Infiltrating India : भारतात घुसखोरी करण्‍याविषयीच्‍या बांगलादेशी यू ट्यूबरच्‍या व्‍हिडिओमुळे खळबळ !

बांगलादेशी घुसखोरी

नवी देहली –  गेल्‍या अनेक वर्षांपासून भारतात अवैधरित्‍या वास्‍तव्‍य करणार्‍या बांगलादेशी घुसखोरांचे सूत्र चर्चेचा विषय ठरला आहे. यावरून राजकीय आरोप-प्रत्‍यारोपही झाल्‍याचे दिसून आले आहे. याच पार्श्‍वभूमीवर इंटरनेटवर सध्‍या प्रसारित  झालेल्‍या बांगलादेशी यू ट्यूबरच्‍या (जो यू ट्यूब चॅनलवरून सातत्‍याने व्‍हिडिओ प्रसारित करतो, त्‍याला यू ट्यूबर म्‍हणतात.) एका व्‍हिडिओमुळे खळबळ उडाली आहे. या यूट्यूबरने  व्‍हिडिओमध्‍ये बांगलादेशातून भारतात कोणताही पासपोर्ट किंवा व्‍हिसा न बाळगता कसे जायचे, यासंदर्भात दावे केले आहेत.

१. विशेष म्‍हणजे संपूर्ण व्‍हिडिओमध्‍ये हा यू ट्यूबर या मार्गावरील भारतातील वेगवेगळ्‍या ठिकाणांचे वर्णन करतांना दिसत आहे.

२. हा मार्ग बांगलादेशच्‍या सुनामगंज जिल्‍ह्यातल्‍या एका गावातून जात असल्‍याची माहिती या यू ट्यूबरने व्‍हिडिओमध्‍ये दिली आहे. त्‍यामुळे देशांतर्गत सीमा अवैधरित्‍या ओलांडून आंतरराष्‍ट्रीय नियमांचा भंग केल्‍याप्रकरणी या यूट्यूबरवर कारवाई करण्‍यात यावी, अशी मागणी सामाजिक माध्‍यमांवर करण्‍यात येत आहे.

३. यानिमित्ताने पुन्‍हा एकदा भारतात अवैधरित्‍या वास्‍तव्‍य करणार्‍या बांगलादेशींचे सूत्र  ऐरणीवर येण्‍याची शक्‍यता आहे.

संपादकीय भूमिका

भारतात गेल्‍या अनेक दशकांपासून बांगलादेशी लोक घुसखोरी करत आहेत. ती रोखण्‍यासाठी सरकार, प्रशासन आणि पोलीस काहीही करत नसल्‍यामुळे घुसखोरी वाढत आहे. त्‍यामुळे यापुढे बांगलादेशींनी असे विविध व्‍हिडिओज प्रसारित करून ‘भारतात घुसखोरी कशी करायची ?’, याचे प्रशिक्षण बांगलादेशींना दिले, तर आश्‍चर्य वाटणार नाही !