर्माण केलेली स्त्रीच्या शरिराची रचना’ आणि ‘स्त्री पुरुषापेक्षा बुद्धीमान आणि कर्तव्यदक्ष’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
(लेखांक २७) : प्रकरण ५
मागील भाग वाचण्यासाठी क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/819044.html
५. स्त्रीचा कुटुंब, समाज आणि राष्ट्र यांना होणारा लाभ !
स्त्रियांना मर्यादित कष्ट करावे लागतील, तिला आवश्यक तेवढी विश्रांती मिळेल, तिच्या कर्तृत्वाला राष्ट्रउभारणीत महत्त्वाचे स्थान असेल, तिच्या वात्सल्याचा लाभ घेतच नवी पिढी वर्धमान होईल, तिच्या प्रेमरज्जूनेच (प्रेमामुळेच) पती आपल्या घराशी बांधलेला राहील, तिच्या विनम्रतेचा लाभ वृद्धांना आदरयुक्त शुश्रूषेच्या रूपाने वरदायी ठरेल, तिच्या कलादृष्टीचा लाभ संपूर्ण कुटुंबाला सुग्रास भोजनापासून घराच्या अंतर्गत सजावटीपर्यंत सर्वत्र लाभेल. तिच्यापासून राष्ट्राला उत्तम सुसंस्कृत प्रजा मिळेल, अशीच जीवनव्यवस्था भारतीय संस्कृतीने तिला लावून दिली आहे.
६. स्त्री ही कुटुंबस्थानी केंद्रबिंदू असणे
स्त्री ही कुटुंबस्थानी केंद्रबिंदू असते. याचा विचार करूनच शास्त्रांनी ‘सहस्रं तु पितृन्माता गौरवेणातिरिच्यते।’, (मनुस्मृति, अध्याय २, श्लोक १४५) म्हणजे ‘१०० आचार्यांपेक्षा पिता श्रेष्ठ आणि पित्यापेक्षा सहस्रपट माता श्रेष्ठ आहे’, असे म्हटले आहे, म्हणजे सहस्रो पितरांपेक्षाही मातेचा गौरव अधिक श्रेष्ठ आहे. तिला हे गौरवयुक्त, आदरयुक्त आणि सन्मानयुक्त जीवन लाभावे, ही भारतीय संस्कृतीची अपेक्षा आहे. यासाठीच मनूने म्हटले आहे, ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः।’ (मनुस्मृति, अध्याय ३, श्लोक ५६) म्हणजे ‘जिथे नारीची पूजा होते, तेथे देवता रममाण होतात.’ जेथे स्त्रीची पूजा होते, तेथे देवता वास्तव्य करतात.
७. स्त्री रक्षणविरहित नसावी !
आता ‘न स्त्री स्वातन्त्र्यमर्हति।’ या मनुवचनाचाही विचार करू.
पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने।
रक्षन्ति स्थविरे पुत्रा न स्त्री स्वातन्त्र्यमर्हति।। – मनुस्मृति, अध्याय ९, श्लोक ३
अर्थ : बालपणी पित्याने स्त्रीचे रक्षण करावे, पतीने तरुणपणात सांभाळावे, पुत्राने म्हातारपणी स्त्रीच्या रक्षणाची दक्षता घ्यावी. स्त्री सुरक्षित नाही, अशी स्थिती कधी असू नये.
‘स्त्री रक्षणविरहित नसावी’, हा विचार किती श्रेष्ठ आहे पहा ! स्त्री लहान असते, त्या वेळी तिचा पिता तरुण असतो. ती तरुण होते, तेव्हा तिचा पती तरुण असतो. ती वृद्ध होते, तेव्हा तिचे पुत्र तरुण असतात, म्हणजेच एका स्त्रीच्या रक्षणासाठी किमान ३ तरुणांची नेमणूक करण्यात आली आहे.
८. भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने स्त्री अत्यंत मौल्यवान आणि सन्मान्य !
स्त्री आणि पुरुष यांत स्त्री रक्षणीय आहे; म्हणून तिच्या रक्षणाचीही व्यवस्था आहे. श्रेष्ठ वस्तूच रक्षणीय असते. सर्व धातूंमध्ये सोने सर्वांत मौल्यवान असते; म्हणून तर सोन्याचे दागिने तिजोरीत सुरक्षित ठेवतात, तसे लोखंडाला ठेवावे लागत नाही. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, भारतीय संस्कृतीने स्त्रीला अत्यंत मौल्यवान आणि सन्मान्य ठरवले आहे; म्हणूनच ‘मातृदेवो भव’ असे म्हटले आहे.
९. स्त्रियांसमोर असलेल्या आपत्ती !
औद्योगिक आणि व्यावसायिक कामगिरी स्त्रीला मातृत्वास अपात्र बनवते. आधुनिक विज्ञानही असेच मानते की, जगातील औद्योगिक आणि व्यावसायिक बजबजपुरीत उतरून स्त्रीने आपले मातृत्व सामर्थ्य गमावू नये. स्त्री पुरुषाप्रमाणे काम करू शकेल. पैलवानगिरीही (शारीरिकदृष्ट्या शक्तीशाली) करू शकेल; पण त्यासाठी तिची निर्मिती आहे का ? पुरुषांच्या बरोबरीने अर्थार्जनाच्या क्षेत्रात उतरलेल्या स्त्रियांना अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागते.
अ. भोवतालच्या पुरुषांच्या लगटीला, टोमण्यांना, नजरांना सामोरे जावे लागते. एखादा अधिकारीच हलकट असला, तर त्याला बरे वाटेल, असे वागणे किंवा फटकून वागून वैर पत्करणे भाग पडते.
आ. ‘त्या’ (मासिक पाळीच्या) दिवसांत आणि ‘त्या’ महिन्यातही प्रतिदिन कामावर वेळेत जाण्याची पळापळ ! कामाचे कष्ट आणि शारीरिक क्लेश सहन करावे लागतात.
इ. स्त्री पुरुषांच्या बरोबरीने नोकरी करील, तरी पुरुष स्त्रीच्या बरोबरीने तिला घरात साहाय्य करतोच, असे नाही. घरचे कष्ट तिलाच उपसावे लागतात.
ई. घरच्या कामांना मोलकरीण, मुलांना सांभाळायला पाळणाघर, म्हणजे कमवायचे, ते आपला देह झिजवून दुसर्यांचीच भर करण्यासाठी !
उ. २-३ मासांनंतर बाळाला आईचा सहवास लाभत नाही; कारण तिची बाळंतपणाची रजा संपते. मुलाला कुणीतरी सांभाळत असते. काही ठिकाणी मुलांच्या दुधात झोपेच्या गोळ्या घालून त्यांना दुपारचे झोपवून ठेवले जाते. त्याचे त्यांच्या पुढील जीवनावर दुष्परिणाम होतात. आपल्याला ठेवून आई प्रतिदिन कामाला जाते; म्हणून मुले तिचा राग राग करतात.
ऊ. २-३ मासांच्या मुलाला घरी किंवा पाळणाघरात ठेवून जाण्याचे आणखी काही दुष्परिणाम आहेतच. मुख्य म्हणजे ईश्वराने त्याच्यासाठी उत्पन्न केलेले आईच्या ठिकाणचे स्तन्य त्याला मिळू शकत नाही. (आईचे दूध बालकाला न मिळाल्याने आईच्या स्तनांत गाठी उत्पन्न होतात. त्यातूनच काही जणींना स्तनाचा कर्करोग होतो.) ती कार्यालयात असली, तरी बाळाच्या काळजीने जीव व्यथित होतो.
ए. स्त्री ही घरातील अंतर्गत व्यवस्थापक आहे. तिची जागा दुसरे कुणीही घेऊ शकत नाही. घरचे आणि बाहेरचे असे सारे काम सांभाळतांना स्त्रीची ओढाताण होते. घराचीही आबाळ होते.
(क्रमशः)
– भारताचार्य आणि धर्मभूषण प्रा. सुरेश गजानन शेवडे, चेंबूर, मुंबई.
(साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)