BJP Rajasthan :  राजस्थानमध्ये भाजप सरकार सावरकर जयंती आणि ३७० कलम हटवल्याविषयी ‘सुवर्ण मुकुट मस्तक दिवस’ साजरा करणार !

राजस्थान शाळांसाठी २०२४-२५ कॅलेंडर

जयपूर – राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने राज्यातील शाळांमध्ये २८ मे या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर २९ मे या दिवशी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त सुटी असेल. यासह जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्याविषयी ५ ऑगस्टला ‘सुवर्ण मुकुट मस्तक दिवस’ (गोल्डन क्राउन हेड डे) साजरा करण्यास आणि १३ ऑगस्टला वीर दुर्गादास राठोड जयंती साजरी करण्यास सांगितले आहे.

राजस्थान शिक्षण विभागाचे संचालक आशिष मोदी यांनी नुकतेच राज्यातील सरकारी आणि खासगी शाळांसाठी २०२४-२५ साठी कॅलेंडर प्रसिद्ध केले. या कॅलेंडरनुसार, १९ ऑगस्ट हा रक्षाबंधन आणि संस्कृत दिवस म्हणून साजरा केला जाईल. दिवाळीची सुटी २७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबरपर्यंत, म्हणजे १२ दिवस असेल. प्रतिवर्षीप्रमाणे हिवाळ्याच्या सुट्या २५ डिसेंबरपासून चालू होऊन ५ जानेवारीपर्यंत चालतील.

शिक्षण विभागाने प्रत्येक महिन्याचा दुसरा आणि चौथा शनिवार ‘नो बॅग डे’ म्हणून घोषित केला आहे. या दिवशी शाळांमध्ये वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातील.