Putin Warns America : जर्मनीत शस्त्रे तैनात केल्यास शीतयुद्धासारखी परिस्थिती पुन्हा उद्भवणार !

पुतिन यांची अमेरिकेला चेतावणी !

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन

मॉस्को (रशिया) – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी अमेरिकेला चेतावणी दिली आहे की, जर अमेरिकेने जर्मनीत लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे तैनात केली, तर रशिया प्रत्युत्तर म्हणून मध्यवर्ती पल्ल्याची आण्विक क्षेपणास्त्रांचे उत्पादन पुन्हा चालू करेल. ती अशा ठिकाणी तैनात केली जातील, जेथून पाश्‍चात्त्य देशांना लक्ष्य करता येईल. यामुळे शीतयुद्धासारखी परिस्थिती पुन्हा उद्भवू शकते, असे पुतिन म्हणाले.

१. या महिन्याच्या प्रारंभी अमेरिकेने म्हटले होते की, अमेरिका जर्मनीमध्ये लांब पल्ल्याची क्रूझ क्षेपणास्त्रे आणि हायपरसोनिक शस्त्रे तैनात करणार आहे.

२. नाटो सदस्यांप्रती त्याचे समर्पण आणि युरोपची सुरक्षा यांच्या नावाखाली अमेरिका ही तैनाती करत आहे. (‘नाटो’, म्हणजेच ‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’ नावाची जगातील २९ देशांचा सहभाग असलेली एक सैनिकी संघटना आहे. या संघटनेत सहभागी झालेल्या कोणत्याही एका सदस्य देशावरील आक्रमण हे संपूर्ण संघटनेवरील आक्रमण मानून त्याला प्रतिसाद दिला जातो. वर्ष १९९७ नंतर पूर्व युरोपातील १४ देश या संघटनेत सहभागी झाले. या देशांना अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी अशा मोठ्या पाश्‍चिमात्य सत्तांकडून शस्त्रसामग्रीचा पुरवठा होतो. याखेरीज नाटोच्या फौजा आणि क्षेपणास्त्रे ही या देशांमध्ये तैनात आहेत.)

३. रशियन नौदल दिनानिमित्त राष्ट्राला संबोधित करतांना राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले की, अमेरिका पुन्हा शीतयुद्धासारखे संकट निर्माण करण्याचा धोका पत्करत आहे. अमेरिकेने जर्मनीत क्षेपणास्त्रे तैनात केल्यास जर्मनीकडून रशियावर १० मिनिटांत आक्रमण केले जाऊ शकते. अमेरिकेने असे केले, तर रशियाही त्याला चोख प्रत्युत्तर देईल.

४. पुतिन यांनी अमेरिकेच्या हालचालीची तुलना वर्ष १९७९ मध्ये पश्‍चिम युरोपमध्ये ‘पर्शिंग-२’ क्षेपणास्त्रांच्या तैनातीशी केली. सोव्हिएत युनियनचे तत्कालीन सरचिटणीस युरी एंड्रोपोव्ह यांनी म्हटले होते की, पर्शिंग क्षेपणास्त्रांची तैनाती हा सोव्हिएत युनियनचे विघटन करून राजकीयदृष्ट्या त्याला नष्ट करण्याचा अमेरिकेचा कट होता.